शीख धर्म
शीख धर्म हा जगामध्ये अलीकडच्या काळात स्थापन झालेला धर्म आहे. ह्या धर्माने जगातल्या सर्व धर्मांमध्ये सुसंवाद आणि संयोग घडवून आणण्याचा आणि विशेषतः हिंदु आणि इस्लाम धर्मांत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.
ह्या धर्माचे संस्थापक, गुरु नानक ह्यांचा जन्म १४६९ मध्ये लाहौर जिल्ह्यातील तलवानी ह्या गांवी झाला. बालपणापासूनच नानक धार्मिक वृत्तीचे होते. जेव्हा ते गुरांना चरायला घेऊन जात असत तेव्हा ते अनेकदा गहन ध्यानावस्थेत बसलेले आढळून येत.
त्या काळामध्ये हिंदुंमध्ये अनेक अंधश्रद्धा होत्या आणि मुस्लीम धर्मांध आणि अत्यंत कर्मठ होते. धर्माच्या नावाने त्यांच्यामध्ये नेहमीच दंगली होत असत.
गुरु नानकांनी एका नवीन धर्माचा परिचय करुन देण्याचे कार्य हाती घेतले ज्यामध्ये हिंदु आणि मुस्लीम धर्मातील चांगले मुद्दे एकत्रित केले होते. त्यामुळे हिंदु आणि मुस्लीम शांततेने आणि सलोख्याने एकत्र राहतील. तरुण वयातच त्यांनी प्रेमाच्या ह्या नवीन गॉस्पेलचा (येशूची शिकवण) प्रसार करण्यास सुरुवात केली. परमेश्वराशी अनुसंधान आणि थेट दैवी प्रेरणेमुळै स्फुरणाऱ्या श्लोकांमधून त्यांनी शिकवण दिली. शीखांच्या ‘गुरु ग्रंथ साहिब’ ह्या धर्मग्रंथामध्ये ह्या श्लोकांचे संकलन केले आहे. ह्या ग्रंथातील संहिता (मजकूर) गुरबानी नावाने ओळखली जाते. जेथे गुरु ग्रंथ साहिब ठेवलेला असतो त्या शिखांच्या मंदिरांना गुरुद्वारा म्हणतात.
गुरु नानकचे अनुयायी शीख म्हणून ओळखले जातात. शीख ह्या शब्दाचा अर्थ जो शिकतो आहे वा शिष्य असा आहे.
शीखांचे दहा धर्मगुरु पुढीलप्रमाणे आहेत.
- गुरुनानक
- गुरु अंगद
- गुरु अमर दास
- गुरु रामदास
- गुरु अर्जुन
- गुरु हर गोविंद
- गुरु हर राम
- गुरु हर कृष्ण
- गुरु तेग बहादुर
- गुरु गोविंद सिंह
शांती आणि सद्भाव हे शब्द नवीन धर्माचे जरी परवलीचे शब्द असले तरीही पुढे आलेल्या काळात, मुस्लीम राज्यकर्त्यांनी त्यांचा छळ केल्यामुळे, अनुयायांना गुरु गोबिंद सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली, शस्त्र हाती घेऊन लढवय्ये बनणे भाग पडले. मुस्लीम राज्यकर्त्यांशी ते शौर्याने लढले म्हणून त्यांच्या नावापुढे ‘सिंह’ हा किताब जोडला गेला.
शीख धर्मात मूर्तिपूजनास मान्यता नाही. ते केवळ महान संतांची सुवचने व भजने गातात. ह्या धर्माचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे एकनिष्ठ आणि समर्पित शिष्यत्व. शीख धर्मीय ज्योती स्वरुपात परमेश्वराची भक्ती करतात. ते जप आणि ज्योती ध्यानास महत्त्व देतात. परमेश्वर एकच आहे ह्यावर त्यांची श्रध्दा आहे. तो सत्पुरुष आहे, परिपूर्ण परमात्मा आणि विश्वाचा निर्माता आणि पोषणकर्ता आहे असे ते मानतात.
गुरुच्या उपदेशानुसार शीख पाच ‘क’ कार वापरतात व हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हे पाच ‘क’ पुढीलप्रमाणे.
- केस राखणे.
- कंगवा – स्टीलचा कंगवा नित्य बाळगणे.
- कडे – स्टीलचे कडे वापरणे.
- कृपाण – लहानशी तलवार बाळगणे.
- कच्छ – अंतर्वस्त्र वापरणे.
शीख धर्मीयांचे आचरणाचे नीतीनियम जवळजवळ हिंदूसारखेच आहेत. परंतु ते जातीभेद मानत नाहीत.
प्रार्थना
वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु जी बोलो ।
सत् नाम, सत् नाम, सत् नाम जी बोलो।
प्रतीक:
शीख धर्माच्या प्रतीकास खंडा म्हणतात. मध्यभागी दुधारी तलवार, उजवी बाजू स्वातंत्र्य आणि नैतिक आणि आध्यात्मिक तत्त्वांनी संचालित शक्तीचे प्रतिनिधित्व करते तर डावी बाजू अधर्माने वागणाऱ्या लोकांसाठी दैवी निवाडा (न्याय) ह्याचे प्रतिनिधित्व करते. चक्र, आदिअंतरहित परमेश्वराशी ऐक्याचे प्रतिनिधित्व करते. दोन कृपण आध्यात्मिक अधिकार आणि राजनितिक शक्तीचे प्रतिनिधित्व करतात.