जयदेवाची गोष्ट
कोणे एके काळी कृष्णावर्त नावाच्या गावात जयदेव नावाचा मुलगा रहात होता. तो अत्यंत अशक्त, दुबळा आणि रोगट होता. वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांनी पराकाष्ठेने प्रयत्न केले. पण व्यर्थ! अनारोग्याने त्याची अभ्यासात किंवा अन्य कोणत्याही उपक्रमात प्रगती होईना. होता होता जयदेव १० वर्षांचा झाला. तो शाळेत जायला लागला पण या ना त्या आजाराने तो पुष्कळ दिवस शाळेत गैरहजर रहात असे.
एके दिवशी पौर्णिमा होती व तो गुरुपौणिमेचा दिवस होता. जयदेव नदीवर स्नानासाठी गेला. तेथे त्याने एक साधुपुरुष पाहिला, जो नदीतीरावर बसून मोठ्याने ॐकार म्हणत होता. त्या साधूच्या पावित्र्याचे आकर्षण वाटून जयदेव त्यांच्याजवळ गेला. तो कशाचा उच्चार करीत आहे व त्यापासून लाभ काय? असे जयदेवने त्याला विचारले. त्या साधुपुरुषाने उत्तर दिले, की तो मंत्रराज (सर्व मंत्रांचा राजा) ॐकार मंत्र आहे व तो उच्चारण्याचे अनेक फायदे आहेत, जयदेवाने ॐकार उच्चारणाची नेमकी पद्धत शिकून घेतली व नियमितपणे जप करण्यास सुरुवात केली.
त्याचा परिणाम असा झाला की, त्याची प्रकृती हळूहळू सुधारू लागती. कारण त्याचा श्वासोच्छ्वास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास ॐकार उच्चारल्याने मदत झाली. त्याचबरोबर जयदेवाचे मनही स्थिर झाले. लवकरच तो अभ्यासावर व खेळावर लक्ष केंद्रित करू शकला, तो अत्यंत आरोग्यसंपन्न व हुशार झाला, त्याने आपले शिक्षण पूर्ण केले व तारुण्यात पदार्पण केले. तरीही त्याने ॐकाराचा जप सोडला नाही. त्यामुळे त्याचे जीवन सुखी व यशस्वी झाले.
जयदेव आता म्हातारा झाला आणि एके दिवशी देह ठेवण्याची वेळ आली. जयदेव उठून बसला व त्याने मोठ्याने प्रणवाचा उच्चार केला आणि पाहता पाहता त्याचे मर्त्य शरीर टाकून, ज्या ॐकारातून तो आला होता, त्यात विलीन झाला. याप्रमाणे ॐकाराने जयदेवाला केवळ ऐहिक सुख नव्हे तर मोक्षही मिळवून दिला.
[Illustrations: Priyadarshnee, Sri Sathya Sai Balvikas Student]
[Source: Sri Sathya Sai Balvikas Guru Handbook Group I]