चर्मकाराची गोष्ट
स्वामींच्या किशोरवयातील ही घटना, त्यांच्या हृदयात अथांग करुणा किती भरली आहे याचे उदाहरण म्हणजे बंगलोरमधील चर्मकार, सडकेच्या एका बाजुला हा चांभार आपले छोटसे दुकान चालवीत असे. समोरच्या बाजूला असलेल्या बंगल्यात त्याने बाबांना बघितले. खूप साऱ्या मोटारी आणि लोकांची ये – जा चालू असून आतून बाहेर येणाऱ्या लोकांचे चेहरे आनंदित दिसतात आणि श्रीकृष्ण आणि साईबाबांच्या अवताराविषयी ते चर्चा करीत असतात हे त्याने पाहिले. कसा तरी धीर गोळा करून तो बंगल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेला आणि थोडे दबकतच हॉलच्या दारातून जरा आत डोकावून बघितले तो बाबा एका सिहासनावर बसले असून एका बाजूला स्त्रिया आणि दुसऱ्या बाजूला पुरुष बसले आहेत. बाबांची आणि त्याची नजरानजर झाली आणि तत्काळ बाबा उठून त्याच्याजवळ आले. त्याने बरोबर थोडा सुकल्या फुलांचा हार आणला होता, तो त्यांच्या गळ्यात घालणार तोच बाबांनी त्याच्या हातातून हार घेतला आणि तमिळमध्ये विचारले, “तुला काय हवय ?” इतक्या आश्वासक स्वरात विचारणा केली की तो एकदम म्हणाला, “कृपा करून माझ्या घरी येऊन आपण काही घ्याल का?” सगळे आश्चर्याने पाहू लागले पण स्वामीनी त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटत सांगितले, “ठीक आहे येईन की.”
चर्मकार तिथे बराच वेळ थांबला की घराचा पत्ता सांगू आणि कधी याल तेही विचारून घेऊ म्हणजे घराची स्वच्छता करता येईल. पण गर्दी, धक्काबुक्कीत त्याच्या बोलण्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. आणि कुणी त्याच्या बोलण्यावर विश्वासही ठेवला नसता. शेवटी तो आपल्या दुकानातल्या वस्तूंच्या काळजीपोटी परत आला. बरेच दिवस गेले आणि शेवटी त्याने बाबांच्या येण्याची आशापण सोडून दिली.
एक दिवस नवल घडले. त्या वृद्ध चांभारासमोर अचानक एक गाडी येऊन थांबली. तो एकदम घाबरला. त्याला वाटले की पोलीस आले आहेत. परंतु ते प्रत्यक्ष स्वामीच होते. त्यांनी त्याला गाडीत बसण्याचा आग्रह केला. चांभार इतका अवाक झाला की ड्रायव्हरला पत्ताही धड सांगू शकत नव्हता. पण बाबा तर सर्वज्ञानी होते. गाडी एका जागी थांबवून ओबडधोबड रस्त्यावरून चालत ते त्या झोपडपट्टीतील चांभाराच्या झोपडीपर्यंत अचूक गेले. चर्मकाराने आपल्या कुटुंबातील लोकांना सजग केले. बाबा त्याच्या घरी भितीशी ठेवलेल्या एका लाकडी पाटीवर आसनस्थ झाले. थोडी मिठाई आणि फळे साक्षात करून परिवारातल्या लोकांना वाटली. चांभार तेवढ्यात जाऊन केळी घेऊन आला व त्याच्या समाधानासाठी बाबांनी त्याचा स्वीकार केला. चांभाराच्या डोळ्यातून अविरत आनंदाश्रू वहायला लागले. स्वामींनी त्याच्या डोक्यावर आशिर्वादाचा अभय हस्त ठेवला आणि स्वामी तिथून निघाले. सांगायला नकोच की ती झोपडी आसपासच्या परिसरासाठी तीर्थक्षेत्र झाली, नेहमीसाठी. असे आपले स्वामी, करुणा, दया आणि प्रेम यांनी परिपूर्ण असणारी आपली कृपामयी भगवन्मूर्ती ॥