कृतीशील खेळांमुळे मुलांना आपली ऊर्जा अर्थपूर्ण रीतीने मार्गी लावण्यासाठी तसेच समवयस्क मुलांबरोबर प्रभावी परस्पर क्रिया होण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतात.
हे खेळ मुलांना समाजशील बनण्यात मदत करतात आणि त्याद्वारे बुजरेपणा, भावनिक कोंडमारा, मनाचीअनिश्चितता यावर मात करण्यास सहाय्य करतात आणि अशा प्रकारे मुलांची परिपूर्ण वाढ व सर्वांगीण विकास यांचे संगोपन करतात . या खेळांमुळे मुलांचे ऐकण्याचे तसेच परस्पर संबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्य विकसित होते, तसेच समन्वय, तालबद्धता, चपळाई हस्तकौशल्य इत्यादि गुण वाढीस लागतात.
मुले इतरांचे दृष्टिकोन व विचार यांचा आदर करण्यास शिकतात आणि जीवनातील परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक कौशल्यांनी सुसज्ज होतात. आपली पाळी आल्यावरच एखादी गोष्ट करणे अशा काही गोष्टींमुळे हे खेळ मुलांमध्ये समजुतदारपणा, चिकाटी व घाई न करणे हे गुण रुजवितात.
अशा प्रकारे मुलांच्या नित्यक्रमातील तोच-तोचपणा, निरसपणा घालवून कृतीशील खेळ मुलांमध्ये उत्साह निर्माण करतात.