यहूदी धर्म
ह्या धर्माची काही ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात खाली दिली आहेत.
ज्यूचे बायबल द ओल्ड टेस्टामेंटची सुरुवात, आद्य मानव अॕडम आणि त्याचे सर्व वंशज यांच्या कथेने होते. जुन्या करारानुसार परमेश्वराने मानवाला आपल्या स्वरूपानुसार निर्माण केले, ज्यायोगे “माझा पिता तुझ्या पित्याहून श्रेष्ठ आहे.”
असे कोणत्याही मनुष्याने दुसऱ्याला म्हणू नये. सर्व लोकांमध्ये समता हवी. यावर यहुदी धर्म विशेष भर देतो. परमेश्वर एकच आहे असे मानणारा हा एकेश्वरवादी धर्म आहे. सदाचरणाचा निर्माता आणि स्रोत तोच आहे. ज्यू लोक इजिप्तचे राजे फिरोज हयांचे गुलाम होते. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले जात. त्यांना अपमानित केले जात असे. सिनाई पर्वतावरील एका झुडुपाभोवती वणवा पेटला होता. परंतु ते झुडुप मात्र त्यामध्ये जळत नव्हते. ते पाहण्यासाठी मोझेस एकदा त्या पर्वतावर गेला तेथे गेल्यावर त्याला परमेश्वर आवाज ऐकू आला. तो मोझेसला म्हणाला, तू सर्व ज्यू लोकांना गुलामगिरीतून मुक्त कर आणि जेथे दुधाचे आणि मधाचे पाट वाहतात अशा भूमीवर घेऊन जा. मोझसने त्याला त्याचे नाव विचारले. परमेश्वर म्हणाला,” मी जो आहे तो मी आहे” अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना करून ज्यूनी इजिप्तमधून सुटका करून घेतली. काही महिन्यांनी ते सिनाई पर्वतापाशी पोहचले. मोझेस पर्वतावर गेला व जेथे त्याने परमेश्वराचा आवाज ऐकला होता तेथे जाऊन तो त्याला बोलावू लागला परमेश्वराने दोन पाषाणांच्या सपाट पृष्ठभागावर १०आज्ञा (टेन कमांडमेंटस) कोरून मोझेसला दिल्या.
दहा आज्ञा:
- तुम्हाला ज्याने बंधनातून, इजिप्तच्या भूमीवरुन बाहेर आणले तो मी तुमचा देव.
- तुम्ही दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा करणार नाही अथवा वरती असलेला स्वर्ग, खाली असलेली पृथ्वी किंवा पृथ्वीच्या खालचे पाणी याची कशाची ही प्रतिमा किंवा मूर्ती बनविणार नाही.
- जे देवावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यावर तुम्ही दयेचा वर्षाव करा.
- तुम्ही ईश्वराचे नाव अनादराने घेणार नाही.
- तुम्ही सहा दिवस झटून काम करा. सातवा दिवस हा देवाचा ‘सबाथ’ (माणूस, प्राणी या सर्वांच्या विश्रांतीचा) असेल.
- आई वडिलांचा आदर करा. परमेश्वराचीही आज्ञा पाळा व दीर्घायुषी व्हा
- कोणाचीही हिंसा करू नका.
- कोणालाही फसवू नका.
- चोरी करू नका.
- शेजाऱ्याच्या विरोधात खोटी साक्ष देऊ नका. त्याच्या मालमत्तेचा धरू नका.
अनेक दिवस लोटल्यानंतर जेव्हा मोझेस त्या 10 आज्ञा घेऊन परतला तेव्हा लोकांना मूर्तिपूजन करताना पाहून अत्यंत व्यथित झाला आणि त्याने ते दोन्ही पाषाण लोकांच्या दिशेने फेकले व त्या पाषाणाचे तुकडे झाले. लोकांना त्यांची चूक लक्षात आली. त्या हरवलेल्या दहा आज्ञा पुन्हा एकदा देण्यासाठी त्याने परमेश्वराकडे आर्जव केली. परमेश्वराने त्याची इच्छा पूर्ण केली. त्याने लोकांना त्या १० आज्ञा शिकवल्या त्यांना एकत्रित आणले व नैतिकदृष्ट्या त्यांना नवचैतन्य दिले. त्यांनी तांबडा समुद्र पार केला आणि जसे इस्रायल दृष्टोत्पत्तीस पडले तसा मोझेसने अखेरचा श्वास घेतला. मोझेसचा शिष्य जोशुआ त्या सर्वांना इस्त्राईलकडे, त्यांच्या मातृभूमीकडे घेऊन गेला.
नंतर, तोराह – एक पुस्तक ज्यामध्ये ज्यूधर्माचे नीतीनियम आणि शिकवण संकलित करण्यात आली. त्यानंतर त्याचा टॅलमुड नावाच्या पुस्तकामध्ये विस्तार करण्यात आला.
- लोकांचे रक्षण करणारा देवदूत (लोकांचे रक्षण करण्यासाठी अवतरणारा दिव्य पुरूष)
- निवडक लोकांवर परमेश्वराचे कार्य विश्वासाने सोपविले जाते ही संकल्पना
- ‘तोराह’ मध्ये नीतीनियम सामावले आहेत.
देव हाच न्याय देणारा, कठोर शिस्त पाळणारा आहे. त्याच्या आज्ञांचे पालन न करणाऱ्यांना तो कठोर शिक्षा देतो, हिब्रू लोकांचा मूर्तीपूजेवर विश्वास नाही. त्यांच्या प्रार्थनास्थळांना सिनेगॉग म्हणतात. ज्यू लोकांच्या धर्मगुरुना रब्बी म्हणतात.
देव हा सर्वात श्रेष्ठ, चिरंतन, अविकारी, अविनाशी आहे. त्यामुळे नाशवंत वस्तुपासून बनवलेल्या मूर्तीमध्ये त्याला पहाणे हे त्यांना चुकिचे वाटते.
ज्यूंच्या महान आज्ञा खालील प्रमाणे:
- स्वतः सारखेच शेजान्यावरही प्रेम करा
- आपल्या बांधवांविषयी मनात द्वेषभाव ठेवू नका.
यहूदी धर्म चिन्ह
मेगन डेव्हिड हे ज्यू धर्मीयांचे प्रतिक आहे. जे स्टार ऑफ डेव्हिड नावानेही ओळखले जाते.
मेनोरा हे ज्यू धर्मीयांच्या प्राचीन प्रतिकांपैकी एक प्रतिक आहे. आणि ते जळणाऱ्या झुडुपाचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाते.
प्रमुख यहूदी सण
पासओव्हर – हा इस्रायलच्या भूमिपुत्रांच्या इजिप्शीअन गुलामगिरीतून मुक्तीचे स्मरण करणारे, वसंत ऋतुत येणारा ज्यू लोकांच्या प्रमुख सणांपैकी एक सण आहे.
रोश हशाना – हा ज्यू लोकांचा नववर्षदिन आहे
हानुक्का – हा ज्यू लोकांचा दीपोत्स्व आहे.