ईश्वरम्मा माता आणि त्यांचा दैवी सुपुत्र
भगवान जेव्हा अवतार घेतात तेव्हा आपल्या माता-पित्यांची निवड ते स्वतः करतात. जन्म घ्यायचा तो तितक्याच योग्य कुशीतून. ईश्वरम्मा एक गरीब, सरळमार्गी, अशिक्षित परंतु साध्वी आणि पतिव्रता स्त्री होती. भगवानांना जन्म देऊन ती अतिशय सौभाग्यशालिनी अशी माता बनली आहे. एखादा अवतार जेव्हा पृथ्वीतलावर अवतरतो तेव्हा चमत्कार होतातच. ईश्वरम्माच्या सासूबाईंना स्वप्नात भगवान सत्यनारायणाचे दर्शन झाले आणि ते म्हणाले की ईश्वरम्माच्या बाबतीत काही असाधारण घडले तर घाबरायचे कारण नाही. आणि लवकरच या स्वप्नाची प्रचीती आली. ईश्वरम्मा विहिरीवर पाणी भरत असताना निळ्या रंगाचा एक प्रकाशपुंज त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या देहात सामावून गेला. मातेची निवड झाली.
सत्या नऊ महिन्यांचा असतानाची गोष्ट. एक दिवस आईने आंघोळ घालून, कपडे, काजळ, कुंकू, विभूती लावून छोटया बाळाला छान नटवले आणि पाळण्यात घालून झुलवायला लागली. त्याच वेळी चुलीवरच दूध उतू जायला लागलं म्हणून तो तिकडे जायला वळली तो एकाएकी सत्या रडायला लागला. तिला आश्चर्यच वाटले. आजपर्यंत जन्मापासून भूक किंवा काही दुखतय म्हणून तो कभी रडलाच नव्हता.
तिने त्याला मांडीवर घेतले आणि अहो आचर्यम् शिशूच्या चारी बाजूला तिला शांत परंतु तेजस्वी असे प्रकाश दर्शन झाले. तिची तर आनंदाने मतीच गुंग झाली.
लवकरच गावातले लोकही सत्याकडे आकृष्ट होऊन त्याला वाखाणु लागले. ईश्वरम्मा मात्र घाबरायच्या. आईचं हृदय ते. ममतेला वाटायचे की द्वेषाने कोणाची नजर तर याला लागणार नाही? त्या आपल्या रोज नारळ आणि कापूर घेऊन त्याची दॄष्ट काढत असत. पण सत्या त्यापासून दूर जात त्यांना म्हणे, “मला कोणाचीही नजर लागणार नाही. माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही.” जसे श्रीकृष्णाने माती खाल्ल्यावर यशोदेने जेव्हा त्याला दटावले तेव्हा, ‘मला एक अवखळ आणि उनाड बालक समजू नका तशी चूकही करू नका.’ असे त्याने बजावले. कोणी कृष्णाला त्याचे नाव विचारले तर तो म्हणे, ‘माझी तर अनेक नावे आहेत कुठलं सांगू?’ बाबापण असेच बोलत. सांगत की सगळी नावे माझी आहेत. असे बोलून ते मातेला कृष्णाची आठवण करून देत. सत्याही आठवेच अपत्य होते.
सत्याला नेहमी बाहेर बसून शांतपणे आकाश, तारे आणि पहाडांकडे तासनतास न्याहाळत बसणे आवडत असे. थोडे मोठे झाल्यावर गल्लीतील मुलांबरोबर ते लपाछपी किंवा आंधळी कोशिंबीर खेळत असत आणि एखादी गाय किंवा म्हैस जर तिथून गेली तर तिच्या पाठीवर प्रेमाने थापटत असत. एका उघड्या मुलाला पाहून थंडीने काकडत असलेल्या त्याच्या देहावर त्यांनी आपला शर्ट काढून घातला. ईश्वरम्मा सांगायच्या की कोणाचेही दुःख त्याला पाहावत नसे व ते दुःख दूर करण्याच्या प्रयत्नात तो सदैव असे. सगळ्या ओळखीच्या मुलांमध्ये कोमल आणि मधुरभाषिणी असा सत्याच होता.
त्या त्याला नेहमी विचारीत असत, ‘सत्यम तुला काय हवय?’ कारण तो कधीच काही मागत नसे आणि त्याची काही खास आवडनिवडही नव्हती. परंतु एका गोष्टीचा मात्र त्यांना आनंद होत असे को त्याच्या आजूबाजूच्या मुलांमध्ये नेहमी प्रसन्नता नांदत असे.
ज्या कार्यासाठी ईश्वरम्मा आपले पुढील जीवन व्यतीत करणार होत्या. त्याची जाणीव बाबांनीच त्यांना चौदाव्या वर्षी करून दिली. त्यांनी ईश्वरम्मांना कल्पना दिली की आता तुझा माझा काही संबंध नाही. माझ्या भक्तांची हाक आता मला ऐकायलाच हवी. हे कटू सत्य स्वीकारून माता विचारती झाली, “मग तुझा संबंध कुणाशी आहे?” बाबा म्हणाले. “माझा संबंध आता विश्वाशी आणि त्यातील मनुष्यमात्रांशी आहे!” ईश्वरम्मा आता प्रशांतिनिलायममध्ये येणाऱ्या शेकडो मुलामुलीची आई झाल्या. तसेच येणाऱ्या दुःखी आणि रोगी जीवांना शोधून त्यांची सेवा करू लागल्या.
आपल्या छोट्या मुलाची अद्वितीय विद्वत्ता आणि आध्यात्मिक प्रविणता पाहून त्यांना आश्चर्यच वाटे. त्या इतक्या साध्या भोळ्या होत्या की वेदांच्या ऋचा बाबांच्या मुखातून ऐकून कस्तुरींना त्या विचारीत असत की त्याने पाठांतर तर ठीक केलेय ना?
बाबा मात्र त्यांच्या भोळेपणाची नेहमी गंमत करीत. जेव्हा ते पूर्व आफ्रिकेत गेले तेव्हा विमानप्रवास आणि समुद्र पार करून जाण्याच्या कल्पनेनेच त्या व्याकुळ होऊन गेल्या. स्वामींनी त्यांची भीती तर घालवली नाहीच पण आणखी भीती दाखवत म्हणाले, ‘आफ्रिका चमत्कारिक स्थान आहे की जिथे नरभक्षी लोक राहतात आणि खजुराच्या भावात सोनं मिळतं. भूतकाळात प्रवास करावा लागतो. तीन वाजता विमानात बसलं की भूतकाळात चार घंटे प्रवास करून सकाळी अकरा वाजता पोचून दुपारच जेवण घेऊ. हे सर्व ऐकून ईश्वरम्मांनी अजीजीने विनविले, की नको रे बाबा जाऊ, पण बाबा कसले ऐकतात त्यांना ईश्वरम्माना ज्ञानवर्धनाने खंबीर बनवायचे होते.
ईश्वरम्मा नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करीत असत एकदा त्यानी स्वामीना विनविले, ‘स्वामी, पुट्टपर्ती अगदी छोटे गाव आहे, पण इथे एखादी छोटीशी तरी शाळा हवी. मुलांना शिक्षणासाठी कितीतरी लांब दुसऱ्या गावात शिक्षणासाठी जावे लागतेय तेही पायी. तेव्हा कृपा करून इथेच एक शाळा सुरू केली तर फार बरे होईल.’ आईची आज्ञा शिरसावंद्य मानून बाबांनी शाळा उघडली. ईश्वरम्मानेच एकत्रित केलेल्या स्वयंसेवकांना घेऊन दवाखान्याचीही निर्मिती केली. आणि तिथे होणाऱ्या चमत्कारपूर्ण इलाजांचे श्रेय स्वयंसेवकांच्या प्रेमभावनेला दिले. स्वामीनी आईला अजून काही इच्छा असल्यास सांगायला सांगितले तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सांगितला. कारण चित्रावती नदीला पुराचेवेळी पाणी असे पण उन्हाळ्यात मात्र अगदी थोडेसे पाणी राहात असे. तेव्हा बाबांनी घोषणा केली, मी एका विहीर नाही खोदणार तर पूर्ण रायल सीमा क्षेत्रात पाण्याची सुविधा निर्माण करणार, स्त्री शिक्षणाचे महत्व जाणवणान्या ईश्वरमांची ही पण इच्छा पूर्ण झाली आणि अनंतपुरला महिला महाविद्यालय स्थापन झाले.
आईच्या इच्छापूर्तीसाठी स्थापन झालेल्या संस्थांनी केवळ पुट्टपर्ती किंवा आसपासचा प्रदेश नाही तर संपूर्ण विश्वात आपला ठसा उमटवला आहे. शिक्षण संस्थामधील विनामूल्य शिक्षण आणि मानवीय मूल्यांना जास्तीतजास्त महत्व देऊन आदर्श मानव म्हणून विद्यार्थ्यांनी पुढे यावे हीच धारणा ठेवली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तर पूर्णतः निःशुल्क सेवा उपलब्ध आहे. पिडीतांसाठी असे किती तरी प्रकल्प त्यांनी तयार केले. एक प्रकारे हे त्यांचे प्रेममयी उपहारच नव्हेत का?
ईश्वरम्मांचे मुक्तीचे दिवस आता जवळ आले होते. एक दिवस त्यांनी बाबांना श्रीराम रूपात बघितले. ६ मे १९७२ नेहमीप्रमाणे सकाळी स्नान करून अम्माने कॉफी घेतली आणि एकाएकी, ‘स्वामी, स्वामी, स्वामी’ असे तीन वेळा हाकारले आणि बाबांनीही तीन वेळाच ‘येतोय, येतोय, येतोय’ म्हणून उत्तर दिले. आणि आपल्या अवतारी पुत्राच्या उपस्थितीत एका अलौकिक मातेच्या आयुष्याचे सोने झाले. असा भाग्यवान प्राणत्याग करणारी धन्य ती ईश्वरम्मा. धन्य तिचा पारलौकिक प्रवास. बाबाही हेच सांगतात की, तुमच्या वागणुकीवर तुमचा मृत्यू अवलंबून असतो.
॥ कर भला तो हो भला ॥