स्तोत्रासंबंधी गोष्ट
भगवान विष्णूचे वर्णन शान्ताकारं म्हणजे सदैव शांती युक्त स्थिर मनाचा असे केलेले आहे. एकदा कश्यप ऋषी यज्ञ करीत होते आणि तो पाहण्यासाठी सगळे ऋषी जमले होते. सगळ्या देवतांमध्ये श्रेष्ठ, कोण अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. नारद मुनी म्हणाले की ब्रह्मा, विष्णु व महेश्वर सगळेच श्रेष्ठ आहेत पण भगवान विष्णु सर्वश्रेष्ठ आहेत. स्तुती किंवा निंदा कशानेही ते अस्वस्थ होत नाहीत. ते सर्वदा शांतीयुक्त आणि आनंदनिर्भर असतात. ऋषींनी नारदाना हे सिद्ध करायला सांगितलले. नारदांनी भृगु ऋषींना बाजूला बोलावले आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. नारदाच्या विधानातील सत्य पडताळून पाहण्यासाठी भृगूना पाठविण्यात आले.
प्रथम ते ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेव त्यांच्या सृजनाच्या कार्यात गढून गेलेले त्यांनी पाहिले. भृगूंनी दुरुनच ब्रह्मदेवाची निंदा सुरू केली. ते म्हणाले, “ब्रह्मदेवा! तुला सुष्टिकर्माची पुरेस ज्ञान नाही! तुझी सृष्टी दोषांनी व उणिवानी भरलेली आहे. म्हणून तुझे सारे प्रयत्न व्यर्थ आहेत. तुझ्या सृष्टीतली कोणतीही गोष्ट स्तुत्य नाही!” हे शब्द ऐकून ब्रह्मदेवाला चीड आली, तो आपल्या आसनावरून उठला व भूगु ऋषींना शासन करण्यास सरसावला. पण भृगु ऋषींनी ब्रह्मलोकातून काढता पाय घेतला मग ते शिवलोकात गेले. शिव तांडवनृत्यात मग्न असलेले त्यांनी पाहिले. काही अंतरावरूनच त्यांची शिवावर टीका करायला सुरवात केली. ते म्हणाले, “देवा! आपल्यावर सोपविलेल्या विभागाकडे तू मुळीच नीट लक्ष देत नाहीस. जगातील पापाचा नाश करणे हे तुझे काम आहे. पण आज तर जग पापमय झाले आहे. तू दिवसभर नाचत बसतोस आणि नेमून दिलेले काम मुळीच करत नाहीस. मग आम्ही तुझी पूजा कशाला करावी?” हे ऐकून शंकराला राग आला आणि तो तिसरा डोळा उघडून भृगूचे भस्म करणार तोच ते तेथून त्वरेने निघून गेले.
नंतर ते वैकुठात गेले. भगवान विष्णु शेषावर पहुडले होते, भगवान भक्तासाठी उठून येत नाहीत, तर निजानंदात मग्न आहेत हे पाहून भृगु फार रागावले. ते भगवंतापाशी गेले आणि त्यांच्या छातीवर त्यांनी जोरदार लाथ मारली. त्यानंतर या कृत्याच्या परिणामाची भृगूंना भीती वाटली व ते घाईघाईने निघून जायच्या बेतात होते तोच भगवान विष्णू आपल्या आसनावरून उठले आणि भुगूंच्या पाया पडले. हे पाहून भृगुंना परमावधीचे आश्चर्य वाटले. भगवंत महणाले, “ऋषिवर्य! आपले आगमन मला कळले नाही आणि मी आपल्याकडे दुर्लक्ष केले याबद्दल मला कृपा करून क्षमा करा. माझ्या लोखंडासारख्या छातीवर आपटल्यामुळे आपला पाय दुखावला असेल, आपला पाय मी दाबून देतो आणि आपल्याला आराम पडेल असे करतो!” केवढी ही सहनशीलता! किती शांत ही स्थिती! हे शब्द ऐकून भृगु थक्क झाले आणि त्यांनी भगवंतांची क्षमा मागितली.
मग भृगु यज्ञ स्थळी ऋषींच्या सभेत परतले आणि त्यांनी सर्व हकीकत सांगितली. ती ऐकल्यावर फक्त भगवान विष्णूच ‘शांताकार’ आहेत यावर ऋषींचा विश्वास बसला आणि त्यांचा संशय नाहीसा झाला.