पुरंदरदास
पुरंदरदास हे कर्नाटकात घराघरात पोहोचलेले नाव आहे. त्यांना दक्षिणभारत संगीताचे प्रवर्तक म्हटले जाते. त्यांनी ४,७५,००० भक्तिगीतांची रचना केली. एका भक्तीगीतात ते म्हणतात, “केदारनाथ ते रामेश्वर, या पवित्र तिर्थक्षेत्रांच्या प्रवासात मी ४,७५,००० भक्तीगीते लिहिली. या गीतांमधून मी प्रभू वासुदेव आणि त्यांचे सर्व अवतार तसेच माझे आध्यात्मिक गुरु, व्यासराय यांच्या महिम्यांचे वर्णन केले आहे.” पुरांदरदासांनी काही नवीन रागांची रचनाही केली आहे.
सर्वांना माहीतच आहे की प्रख्यात गायक संत त्यागराराजांनासुद्धा पुरंदरदासांकडून प्रेरणा मिळाली आहे. प्रत्येक दक्षिण भारतीय संगीतकार हा पुरंदरदासांच्या रचना गातच स्वतःची कारकीर्द सुरू करीत असतो. संगीताव्यतिरिक्त, त्यांचे साहित्य, त्यांचे लिखाण इतके संपन्न आहे; की ते सर्व काळ, सदैव लोकांच्या वाचनात, तसेच स्मरणात राहील. आपल्या देशाचे भाग्य की अशा महान संतांनी या भूमीत जन्म घेतला.
इ.स. १४८४ मध्ये पुण्यापासून 18 मैलांवर आसलेल्या पुरंदरगड येथे त्यांचा जन्म झाला. वरदप्पा आणि कमलादेवी यांना सप्तगिरीवरील तिरुपतीच्या प्रभू व्यंकटेश्वराच्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांनी बालकाचे नाव श्रीनिवास, हे प्रभूचे नाव ठेवले.
मुलाचे शिक्षण पूर्ण झाले. त्याने संगीत तसेच संस्कृतमधे शिक्षण घेतल्यावर सरस्वतीबाई नावाच्या सुशील मुलीशी त्यांचा विवाह संपन्न झाला. व्यापार व अर्थार्जनात तो इतका व्यस्त झाला की दानधर्माचा त्याला विसर पडला. तो अधिकाधिक लोभी बनला. प्रभूच्या ऐवजी तो संपत्तीचा पुजारी बनला. त्याने कधीही कोणास उचलून पैशांची मदत केली नाही. पत्नीसही त्याने तशी ताकीद दिली होती. त्याने नऊ करोडची संपत्ती जमा केली होती, म्हणून त्यास नवकोट नारायण असे नाव पडले.
तथापि, श्रीनिवास नायकच्या जीवनात लवकरच मोठी उलथापालथ होणार होती. परमेश्वर एकदा वृद्ध ब्राम्हणाच्या वेशात त्याच्या दुकानात आला. त्याने मुलाच्या मुंजीसाठी थोडी पैशांची मदत करावी अशी प्रार्थना केली. लोभी सोनाराने त्याला काही न देता दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. अशाप्रकारे आज उद्या करीत. त्याने सहा महिने घालवले, परंतु मदत केली नाही. शेवटी त्या वृद्ध गृहस्थाने श्रीनिवास नायकाचे हृदय परिवर्तन करण्यासाठी वेगळी योजना आखली.
तो वृद्ध ब्राह्मण सरस्वतीबाई घरात एकटी असताना घरी आला आणि तिच्याजवळ मदतीची याचना केली. त्याने तिला तिची हिऱ्याची नथ देण्यास सुचवले. तेव्हा एखाद्या सत्कार्यासाठी जर मदत होत असेल तर, असा विचार करून तिने लगेच नथ देऊन टाकली. वृद्ध ब्राम्हणाने तिला आशीर्वाद देऊन तो अदृश्य झाला.
नायकाच्या दुकानात येऊन त्या ब्राह्मणाने ती नथ त्याच्यापुढे करून ४00 रुपये देण्याची विनंती केली. नायक नाणी देण्यास का कू करीत होता. ब्राह्मण काहीही न घेता तेथून निघून गेला. नायकाने ती नथ त्याच्या तिजोरीमध्ये सुरक्षित ठेवली आणि दुकानास कुलूप लावले. तो धावतच घरी आला आणि पत्नीला तिची हिऱ्याची नथ दाखवण्यास सांगितले. पत्नी धावतच देवघरात गेली. तिनी देवाचा धावा केला.
देव तिच्या हाकेला ओ देत नाही, असे पाहून तिने विषाचा कप तोंडाशी धरला, आणि अचानक चमत्कार झाला! त्या विषाच्या कपात विठ्ठलाच्या अदृश्य हातांनी नथ टाकली होती! तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना! पती तिची वाट बघत होता. तिने लगबगीने नथ त्यांच्या हातावर ठेवली. तिने शांतपणे एक-एक करून सर्व दागिने अंगावरून उतरवले आणि म्हणाली, “किती दिवस सोने, संपत्तीचा लोभ धरुन बसणार आहात? मृत्यू आल्यावर आपल्याला रिकाम्या हातांनीच हे जग सोडून जायचे आहे. मला प्रभु कृपेशिवाय इतर काहीही नको.” असे म्हणत तिने सर्व अलंकार जमिनीवर फेकून दिले.
नायक तिचे बोलणे ऐकायला तिथे थांबलाही नाही. तडक दुकान उघडून त्याने घाईने तिजोरी उघडली. आश्चर्य म्हणजे, हिऱ्याची नथ तिजोरीत नव्हती! .
ह्या अद्भुत चमत्काराने त्याच्या जीवनाला निराळीच कलाटणी मिळाली. घोर पश्चातापाच्या व्याकूळ मनस्थितीतच तो घरी परतला. त्याने पत्नीच्या पायाशी अक्षरशः लोटांगण घातले. साश्रूनयनांनी तो उद्गारला, “सरस्वती! मी किती पापी आहे! प्रत्यक्ष परमेश्वरावर मी अविश्वास दर्शविला. माझी चूक अगदी अक्षम्य आहे! मी अगदी शरमिंदा आहे. माझे हृदय पिळवटून गेले आहे. तुझ्यावर परमेश्वराची कृपा आहे म्हणूनच तू सर्वसंगपरित्याग करतेस. दुकानात तिजोरीत ठेवलेली ती हिऱ्यांची नथ तुझ्याजवळ कशी बरे आली? कृपा करून मला सांगशील का? तू ही नथ त्या वृद्धाला दिली होतीस का? काय घडले ते मला सविस्तर सांग.”
सरस्वतीने, त्या ब्राह्मणास नथ दिल्याचे आणि नंतर तो कसा अदृष्य झाला आहे हे सविस्तर सांगितले. ती म्हणाली, “तो ब्राम्हण दुसरा कोणी नसून साक्षात पांडुरंगच होता.” हे सर्व ऐकल्यावर नायकाने पश्चात्तापाने, डोके आपटून घेत शोक व्यक्त केला. “अरे देवा, मी तुला पुन्हा कधी पहाणार? माझ्या दारी न कंटाळता सतत ६ महिने येणाऱ्या साक्षात परमेश्वराचा मी अपमान केला. मी किती पापी आहे.” असे म्हणत त्याची शुद्ध हरपली.
जिथे सरस्वतीने हिऱ्याची नथ ब्राह्मण म्हणून आलेल्या देवाला दिली, त्या ठिकाणी तो बसला. नंतर तीन दिवस त्याने आणि पत्नीने मोठ्या भक्तीभावाने उपवास केला आणि प्रार्थना केली. या दयाळू प्रभूने सरस्वतीच्या स्वप्नात येऊन सांगितले की तिच्या पतीने सर्व त्याग करून हरिदास बनावे, नंतरच त्याला प्रभूचे दर्शन होईल.
नायकाला प्रभुचा आवाज ऐकू येत होता, तथापि त्याला अजून प्रभूचे दर्शन मिळण्याची कृपा प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे त्याने तत्क्षणी सर्व त्याग करून सर्व संपत्ती गरीबांमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला. त्याला खरोखरीचे वैराग्य आल्यामुळे त्याने सर्वसंग परित्याग करून, पत्नी आणि चार मुलांसह तो सत्याच्या शोधात निघाला. देवाने वृद्धाच्या वेशात त्याला दर्शन दिले आणि थोर गुरु व्यासरायांकडून दीक्षा घेण्यास सांगितले. दीक्षेनंतर प्रभू पंढरपूरास दिव्य दर्शन देतील असे वचनही दिले.
नायक हम्पीला पोहोचला. तिथे पवित्र चक्रतीर्थ नदीत स्नान करून नंतर थोर गुरु स्वामी व्यासरायांच्या मठात त्याने प्रवेश केला. गुरूंना वंदन करून दीक्षा देण्याची त्याने विनंती केली. त्याने दासाच्या आज्ञेनुसार, पुढीलप्रमाणे शपथ घेतली.: कोणाकडूनंही उसने घेणार नाही. परमेश्वराने जे दिले त्यात समाधान मानीन. दुसऱ्या दिवसासाठी काहीही साठवणार नाही.
गुरूंनी त्याला जापासाठी तुळशीमाळ, पायातील घोट्यांच्या घंटा, झांजा आणि एक तंतुवाद्य असा कृपाप्रसाद दिला. गुरूंनी त्याला पुरंदरविठ्ठल असे टोपण नाव दिले आणि त्याच्या काव्यरचना प्रभूच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले. त्यांनी त्याला ‘पुरंदरदास’ असे नाव प्रदान केले.
पुरंदरदासांनी अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले. त्यांना झालेली अद्भूत दर्शने, तसेच त्यांच्या अनुभवांची स्पष्ट वर्णने ही मानवतेचे उद्दिष्ट दर्शवतात. त्यांच्या काव्यांमधून, मुक्तीसाठी, आवश्यक असलेला त्याग आणि भक्ती भाव, अहंकारपूर्ण जीवनाची व्यर्थता याचे वर्णन आढळते. त्यामुळे धार्मिक इतिहासात त्यांचे नाव उजळून निघाले. विचारांची उदात्तता, स्पष्टपणे व्यक्त होणे, भव्य चित्रण हे त्यांच्या कवितांचे काही ठळक विशेष आणि काही काव्ये तर जगातील अद्भुत साहित्यांचा अतुलनीय नमुना ठरावीत.
“त्याग, शुद्धता आणि प्रामाणिकपणा हे गुण मानवला परमेश्वराच्या अत्युच्च प्रेमाप्रत घेऊन जातात. हेच प्रेम मुक्ती मिळवून देते.” हेच त्यांच्या शिकवणीचे सार होय.
पुरंदरदास हे नारद मुनींचे अवतार म्हटले जाते. पांडुरंग विठ्ठलाची आपल्या सर्वांवर कृपा होवो.
प्रश्न: :
- पुरंदरदास कोणत्या राज्याचे होते? त्यांचे मूळ नाव काय होते?
- ते स्वभावाने कसे होते?
- त्या वृद्ध गृहस्थांनी सरस्वतीबाईंना काय विचारले?
- कोणत्या घटनेने श्रिनिवास नायकाचे जीवन बदलून गेले?
- ते एक महान गायक व गीतकार कसे झाले?
Illustrations: A. Harini, Sri Sathya Sai Balvikas Student.
[Source: Stories for Children II, Published by Sri Sathya Sai Books & Publications, PN]