प्रयत्न हाच माणसाचा मोठेपणा आहे
एका संध्याकाळी पटांगणात चार मुले खेळत होती. खेळता खेळता ती मुले जेव्हा त्या पटांगणाच्या एका कोपऱ्यापाशी आली तोच त्यांना जमिनीतून बारीकसा आवाज आला, “अरे अरे इथे खणा आणि मला बाहेर काढा. मी तुम्हाला काय हवे ते देईन.”
जमीन थोडा वेळ खणल्यावर मुलांना एक लहान पण तेजस्वी दिवा सापडला. “अरे, मी अल्लाउद्दिनचा जादूचा दिवा आहे.” तो दिवा म्हणाला, “तुम्ही माझे बोलणं ऐकलं नाही का! अरे तुम्ही जे मागाल ते मी देऊ शकतो. आता मला सांगा तुमच्या पैकी प्रत्येकाला काय पाहिजे?”
ज्या मुलाने पहिल्यांदा उत्तर दिले तो म्हणाला, “मला खेळायला खूप आवडत. म्हणून मला क्रिकेटची बॅट, विकेटस् (स्टंप्स) आणि खेळाचे इतर साहित्य दे.” दुसरा मुलगा म्हणाला, “आमचे गुरुजी रोज गृहपाठ देतात, म्हणून तू रोज येऊन तो करून देत जा. तिसरा म्हणाला, “कितीतरी लोक रस्त्यावर भीक मागतात. त्या सर्वाना वाटता येईल इतके द्रव्य मला दे.”
शेवटच्या मुलाचे उत्तर अगदीच वेगळे होते – तो म्हणाला, “जादूच्या दिव्या! आम्हाला काहीही देण्यापूर्वीच तू अदृश्य हो बर! देवाने आम्हाला डोळे, कान, नाक, जीभ, हात आणि पाय दिलेले आहेत. ते बुध्दी वापरून कठोर परिश्रम करण्यासाठीच आहेत. स्वतःला आणि दुसऱ्याला सुखी करण्यासाठी आम्ही त्यांचा पूर्णतया वापर करायला हवा. माणसाचा मोठेपणा त्याच्या प्रयत्नातच आहे. तुझ्यामुळे आम्ही भीक काय म्हणून मागायची? आणि देवाच्या या देणग्या कशाला वाया घालवाव्यात?”
जादूच्या दिव्याला चौथ्या मुलाची इच्छा सर्वात जास्त आवडली आणि तो क्षणात अदृश्य झाला.
प्रश्न:
- पहिल्या तीन मुलांच्या इच्छांमध्ये काय चूक होती?
- जादूच्या दिव्याला शेवटच्या मुलाचे उत्तर का आवडले?
- समजा जादूचा दिवा तुमच्या समोर आला, तर तुम्ही त्याच्याजवळ काय मागाल?