काहीही निरुपयोगी नाही
प्राचीनकाळी मुले ‘गुरुकुलात’ जात असत आणि त्यांच्या शिक्षणासाठी अनेक वर्ष गुरुजवळ राहत असत. त्यांना हवे असलेले ज्ञान व शहाणपण त्यांना प्राप्त झाले की गुरुचे आशीर्वाद घेऊन ते परत जात असत आणि जीवनात स्थिरस्थावर होत असत, एकदा अशीच दोन विद्यार्थ्यांची घरी परतण्याची वेळ आली तेव्हा ते गुरुकडे गेले आणि म्हणाले, “गुरूदेव, आम्ही गुरुदक्षिणेच्या रूपाने आपल्याला काय द्यावे हे कृपया आम्हाला सांगा” शिष्यांचे आपल्यावरील प्रेम व कृतज्ञता पाहून गुरुदेव अतिसंतुष्ट झाले.
त्यांची भक्ती, शिस्त व जाणीव यामुळे गुरुही त्या शिष्यांवर प्रेम करीत होते, त्याची शिष्याकडून आणखी काही अपेक्षा नव्हती तथापि त्या शिष्यांच्या ज्ञानात थोड़ी भर टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला.ते शिष्याना म्हणाले, “बाळांनो, आपल्या गुरूकुलाच्या पाठीमागे असलेल्या अरण्यात जा आणि कोणालाही उपयोगी नसलेली वाळकी पाने माझ्यासाठी घेऊन या. गुरुजींनी केलेली चमत्कारिक मागणी ऐकून शिष्यांना फार आश्चर्य वाटले. पण प्रथमपासूनच आज्ञाधारक असल्याने ते गुरुजींच्या इच्छेनुसार अरण्यात गेले. अरण्यात शिरल्याबरोबर ते एक झाडाखाली जमलेल्या वाळलेल्या पानांच्या ढिगाऱ्यापाशी आले. ते शिष्य त्या ढिगाऱ्यातील काही वाळकी पाने घेऊ लागले, तोच एक म्हातारा शेतकरी त्यांच्याजवळ धावतच आला आणि म्हणाला, “मुलांनो, कृपा करून पाने पुन्हा त्या ढिगाऱ्यात टाका बर. मी ती गोळा केली आहेत आणि मी माझ्या शेतावर नेणार आहे. ती जाळली की त्याच्या राखेचे अत्युत्तम खत तयार होईल आणि त्यायोगे मला धान्याचे भरघोस पीक निळेल. “मुला पाने पुन्हा ढिगाऱ्यात टाकून दिली. पुढे गेल्यावर त्यांना वाळलेली पाने गोळा करणान्या तीन स्त्रिया दिसल्या. मुलानी त्याना विचारले, “या वाळलेल्या पानांचे तुम्ही काय करता?” “बंधूंनो”, त्यातील एक म्हणाली, आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी पाणी तापवायला जळण म्हणून मी ही वापरते.
यातली जी पाने चांगली असतात ना, ती चोयट्यांनी (बारीक, लहान काटक्या) शिवून आम्ही त्यांच्या पत्रावळी बनवतो त्या आश्रमात व देवळात भोजनासाठी वापरल्या जातात व त्यामुळे माझ्या मुलांना जेवू धालण्यासाती थोडा पैसा मी कमावु शकते. “दुसरीने सांगितले. तर तिसरी म्हणाली, “मी. केवळ एका विशिष्ट झाडाची वाळलेली पाने गोळा करते. माझे पती वैद्य आहेत. ते याचा उपयोग काही औषधे बनविण्यासाठी करतात. या औषधाच्या मदतीने ते अनेक दुखणी बरी करतात, त्यानंतर ते शिष्य अरण्यात आणखी आतमध्ये गेले त्यानी एका झाडाखाली काही वाळलेली पाने पाहिली.
ते पाहात असतानाच एक पक्षी ढिगाऱ्यावरून उडालेला त्यांनी पहिला. शिष्यांनी पाहिले की त्या पानांमधील एक वाळके पान, जवळच्याच झाडाच्या शेंडयावर वाळकी पाने व गवत यांच्या साहाय्याने तो जे घरटे बांधत होता त्यासाठी नेले होते, पक्षाला उपयोगी असणारी वाळलेली पाने घेऊन जायची त्याना इच्छा नव्हतीनंतर दोन्ही शिष्यांनी परत गुरुकुलात जाण्याचा निर्णय घेतला. वाटेत त्यांना एक तळे दिसले. त्यातल्या पाण्यावर एक मोठे सुकलेले पान तरंगत होते. “अरे ते बघ, एक मोठे सुकलेले पान पाण्यावर तरंगत आहे.”
ते नक्कीच कोणाच्याही उपयोगाचे नाही त्यांच्या पैकी एक जण म्हणाला. ते त्या तळ्यापाशी गेले आणि त्यांनी ते पान उचलले त्या पानावर दोन मोठ्या तांबड्या मुंग्या चालत होत्या हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्यापैकी एकाने ते पान हातात धरताच त्या मुंग्या चालायच्या थांबल्या. जणु त्या म्हणत होत्या– “हे सुकलेले पान म्हणजे आमचे प्राण वाचविणारी नाव आहे. हे पान जर नसते तर आम्ही बुडालो असतो.” त्यानंतर मात्र त्या शिष्यांनी तो व्यर्थ खटाटोप थांबविला. आणि ते गुरुकुलात परत गेले. त्यानी खिन्नस्वरात गुरुजीना सांगितले, “गुरुदेव, आम्हाला असे दिसून आलं की सुकलेल्या पानांचेही अनेकांना अनेक उपयोग आहेत आणि म्हणून आम्ही ती पाने आपल्याकडे आणू शकलो नाही. आम्ही पाहिलेली सगळी वाळलेली पाने या ना त्या कारणांसाठी उपयोगी पडत होती त्यामुळे आपण मागितलेली गुरुदक्षिणा आम्ही आपल्याला देऊ शकत नाही याबद्दल कृपा करून आम्हाला क्षमा करा.”
बाळांनो, “गुरुजीनी उत्तर दिले, “मला जी गुरुदक्षिणा हवी होती ती मला मिळाली आहे. आज तुम्ही जे ज्ञान मिळविले आहे तीच नाझी खरी गुरुदक्षिणा होय. अरे! साधे झाडाचे वाळलेले पानसुध्दा मोठ्या उपयोगाचे आणि मानवाला व कीटकाना मदत करणारे आहे. मग मानवी शरीर तर किती मूल्यवान व उपयोगी असेल? म्हणून तुमच्या शरीराचा नीट वापर करा.
गरजू, आजारी व वृध्द माणसांची सेवा करण्यासाठी या शरीराचा वापर करण्याची कोणतीही संधी सोडू नका आणि अज्ञानी व दरिद्री माणसांना मदत करण्याची संधी कधीही सांडू नका आज शिकलेला हा मोठा धडा कदापीही विसरु नका.
प्रश्न:
- अरण्यात, निरूपयोगी सुकलेली पाने शोधण्यासाठी गेलेले शिष्य निराश होऊन का परत आले?
- वाळलेली पाने आणि मानवी शरीर याबाबत गुरुंनी त्या दोन शिष्यांना कोणता धडा शिकवला?
- सामान्यतः निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या परंतु त्यांचा चांगला वापर करणाऱ्या योग्य व्यक्तीच्या हातात पडल्यास, उपयुक्त ठरू शकणाऱ्या दोन इतर पदार्थांचे वर्णन करा.
Narration: Ms. Shreya Pulli
[Sri Sathya Sai Balvikas Alumna]