भाग तीन
माघ मासात सत्या सर्व मुलांना पहाटे उठवून स्नान करून मारूती (आंजनेय) मंदिरात प्रदक्षिणा घालण्यास नेत असे.
पण काही मुले इतकी छोटी होती लवकर उठू शकत नसत. त्यांना तो कडेवर घेऊन जवळच्या तलावात स्नान करवून प्रदक्षिणेसाठी घेऊन जात असे. सहकार्याचा किती हा सहजसुंदर भाव.
मुले जितक्या वेळ प्रदशिक्षणा घालत, बाबा मंदिरातच बसून राहात. एक दिवस मात्र मुलांनी हट्टच धरला की सत्या प्रदक्षिणा करणार नसेल तर आमच्यापैकी कोणीच करणार नाही. बऱ्याच वेळा मना करूनही शेवटी मित्रांच्या आर्जवाला त्याला रूकार द्यावाच लागला.
प्रदक्षिणा घालायला सुरुवात करताच एक मोठे माकड तिथे प्रकट झाले. साक्षात हनुमानच. त्यांनी हात जोडून विनविले, ‘भगवंता अरे रामा! तुम्ही माझी कशी प्रदक्षिणा करताय? ती तर मीच तुमची करायला हवी.” सगळ्या मुलांनी सत्याला खेचून आपल्याबरोबर चलण्याचे प्रयत्न केले परंतु व्यर्थ. ते त्याला जरासुद्धा हलवू शकले नाहीत. सल्याने त्यांना बजावले की तुम्ही या आंजनेयाला साधारण माकड समजू नका. तो कधीच मला आपल्या मंदिराची प्रदक्षिणा करू देणार नाही.
यानंतर मात्र मुले बदलली. त्यांनी अख्या गावाला ही घटना सांगितली. स्वामींचे चमत्कार सुरू झाले होते परंतु अजून ओळख पटायला वेळ लागणार होता. पण सुबम्माच्या कानावर जेव्हा हे सर्व पडले तेव्हा तिने त्याला डोसे खायला बोलावले. त्या काळी श्रीमंतांकडेच इडली डोसा सहजप्राप्त होता. सत्या तर एकटा जेवतच नसे. त्याने सुबम्माला म्हटले, ‘सगळ्या मित्रांना खाऊ घालणार असशील तरच मी खाईन.’ सुबम्मा आनंदाने तयार झाली आणि सर्वांना डोसे मिळाले.
स्वामींचे देवत्व काही अंशी सुबम्माला जाणवले असावे. ज्यावेळी सत्या पुट्टपर्तीत नव्हता तेव्हा मुलांना तिने समजावले की सत्यासारखा मित्र लाभल्यामुळे तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. अखंड त्याच्या आज्ञेचे पालन करा आणि त्याच्या आनंदात आपला आनंद माना. जर तुम्ही काही वाईट कर्म कराल तर तो नाराजी दाखवणार तर नाही पण तुम्हाला तुमचे कर्मफल भोगावे लागेल. तेव्हा तो नाराज होईल असे कृपया वागू नका.
सुबम्माने स्वामींच्या चरणकमलावर आपले सर्व जीवनच समर्पित केले. सुरुवातील तर ती स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना विनामूल्य भोजन सेवा देत असे तिच्या आयुष्याच्या अंतापर्यंत स्वामींच्या सेवेत खंड पडला नाही. एकदा बैलगाडीतून स्वामींबरोबर यात्रेला जात असता स्वामींनी तिला काय हवे? म्हणून विचारले. तेव्हा आदर्शवत ठरावी अशी इच्छा तिने प्रदर्शित केली. ती म्हणाली, “स्वामी मला बाकी काही नको. फक्त माझ्या अंतिम क्षणी माझ्या मुखात आपल्या करकमलांनी पाणी पडावे हीच इच्छा आहे.” स्वामींनी वचन दिले की ही इच्छा मी जरूर पूर्ण करीन.
स्वामी काही दिवसांसाठी चेन्नईला गेले असता सुबम्मा अत्यंत आजारी झाली आणि तिला बुक्कापट्टनमला नेण्यात आले आणि तिथेच मृत्यूचे पाश तिच्याभोवती पडले. तिने सारखा बाबांच्या भेटीचा ध्यास घेतला होता. परंतु युद्धपरिस्थितीमुळे आणि हवाई हल्ल्यांमुळे बाबा पुट्टपतीला येऊ शकले नाहीत. आणि जेव्हा ते परत यायला निघाले तेव्हा स्मशानात त्यांना चिता तयार करताना दृष्टीस पडली. त्यांनी सहज विचारले, कुणाची चिता आहे? धोबी म्हणाला, ‘स्वामी, सुबम्पाची, तीन दिवस झाले तिचा देहांत होऊन,’ स्वामी तहक सुबम्माचे पार्थिव ज्या ठिकाणी होते तिथे गेले. त्यांना बघून सुवम्माच्या बहिणीने रडत रडत सांगितले, ‘बाबा तिने तुमची खूप वाट पाहिली की तुम्ही याल आणि शेवटच्या क्षणी तुमच्या हाताने तिच्या मुखात जल पडेल पण तसे न झाल्याने अत्यंत निराशेने तिने प्राणत्याग केला.’ बाबांनी तिच्या मुखावरील कपड़ा दूर करून बघितले. मृत्यू होऊन तीन दिवस झाले होते आणि शरीरावर मुंग्या चढू लागल्या होत्या. बाबांनी हळुवार सुरात पुकारले, ‘सुबम्मा, तिने डोळे उघडले आणि स्वामींच्या हाताला धरून रडू लागली. स्वामीनी हळुवारपणे तिचे अश्रू पुसले, तिच्या मुखात पाणी घातले आणि प्रेमपूर्वक तिला म्हणाले, ‘आता शांतपणे डोळे मीट बर का!” आणि अशा प्रकारे स्वामीनी आपली वचनपूर्ती केली.
अशा या स्वामींच्या बालपणीच्या कथा. यातून हाच बोध होतो की जीवन आदर्शपूर्ण कसे असावे. याचा पाठच आपल्यासाठी त्यांनी घालून दिला आहे. लहानपणी त्यांनी जे कष्ट घेतले त्याची खरे तर काहीच आवश्यकता नव्हती. परंतु विद्यार्थ्यांने कसे असावे, त्याचे आचरण कसे असावे, चांगल्या गोष्टी चांगले विचार यांची जीवनाच्या विकासासाठी मोलाची मदत होते. हे स्वामींना दाखवून द्यायचे होते. स्वामीचे हे तर नेहमीच सांगणे असते की सदैव ईश्वरसाक्ष ठेवूनच आपले जीवन व्यतीत करा.