जन्माष्टमी
जन्माष्टमी हाच तो दिवस आहे जेव्हा आपण भगवान कृष्णाचे भूतलावर झालेले आगमन साजरे करतो. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करुन धर्म संस्थापना करण्यासाठी ते भूतलावर अवतरले. श्रावण (ऑगस्ट-सप्टेंबर) महिन्यातील कृष्ण पक्षात अष्टमीला त्यांचा जन्म झाला.
ह्या अवताराने आपल्याला भगवद्गीता दिली जी भूतलावरील जीवनासाठी आपल्याला चिरंतन, मार्गदर्शक आहे.
भगवान कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्यामुळे लोक दिवसभर उपवास करतात आणि भजन, गायन, भागवत ग्रंथाचे पठण वा भगवान कृष्णाच्या जीवनातील प्रसंग सांगणारी स्तवने गाऊन रात्रभर जागरण करतात.
मंदिरांमधूनही हा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि विशेषतः भगवान कृष्णाच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या वृन्दावन, मथुरा आणि द्वारका ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो.
महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये दुसऱ्या दिवशी तरुण मुले दही ताकाने भरलेली हंडी ऊंच टांगतात व मानवी शंकुच्या आकाराचा मनोरा रचून त्या हंडीपर्यंत पोहचून ती फोडतात. ते पाहून आपल्याला बालकृष्णाच्या खोड्यांची आठवण होते.