‘नमोस्तुते’ चा गर्भितार्थ
प्राचिन् भारतीय संस्कृती व अध्यात्म ह्यांच्यानुसार दुसऱ्या व्यक्तीचे स्वागत करताना , त्याच्यासमोर नतमस्तक होऊन दोन्ही हात हृदयस्थानी जोडून ,’नमोस्तुते’ वा ‘नमस्ते’ म्हणण्याची पारंपारिक पध्दत आहे. जेव्हा आपण एकमेकांचे अशा पध्दतीने स्वागत करतो त्याचा अर्थ, “आपल्या मनांचा मिलाप होवो” नतमस्तक होण्यातून, प्रेम आदर आणि विनयशीलता हे भाव व्यक्त केले जातात. सर्वांमध्ये असणारे दिव्यत्व व तुमच्या आणि माझ्यामध्ये असणारे दिव्यत्व एकच आहे हे सत्य ह्यामधून प्रतीत केले जाते. लहान, थोर, समवयस्क वयस्कर, मित्र आणि अनोळखी व्यक्तीचे स्वागत ह्याच पध्दतीने केले जाते.
ह्या प्रघाताचा आरंभ कसा झाला? ह्याची एक सुरस कथा आहे. हिमालयामध्ये एका महान ऋषींचा आश्रम होता. तेथे ते ऋषि आपल्या शिष्यांसह वास्तव्य करत होते. शिष्य ऋषिंचा केवळ त्यांच्या ज्ञानासाठीच नव्हे तर त्यांचे सर्वांसाठी असणारे प्रेम वा दयाळुपणा ह्यासाठी त्यांचा आदर करत होते. त्यांच्या दयाळू स्वभावामुळे ते बऱ्याचवेळा आध्यात्मिक दृष्टया अपरिपक़्व शिष्यांचाही स्वीकार करत असत. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या काही शिष्यांमध्ये त्यांच्या मूर्खतेमुळे गैरसमज व कलह झाले. त्यामुळे आश्रमातील शांती भंग पावली.
ऋषि त्यांना वारंवार उपदेश करत होते. तरीही त्यांचे अपरिपक़्व वर्तन पाहून एक दिवस ऋषि अत्यंत उद्विग्न झाले. परंतु त्यांची दयाळू वृत्ती आश्रमातून त्या. शिष्यांना बाहेर काढण्यास अनुमती देत नव्हती. त्या ऐवजी त्यांनी परमेश्वराकडे ह्यावरील उपायासाठी प्रार्थना केली. अनेक दिवस उपवास केले, अनेक दिवस ध्यान आणि प्रार्थना केली. काही दिवसांनी त्यांना परमेश्वराचे दृश्य दिसले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारले. त्यांनी सर्व सविस्तर सांगितले व त्या शिष्यांना द्वेष आणि क्रोध ह्यापासून मुक्त करण्यासाठी, परमेश्वरास आश्रमात येण्याची विनंती केली. परमेश्वराने एक अट घालून त्यांची विनंती मान्य केली. ती अट अशी होती की तो तिथे एका शिष्याच्या वेशात तेथे येईल आणि तो परमेश्वर आहे हे कोणालाही माहिती नसेल. ऋषींनी त्यांना दिसलेले दृश्य व त्यांच्यामधील एक बनून आश्रमात येण्याचा परमेश्वराचा निर्णय ह्याविषयी सर्व शिष्यांना सांगितले. सर्व शिष्य अत्यंत आनंदीत झाले. परंतु परमेश्वर कोणत्या रूपात येईल हे त्यांना माहित नव्हते. त्यामुळे ते समोरच्या शिष्याच्या रूपत परमेश्वर असू शकेल ह्या विचाराने एकमेकांची कदर करत व सौजन्याने वर्त्तन करत होते.
असे करता करता, काही महीने सरले, आणि त्यांच्या अन्तःकरणात आणि आश्रमात शांती प्रस्थापित झाली. त्यांना त्यांच्या शुद्ध अन्तःकरणामध्ये परमेश्वराचे
आनंददायी अस्तित्व जाणवू लागले. ते एकमेकाला प्रत्यक्ष परमेश्वर
मानून वागू लागले! संपूर्ण आश्रम सकारात्मक आनंददायी स्पंदनांनी दुमदुमुन गेला! त्या महान ऋषींनी आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांचे अनुभव इतरांना सांगून त्यांनाही एकमेकांचा आदर करण्यास व प्रत्येकामधील दिव्यत्वाचा आदर करण्यास प्रेरीत केले. तेव्हापासून प्रत्येकजण दुसऱ्याचे स्वागत करताना हात जोडून नमस्ते म्हणू लागले.
भगवान बाबांनी २० मार्च २०११ च्या सायंकाळी जी कृती केली तिचे ह्याठिकाणी स्मरण करणे प्रसंगोचित ठरेल. जरी त्यांच्या त्या कृतीने साई कुलवंतमधील प्रत्येकाच्या संवेदना बधिर झाल्या असल्या तरी गतगोष्टींचा विचार करता, ती कृती अर्थपूर्ण होती. अवताराची कोणतीही कृती कमी महत्त्वाची नसते. (अर्थशून्य नसते) त्याची प्रत्येक कृती मानवजातीसाठी गर्भितार्थाने भरलेली व महत्त्वाची असते.
तो रविवारचा दिवस होता. वास्तविक भगवान श्री सत्य साई बाबांचा स्थूल रूपाचा अखेरचा रविवार. भजन संपले. आरती ओवाळण्यात आली. साई कुलवंत हॉलमध्ये “समस्ता लोकाः सुखिनो भवंतु” चे स्वर निनादत होते. व ते सुरु असतानाच स्वामींनी हळुहळु त्यांचा उजवा हात वर केला.त्या काही सेकंदांसाठी हात वर ठेवण्यासाठी ते खरोखरच त्यांच्या सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे जाऊन प्रयास करत होते. त्यांच्या हाताला किंचित थरथर होती. त्यांचा हात थरथरत होता. त्यांनी महत प्रयासांनी त्यांचा दुसरा हातही उचलला. परंतु त्यांच्या डाव्या हाताचा तळवा उघडला नाही. दोन्ही हातानी आशीर्वाद देणाऱ्या पवित्र्यात हात उंचावले. मोठ्या कष्टांनी त्यांनी डावा तळवा उजव्या तळव्यास जोडला. मला वाटले, “स्वामी त्यांच्या नाजुक उजव्या हातास डाव्या हाताने आधार देत आहेत” तथापि काहीतरी अक्षरशः अनपेक्षित व अपूर्व गोष्ट घडली.
सर्वजण त्यांचे दोन्ही हात आशीर्वादासाठी उंचावलेले पाहण्याची अपेक्षा करत होते. स्वामींनी त्यांचे हात जोडून ‘नमस्ते’ मुद्रा करून सर्वांना थक्क केले. प्रथम त्यांनी पुरुषांच्या बाजूस आणि नंतर सावकाशपणे डावीकडे वळून तमिळनाडुच्या बाल विकास गटाकडे व त्यानंतर महिलांच्या बाजूसही ‘नमस्ते मुद्रा’ केली. सर्वजण स्वामींकडे आश्चर्याने व गोंधळेल्या मुद्रेने पाहत असताना स्वामींची खुर्ची पुढे जाऊ लागली. ते गाडीत बसले व काहीही नेहमीपेक्षा वेगळे घडले नसल्यासारखे निघून गेले.
अवताराने देहत्याग केल्यानंतर ह्या घटनेच्या गर्भितार्थाने माझ्यावर जणूकाही वीज कोसळली कारण भारतामध्ये साधारणतः आदरपूर्वक दुसऱ्याचे स्वागत करण्यासाठी हात जोडून नमस्ते म्हटले जाते. आणि येथे भगवानांनी हे आमच्यासाठी केले; ज्यायोगे हा संदेश आमच्या मनावर आणि हृदयावर कायमचा उसवला जावा.
[Source-:http://media.radiosai.org/journals/vol_11/01 JUL 13/sai-sadguru the preceptor-unparalleled-bhagawan-srisathya-sai-baba.htm]
बाबा साक्षात श्री गणेश आहेत हे दर्शविणारी घटना.
तिरुवन्नमलईचे गुरु श्री रमण महर्षी ह्यांचे देहावसान झाल्यानंतर स्वामी अमृतानंद बाबांकडे आले. अमृतानंद प्रथम प्रशांतीला आल्यानंतर बाबांनी त्यांना ‘अमृतम’ नांवाने संबोधित केले. त्या हाकेमधील स्नेहभाव आणि आप्तभाव जाणवून अमृतानंद आचंबित झाले. ते म्हणाले, “केवळ रमण महर्षी ज्यांच्याबरोबर मी १७ वर्षे व्यतीत केली, तेच मला अशा पद्धतीने हाक मारत असत.!”
त्यानंतर ८५ वर्षांच्या स्वामी अमृतानंदांना बाबांनी गणपती होमाविषयी विचारले. अमृतानंदानी वयाच्या ७व्या वर्षी ४१ दिवस हा होम केला होता! स्वामी अमृतानंदांनी बाबांना यज्ञाचे सर्व बारीक सारीक तपशील सांगितले. अग्निमध्ये आहुती देताना उच्चारण केलेला मोठा मंत्रही त्यांनी सांगितला. बाबांनी ‘ॐ श्रीम ह्रीम क्लिं ग्लौम गं’ हा मंत्र उघड केला. बाबांनी त्यांना सांगितले की त्यांनी स्वतः ४१ दिवस दररोज १००० वेळा तो मंत्र म्हटला होता. आणि त्या पवित्र अग्नीमध्ये अनेक नारळांची आहुतीही दिली होती. “परंतु शास्त्रांमध्ये त्याचे फलीत काय सांगितले आहे?” असे बाबांनी वयोवृद्ध संन्याशास विचारले. त्यावर ते उत्तरले, “जर विधींचे काटेकोरपणे पालन करून हा यज्ञ केला तर होमकुंडामध्ये सुवर्ण वर्णी तेजोमय, गजमुखी देव म्हणजेच साक्षात गणपती प्रकट होईल व त्याच्या सोंडेमध्ये तो पूर्णाहुतीचा स्वीकार करेल आणि त्याच्या दर्शनाने तो अक्षय्य आनंद प्रदान करेल.” त्यांना दर्शन झाले का असे बाबांनी त्यांना विचारले. स्वामी अमृतानंद उत्तरले की केवळ संख्या आहुतींचे परिमाण आणि मंत्रामुळे ७ वर्षाच्या मुलाला परमेश्वराचे दर्शन होणे सोपे नव्हते. बाबांनी मध्येच त्यांच्या बोलण्यास अटकाव करत म्हटले, “नाही, नाही. त्या सर्व मंत्रांमुळे,” सर्व आहुतींमुळे तू आज माझ्याकडे आला आहेस. आज तुला ७८ वर्षांच्या अवकासानंतर शास्त्रांमध्ये उल्लेख केलेले फल प्राप्त होईल.
त्यांनी स्वामी अमृतानंदांना त्यांच्याकडे पाहण्यास सांगितले, अमृतानंदांनी बाबांकडे पाहिले आणि त्यांना शास्त्रांमध्ये वर्णन केल्या प्रमाणे सुवर्णवर्णी गजमुखी गणपतीचे दर्शन झाले. त्यांचे अंतःकरण हर्षोल्हासाने व आनंदाने गहिवरले. दर्शनानंतर चार दिवस ते त्याच मनोवस्थेत होते आणि त्यांची तहान, भूक आणि झोप हरपली होती.
[Source: http://media-radiosai.org/journals/vol_09/01 SEPT 11/05_ganesh_chaturthi_1.htm]