मातृ देवो भव (आई देव आहे)
सायंकाळचे चार वाजले होते. आकाश काळ्याभोर ढगांनी भरलेले होते आणि पावसाच्या सरीने रस्ते ओले केले होते. शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थांच्या झुंडी शाळेच्या दारातून बाहेर पडू लागल्या. शक्य तेवढ्या लवकर त्यांना घरी पोचायचे होते.
शाळेच्या दाराशी एक म्हातारी बाई बऱ्याच वेळापासून उभी होती. तिला रस्ता ओलांडायचा होता. पण पावसात चिंब भिजल्याने तिचे अशक्त म्हातारे शरीर थरथर कापत होते. कोणाच्यातरी मदतीखेरीज त्या निसरड्या रस्त्यावरून चालण्याचे धाडस दिला होईना, पण तिच्याजवळून जाणाऱ्या कोणीही तिला मदत करण्याची तसदी घेतली नाही. शाळेची पुष्कळ मुलेही तिथे होती. पण तिच्याकडे लक्ष न देता ती सर्व घाईघाईने निघून गेली.
शेवटी मोहन आला. त्याचे निकोप शरीर तो चांगला खेळाडू असल्याचे दर्शवीत होते. शाळेच्या फुटबॉल संघाचा तो कर्णधार होता. शाळेच्या दारातून बाहेर पडल्याबरोबर ती असाहाय्य म्हातारी बाई त्याला दिसली. थोडावेळ तिच्याकडे पाहत तो उभा राहिला विचारात पडला आणि त्याला दुःख वाटले. त्याचे मित्र पटांगणावर खेळायला जाण्यासाठी त्याला मोठमोठ्याने हाका मारीत होते, त्या देखील त्याला ऐकू आल्या नाहीत. तो हळूच त्या म्हातारीजवळ गेला आणि गोड, प्रेमळ आवाजात तिला म्हणाला, “आई, तुम्ही अशक्त दिसता आणि थंडीने कुडक़ुडतही आहात, मी तुम्हाला मदत करू का?”
म्हातारीचा चेहरा आशेने व आनंदाने उजळला. एका क्षणापूर्वी अगदी एकाकी वाटत होते आणि जगात आपले कोणी नाही असे वाटत होते आणि आता इथे हा मुलगा तिला प्रेमाने ‘आई’ म्हणत होता तिला नदत करण्यासाठी तयारी सुध्दा दाखवत होता. ती म्हणाली. “बाळा! हा घसरडा रस्ता ओलांडायला मला मदत करतोस का? माझे घर समोरच त्या दुकानाच्या पाठीमागे आहे. मोहनने म्हातारीचा कापणारा हात आपल्या मानेभोवती घेतला आणि म्हणाला, “चला आई! सावकाश चला. तुम्ही घरी पोचेपर्यंत तुमच्याबरोबर येतो.”
ती दोघे बरोबर चालत असताना म्हातारी प्रेमाने मोहनशी बोलत होती, त्याचे खूप कौतुक करत होती. त्याला आशीर्वाद देत होती, त्याच्यासाठी प्रार्थना करत होती, त्याच्यापाशी आईवडिलांची आणि घरची चौकशी करत होती. तिच्या घराच्या दाराशीच मोहनने तिचा निरोप घेतला, तेव्हा तिने आपले दोन्ही हात वर उचलले आणि कृतज्ञतेने अश्रू डोळ्यात उभे असतांना ती त्याला म्हणाली, “बाळा! देव तुझ्यावर कृपा करो! तो तुला नेहमी सुखात ठेवो!”
मोहनला नवीनच ताकद आली आणि वेगळाच आनंद जाणवू लागला. जेव्हा तो मित्रांमध्ये गेला तेव्हा त्यांनी विचारले की त्याला माहितीसुध्दा नसलेल्या म्हातारीला मदत करण्यासाठी त्याने एवढी तसदी का घेतली! “मी तिला मदत केली कारण मला अस वाटल की ती कुणाची तरी आई असणार” मोहन गंभीरपणाने म्हणाला, “पण दुसऱ्या कोणाच्यातरी आईला तू का मदत केलीस?” एका मित्राने विचारल. “कारण जेव्हा माझी आई म्हातारी होईल आणि तिला मदत करायला मी तिच्याजवळ नसेन तेव्हा कोणीतरी तिला मदत करावी असं मला वाटतं म्हणून.”
मोहनच्या उत्तराने मुल चांगली प्रभावित झाली, “मोहनला आपल्या आईचा फारच अभिमान दिसतो” तो मित्र पुन्हा म्हणाला. “अर्थातच!” मोहन उत्तरला, “ज्याला आपल्या आईविषयी अभिमान नाही तो कधीच चांगला माणूस होणार नाही.”
प्रश्न:
- प्रत्येकाने मोहनप्रमाणे आपल्या आईवर प्रेम करावे का? का करावे?
- म्हातारीला का आनंद झाला? मोहनला कशाने आनंद झाला?
- तुमच्या पालकांना आनंद देणारे जे एखादे सत्कृत्य तुम्ही केले असेल त्याचे वर्णन करा.