झोराष्ट्र धर्म
झरतुष्ट्राचा धर्म पारशी प्रेषित झरतुष्ट किंवा झोरेंस्टर या धर्माचा संस्थापक आहे. तो ८५०० वर्षापूर्वी होऊन गेला.
इ.स. पूर्व ६४०० मध्ये पृथ्वीमातेने दृष्ट शक्तीपासून सोडविण्यासाठी केलेल्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून तो जन्माला आला. वीस वर्षांचा झाल्यावर तो एकांतात गेला, दहा वर्षे त्याने प्रगाढ ध्यानात घालविली. नंतर त्याला अहुर मज्दाची ओळख पटली आणि त्याच्याशी संबंध प्रस्थापित झाला. जसे ऋषींना वेद प्रकट झाले तसेच त्याला गाथांचे दर्शन घडले. जे ज्ञान त्याला प्राप्त झाले ते त्याने लोकांना शिकविले. त्याचा धर्म झरतुष्ट्राचा धर्म म्हणून माहित झाला.
झरतुष्ट्राचा धर्म व हिंदुधर्म यांच्यात अनेक वैशिष्ट्ये समान आहेत कारण दोन्ही आर्यांचे धर्म आहेत. सूर्य व अग्नी यांची पूजा, होम करणे या गोष्टी दोन्हींना समान आहेत. हा धर्म एकेश्वरवादी आहे. म्हणजे देव एकच आहे असे मानणारा आहे. तो देव म्हणजे विद्वान अहुर मज्दा प्रभू आहे. तो जगाचा सृजनकर्ता व पोषणकर्ता आहे. सत्य व धर्म रूपाने तो माणसांच्या हृदयात राहतो.
जगामध्ये जे अमंगल आहे वाईट आहे त्याचा आणि जी असत्यता आहे तिचा नाश करण्यासाठी परमेश्वर त्याच्या शक्तीचा वापर करतो. सद्विचार, सदुक्ती व सत्कर्म – हुमत, हुक्त व हौश्त- हा प्रधान उपदेश आहे. त्याच्यावर हा धर्म आधारित आहे. तो पाच सद्गुण शिकवितो चांगुलपणा, सामंजस्य, शांती, दान व पावित्र्य.
पवित्र अग्नी त्याच्या सुंदर देहाचे प्रतीक आहे. आपल्या डोळ्यांना दिसणारा अग्नी हा अंतस्थ अग्नीचे बाह्य प्रतीक आहे. परमेश्वरासारखा अग्नी ही निराकार आहे. पारशी लोक निसर्गाच्या पावित्र्याला मानतात.
या धर्मात निसर्गाच्या पावित्र्यावर पक्का विश्वास ठेवलेला आहे. माणसांनी निसर्गाला दूषित करू नये कारण निसर्ग हे भगवतांचे विशाल वस्त्र आहे. पृथ्वी वायू, तेज ,जल ही चार पवित्र तत्वे आहेत.
मृतांना पुरल्याने पृथ्वी प्रदूषित होते. दहनाने अनीचे प्रदूषण होते व पावित्र नष्ट होते. म्हणून मृत शरीरे ‘नि:शब्दतेच्या बुरुजात’ (Tower of silence उन्हात हिंस्त्र पक्ष्यांनी खावीत म्हणून टाकली जातात.
झोरॅरूटरने अमेष स्पेन्त नावाच्या सात पायऱ्या माणसांना चढण्यासाठी सांगितल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :
- अहूरमज्दा- देवाची भक्ती
- बोहु मनह – निष्पाप प्रेमळ मनाची जोपासना.
- बोहु मनह मुळे मनुष्य चांगले व वाईट यामध्ये फरक करू शकतो आणि त्याला चांगली वचने व चांगली कर्मे यासाठी प्रेरणा मिळते
- पावित्र्य आणि परोपकारी वृत्ती यामुळे चांगल्या समाजाची निर्मिती होते.
- चांगले विचार, उच्चार व आचार मनुष्याला दिव्य शक्ती (राजासारखी शक्ती) प्रदान करतात.
- वरील चार गोष्टींचा परिणाम म्हणजे शांती व मनाचा समतोलपणा (खोर्दाद).
- या सर्वामुळे अमृतत्त्वाकडे म्हणजे मुक्तीकडे वाटचाल सुरू होते
सुद्रेह आणि कुश्ती
झोराष्ट्र धर्म पाळणारा प्रत्येक पारसी सुद्रेह हे पवित्र वस्त्र आणि कुश्ती हा पट्टा वापरतो. या वस्तु त्याला लहानपणीच ७ ते ११ या वयाच्या दरम्यान नवज्योत समारंभामध्ये धर्म गुरूंद्वारे दिल्या जातात. सुद्रेह हे वस्त्र शुद्धता व स्वच्छता यांचे प्रतीक आहे. अंतिम न्यायदानात आपल्या दैनंदिन कृत्यांची नोंद होत असते याचे स्मरण या वस्तु करुन देतात.
कुश्ती म्हणजे ते धारण करणारा व आहुरमज्द यांच्यातील दुवा होय. तो लोकरीपासून बनवलेला असतो. सुद्रेह व कश्ती हा पारशी माणसाचा गणवेशच असतो.
पवित्र झोरस्ट्रियन ग्रंथ
हे पवित्र ग्रंथ अवेस्ता व पजन्द या भाषेत लिहिले आहेत. मुख्य ग्रंथ असे आहेत: गाथा, यस्न, विस्पराद, खोर्देह – अवेस्ता, पतेत्, इत्यादी पारशी लोक १२०० वर्षांपूर्वी पर्शिया मधून भारतात आले. पर्शियावर आक्रमण करून विजयी झालेल्या अरबांच्या अनन्वित छळापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी तेथून पलायन केले व भारतातील गुजराथच्या किनाऱ्यावरील दिव येथे ते उतरले. ते त्यांच्याबरोबर पर्शिया मधील मंदिरातून पवित्र अग्नी घेऊन आले. दीव येथून त्यांनी गुजराथ मधील संजन येथे प्रस्थान केले. तेथील स्थानिक हिंदू राज्यकर्त्यांनी त्यांना जमीन दिली आणि त्यांनी त्यांचे नवजीवन सुरू केले. त्यांना त्यांच्या धर्माचे अनुसरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. तेथे त्यांनी त्यांचे पहिले अग्नि मंदिर उभारले. ते ज्या भागातून तेथे आले त्या पर्शियास सूचित करण्यासाठी त्यांना पारशी म्हटले जायचे.
अखेरीस असे म्हणता येऊ शकते की पारशी जमात संख्यात्मक दृष्ट्या जरी अत्यंत नगण्य असली तरी त्यांची धर्मावरील अढळ श्रद्धा आणि रक्ताचे पावित्र्य जतन करण्याचा त्यांचा विशेष आग्रह यामुळे त्यांनी त्यांची ओळख जपून ठेवली आहे.
थोडक्यात पारशी समाज संख्येने थोडा असला तरी त्यानी त्यांच्या धर्मावरील अढळ श्रद्धेतून आणि शुद्धतेतून आपली ओळख राखली आहे.