सर्वधर्मान्परित्यज्य – पुढील वाचन
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज|
अहंत्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः||
(अध्याय-१८ श्लोक-६६)
सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस.
कुरुक्षेत्राच्या युध्दभूमीवर, जेव्हा अर्जुनाने, शत्रुपक्षातील कौरवांना समोर उभे ठाकलेले पाहिले तेव्हा तो अत्यंत शोकाकुल झाला. त्या सैन्यामध्ये त्याचे आप्तस्वकीय व गुरुजनांचा समावेश होता. ते सर्वजण त्याचे स्वजन असल्याचा त्याला संभ्रम झाला. कृष्ण अर्जुनास सांगतो की त्याने अधर्माविरुध्द लढा देण्याच्या त्याच्या कर्तव्यापासून ढळू नये. कौरव आणि त्यांचे समर्थक अधर्मी सेना होती.
बाबा म्हणतात.” परमेश्वराचा महिमा वर्णन करण्यासाठी, धर्म आणि अधर्म ह्या वादात गुंतून न पडता, परमेश्वराने दिलेल्या आदेशानुसार सर्व कर्म करा. सर्व काही परमात्माच आहे. अन्य काहीही नाही. असा दृढ़ विश्वास बाळगा.
त्याच्या इच्छेपुढे मान तुकवणे व त्याच्या योजनेपुढे शरणागती पत्करणे ह्याशिवाय अन्य काही नाही. शास्त्र आणि धर्मग्रंथात सांगितल्यानुसार, फळाची अपेक्षा न ठेवता सर्व कर्म भगवद्प्रीत्यर्थ करा. हे खरे निष्काम कर्म आहे.
सर्व कर्म पूजेसमान, हरीप्रसादं समजून करा. हेच एकमेव कार्य आहे. बाकी सर्व म्हणजे कर्माचे फळ, परिणाम निष्पत्ती त्यांच्यावर सोडा. असे केल्याने तुम्हाला परमेश्वरी कृपा प्राप्त होईल व तुमचे भूतलावरील जीवन पवित्र आणि सार्थ होईल.
जे धर्ममार्गाचे अनुसरण करतात, त्यांच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी अखेरीस, त्यांचा विजय निश्चित असतो. जे धर्ममार्गावरुन ढळलेले असतात, त्यांना कदाचित दीर्घकाल संपत्ती वा सुखसोयी लाभतात परंतु अखेरीस ते संकटांनी घेरले जातात. पांडव आणि कौरव ह्या सत्याची उदाहरणे आहेत.”
परमेश्वराच्या आदेशानुसार जर आपण आपली कर्तव्य “कर्म केली तर परमेश्वर निश्चित आपले रक्षण करतो. “भिऊ नकोस” अशी तो ग्वाही देतो.
अत्यंत बलशाली शस्त्रास्त्रेच नव्हेत तर कोणतीही गोष्ट परमेश्वर कृपेच्या समतुल्य नसते.