दान आणि क्षमा
प्रेषित महंमद जगाला त्याचा ‘इस्लाम’ नावाचा नवीन धर्म सांगत होता. सत्य, प्रार्थना, शांती व प्रेम यांचा संदेश लोकांमध्ये प्रसृत करणारा तो सत्पुरुष होता. महंमदाने इस्लाम शिकवायला सुरवात केल्यावर त्याला विरोध करणारी पुष्कळ माणसे होती. अज्ञानामुळे काहीजण त्याच्याशी सहमत होत नव्हते. काहींना त्याच्या वाढत्या लोकप्रियतेचा मत्सर वाटत होता.
लोकांच्या मनात त्याच्याविषयी द्वेष उत्पन्न व्हावा म्हणून त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्याबद्दल खोट्यानाट्या वदंता पसरवायला सुरुवात केली. काहींनी तर त्याच्यावर हल्ला करून त्याला इजा करण्याचा बेत केला. या विरोधकांमध्ये एक अरबी म्हातारी होती. दिवसेंदिवस महंमदाच्या अनुयायांची संख्या पाहून तिला आपला क्रोध आणि त्याच्याविषयीचा द्वेष आवरेना.
एके दिवशी तिला आनंदाची बातमी कळली की रोज सकाळी महंमद तिच्या घरावरूनच मशिदीकडे जातो. त्याच दिवशी तिने आपल्या घरातील सारा केरकचरा एका थाळीत जमा केला आणि ती तयार राहिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी महंमद येत असताना ती तिच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेली आणि तो सर्व कचरा तिने त्याच्या डोक्यावर ओतला. पण महंमदाने वर पाहण्याची सुद्धा तसदी घेतली नाही. अस्वस्थ न होता डोक्यावरचा व अंगावरचा कचरा झटकीत तो मशिदीकडे चालतच राहिला. त्याची अवस्था पाहून त्या बाईला मात्र खूप हसू आले, ती स्वतःशीच म्हणाली, “छान! छान! रोज सकाळी मी त्याचं असंच स्वागत करणार आहे!”
महंमदाचा अपमान करण्यासाठी तिने हा खोडसाळपणा रोज सकाळी चालूच ठेवला. पण तिच्या असे लक्षात आले की तो त्याकडे गंभीरपणे पाहातच नाही. खरे तर तिच्या खोडसाळपणाला त्याने दिलेल्या थंड प्रतिसादामुळे तिचा प्रत्येक दिवशी जास्तच भडका होऊ लागला.
एके दिवशी तिच्या घरापासून जाताना महंमदाच्या एकाएकी लक्षात आले की गेले तीन दिवस त्याच्या डोक्यावर कचरा पडलेला नाही. त्याला आनंद वाटण्याऐवजी चिंता वाटली. “आज कचरा का बरं पडला नाही? ही खोडी काढलेली माझ्या अनुयायांना कळल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला सजा तर दिली नसेल ना? काहीही असले तरी आत जाऊन त्या व्यक्तीचं काय झालय् ते मला पहिलंच पाहिजे.”
महंमद वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने दरवाजा ठोठावला. दार अर्धवट उघडे होते. एक क्षीण आवाज आला, “आत या.” आत पाऊल टाकताच त्याला दिसले की एक म्हातारी बाई बिछान्यावर पडली होती. ती आजारी दिसत होती आणि वेदनेने विव्हळत होती. महंमद प्रेमळ स्वरात म्हणाला, “आई, तुम्ही फार आजारी दिसता. काही औषध घेतलंत का?” “माझी शुश्रूषा करायला या घरात दुसरं कोणी नाही. मला गरज पडली तर मीच कशीबशी उठून घेते!” म्हातारी म्हणाली.
गेले तीन दिवस वाढत गेलेल्या तिच्या आजाराची हकिगत महंमदाने ऐकली आणि तो बाहेर गेला. थोड्या वेळाने हातात एक बाटली घेऊन तो परत आला. “मी तुमच्यासाठी हकिमाकडून औषध आणलं आहे,” बोलता बोलता महंमदाने त्यातील थोडे औषध एका पेल्यात ओतले. इतकं दिवसातून तीनदा घ्या म्हणजे लवकरच तुम्ही अगदी ठीक व्हाल.”
महंमदाच्या अंत:करणाची निर्मलता पाहून म्हातारीला गहिवरून आले, “किती सहनशील, प्रेमळ आणि क्षमाशील महात्मा आहे हा!” ती स्वतःशीच विचार करू लागली. कारण तिचे हृदय पश्चात्तापाने ओसंडत होते. “तू खरंच सत्पुरूष आहेस.” ती अडखळत बोलली, “तुझ्याविरुद्ध वागून केलेल्या पापाबद्दल देव मला कधीतरी क्षमा करील का? कृपा करून मला देवाकडे जाण्याचा योग्य मार्ग दाखव.”
महंमद तिला म्हणाला, “आई, वाईट वाटून घेऊ नका, देव सर्वशक्तिमान्, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी आहे असा जर तुमचा विश्वास असेल तर तो तुमच्या पासून कधीही दूर जाणार नाही. पण केवळ पूजेने तो प्रसन्न होत नाही. सर्वाविषयी निष्काम प्रेम आणि प्रार्थना, सत्यवादित्व, क्षमाशीलता, दयाबुद्धी, सेवा आणि नि:स्वार्थ त्याग यांच्याद्वारा ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणे– फक्त याच गोष्टींनी आपण देवाचे लाडके होतो.”
प्रश्न:
- अरबी म्हतारीने कोणती चूक केली?
- महंमदाने तिला कोणता धडा शिकवलं?
- आपण देवाचे लाडके कसे होऊ?