उत्तम काय ते देवालाच माहीत
परमेश्वराने सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण केले, आपण राहतो ती सुंदर पृथ्वी देखील त्यानेच निर्माण केली. तो आपला सर्दशक्तिमान पिता आहे, आपण त्याची लाडकी मुले आहोत. आपण परमेश्वराशी श्रध्देने व प्रेमाने बोललो की परमेश्वर संतुष्ट होतो. आपण मूकपने घातलेल्या हाका अथवा केलेल्या प्रार्थनासुद्धा त्याला ऐकू येतात. पण एक लक्षात ठेवा. अगदी अंतःकरणापासून हाक मारलेली असली पाहिले आणि आपली प्रार्थना योग्य वस्तूसाठीच असावी नाहीतर देव अप्रसन्न होईल आणि आपण दुःखी होऊ.
मोहूर नावाच्या खेड्यात शंभू नावाचा चांभार राहात होता. अगदी शेजारच्या खेड्यांनासुद्धा तो प्रामाणिक व धार्मिक वृत्तीचा म्हणून माहिती होता. तो दिवसभर नवे जोडे शिवण्याचे व जुने दुरुस्त करण्याचे काम करीत असे. त्यातून सगळ्या कुटुंबाला पोसण्याइतकी कमाई होई.
एक दिवस मोहूर व इतरा जवळच्या खेड्यांचा जमीनदार शंभूच्या छोटया झोपडीजवळून गेला. त्याने अत्यंत भारी कपडे परिधान केलेले होते आणि एखाद्या राजासारखा तो घोड्यावरून दौड़त गेला. “अरेच्या! तो पहा आमचा जमीनदार चालला आहे.” शंभू म्हणाला, “वीस खेडी त्याच्या मालकीची आहे. सोन्याची खण विकत घेण्याइतकी संपत्ती त्याच्यापाशी आहे. त्याचे जीवन आनंदी व सुखी आहे. आणि इथे हा मी दिवसभर कातडे, कापत व शिवत बसलो आहे. देवसुध्दा माझ्यााशी असा कठोर का झाला आहे?”
शंभूच्या मनात देवाचा विचार आल्याबरोबर त्याची नजर भिंतीवरील श्री विठ्ठलाच्या चित्राकडे गेली. निरागसपणे शंभू आपल्या लाडक्या देवाशी बोलू लागला, “भगवंता! तू माझा सर्वशक्तिमान पिता आहेस. तू माझी प्रेमळ माता आहेस. सकाळपासून रात्रीपर्यंत मी काम करतो तू पाहतो आहेसच तुला माझी दया येत नाही काय? मला रहायला मोठे घर दे ज्वारी पिकवायला एक शेत दे आणि माझ्यासाठी आणि बायको मुलांसाठी काही छान छान गोष्टी खरेदी करण्यासाठी धन दे!”
शंभू हे शब्द उच्चारत असतानाच, विठ्ठल हसल्याचा त्याला भास झाला. तो स्वतःशीच म्हणाला, “विठ्ठलाने माझी प्रार्थना ऐकली हे नक्की. पण तो हसला का? मी अवाजवी मोठी मागणी तर केली नाही ना?”
त्या रात्रि विठ्ठल जमीनदाराच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, “मोहूरचा चांभार माझा भक्त आहे तू त्याला मदत करावीस अशी माझी इच्छा आहे. त्याला एक मोठ घर बांधून दे. सोन्याच्या नाण्यांनी भरलेल एक भांडे दे. दोन एकर जमीन त्याच्या नावावर करून दे म्हणजे माझी कृपा तुला प्राप्त होईल.”
विठ्ठलाच्या आज्ञेप्रमाणे जमीनदाराने सर्व काही केले. शंभूचा स्वतःच्या भाग्यावर विश्वास बसेना. त्याने चामडे व जोडे करायचे सोडून दिले. त्याचे सारे कुटुंब शेतावर काम करू लागले, नांगरणी, पेरणी करू लागले. आपल्याला ज्या काही इच्छा होत्या त्या सर्व देवाने पूर्ण केल्या असे त्याला वाटू लागले.
परंतु लवकरच शंबूला त्रास सुरू झाला. त्याच्या नव्या घरात लांबून लांबून येऊन नातेवाईकांनी तळ ठोकळा. रोज कोणत्या ना कोणत्या कारणांवरून त्यांच्यात भांडणे होऊ लागली. शंभूला त्यांच्या सोन्याच्या नाण्यांसाठी कोणतीही सुरक्षित जागा सापडेना. शेवटी त्याने ती नाणी शेताच्या एका कोपऱ्यात पुरुन ठेवली. पण चोर तो ठेवा लुटून तर नेणार नाहीत ना या भीतीने त्याची मनःशांती नाहीशी झाली आणि त्याची झोपच उडाली. त्यावर्षी पिकेही फारशी आली नाहीत.
शंभूच्या जीवनातील शांती व आनंद नाहीसा झाला दिवसेंदिवस तो जास्तच खिन्न व अशक्त होऊ लागला. पण त्यामुळेच तो अधिक शहाणा झाला. एके दिवशी विठ्ठलाच्या चित्रासमोर उभा राहून तो म्हणाला, “देवा! मी घर, द्रव्य आणि जमीन मागितली. त्यावेळी का हसलास हे मला कळले आहे. त्या गोष्टींनी माझा आनंद वाढला नाही, उलट त्यांनी माझी शांती, समाधान, गाढ झोप, उत्तम प्रकृती आणि आनंद हिरावून घेतला आहे. माझा स्वार्थीपणा व हावरटपणा याबद्दल मला क्षमा कर. माझं कष्टाचं प्रामाणिक काम मला परत दे. नवीन जोडे बांधून किंवा दुरुस्त करून माझ्या बंधू-भगिनींची सेवा मला करू दे। माझं अतःकरण भक्तिप्रेमाने भरून टाक. यापुढे मी माझं कर्तव्य करीन आणि बाकीचा भार तुझ्यावर टाकीन. तुझ्या लाडक्या लेकंराचं हित कशात आहे ते तुलाच सगळ्यात चांगले माहिती आहे देवा.”
प्रश्न:
- आपण देवावर प्रेम का केले पाहिजे?
- देवाने जे हवे ते दिले तरी शंभू चांभार दुःखी का झाला?
- “समजा देवाने,” तुला काय आवडते? असे विचारले तर तुम्ही काय उत्तर द्याल?