ब्रह्मार्पणं – पुढील वाचन
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम|
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना||
(अध्याय- ४, श्लोक-२४)
यज्ञामध्ये प्रत्येक गोष्ट दिव्य आहे. ब्रह्माला अर्पण केलेले हवन द्रव्यही ब्रह्म आहे, यज्ञकर्त्याद्वारा दिव्य अग्निमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. ब्रह्मकर्मात स्थित होणारा निश्चितच त्याच्या परमेश्वर प्राप्तीच्या दिव्य ध्येयाप्रत पोहोचतो.
यज्ञ म्हणजे त्याग आहे. परमेश्वरास प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केला जातो. वैदिक विधींनुसार, यज्ञात पवित्र अग्निमध्ये आहुती दिल्या जातात. अग्निमध्ये जे जे काही अर्पण केले जाते ते परमेश्वराप्रत पोहोचते अशी श्रध्दा आहे.
बाबा म्हणतात, “यज्ञ ही एक दिव्य टपाल पध्दती आहे. यज्ञाचा पवित्र अग्नि म्हणजे टपाल पेटी होय. आहुती म्हणजे पत्रातील मजकूर. वेदिक स्तोत्रे म्हणजे पत्ता. यज्ञकर्त्याची श्रध्दा म्हणजे पाकिटावरील स्टॅंप आहे. जेव्हा ते पत्र परमेश्वराकडे पोहोचते तेव्हा तो मानवजातीस शांती व समृद्धिचे भरभरुन आशीर्वाद देतो.”
जो कोणी निरंतर परमेश्वराच्या अनुसंधानात राहुन जीवन व्यतीत करतो व सर्व कर्म परमेश्वरास अर्पण करण्याच्या भावनेतून करतो हे यज्ञकर्मच ते आहे. दररोज यज्ञ करा आणि समर्पण आणि भक्तीच्या पवित्र अग्निज्वालांमध्ये अहंकारी इच्छा आणि भावना, आवडीनिवडी, प्रबळ इच्छा व कर्म ह्या सर्वाची आहुती द्या.