बालपणीच्या कथा – २

Print Friendly, PDF & Email
बालपणीच्या कथा – २

अगदी बालपणापासून ज्या पुस्तकांत किंवा चित्रपटात मानवी मूल्यांचे महत्व विशद केलेले नसे किंवा ज्यात केवळ पैसा कमावण्यासाठी जाणून बुजून मानवी आदर्शांचे अधःपतन केले जाई, ते बाबा अमान्य करत असत, नापसंती दर्शवत. जेव्हा “फिरत्या बोलपट प्रदर्शनासाठी” खेड्यात तंबू उभारले जात, तेव्हा आसपासच्या भागातून काही मैलांवरून चित्रपट पाहायला येणारे खेडूत जास्तीत जास्त चित्रपट पाहता यावे, यासाठी आपली तुटपुंजी कमाई खर्च करत असत. पण स्वामी मात्र इतर मुलांसोबत ते पाहायला जाण्यास नकार देत. ते ठामपणे म्हणत की या चित्रपटात चुकीची मूल्ये चित्रित केली असून, ग्रंथांमधील आशयाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. आणि चांगल्या संगीताचा विचका केला आहे गोंधळ घातला आहे.

दहा वर्षांचा असताना सत्याने पंढरी भजन मंडळींची स्थापना केली व यात एक सारखी भगवी वस्त्रे परिधान केलेल्या अठरा मुलांचा समावेश होता. प्रत्येकाच्या हातात झेंडा असे आणि पायात रुणझुणणाऱ्या साखळ्या पैंजणाप्रमाणे घालत असत. लोकगीतांच्या चालीवर भगवान पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांप्रमाणे अभंग, गीते गात ते नाचत असत. त्या काव्यातून व गीतामधून सत्या त्यांना दूरच्या मोठ्या तीर्थयात्रेत येणाऱ्या कठीण प्रसंगांची माहिती देत असे. भागवत पुराणातील श्रीकृष्णाच्या चरित्रावर आधारलेली काही गीते पण त्यांनी स्वतः रचली आहेत.

pandari bhajan

सत्या यात श्रीकृष्णाची किंवा माता यशोदेची भूमिका करत असे. त्याचे नृत्य, संवाद आणि संगीतामुळे त्या भक्तिगीतांमध्ये माधुर्य येत असे. व ती मोहक होत असत. श्रीकृष्णाची भूमिका तो अशी काही वठवत असे की त्या खेड्यातील लोकांपुढे प्रत्यक्ष वृंदावन व मथुरेतील श्रीकृष्ण साकार होत असे.

त्याचे सादरीकरण अगदी खरं भासत असे, इतकं की, भगवान नरसिंहाचे वर्णन करणारे गीत तो जेव्हा गायला, तेव्हा त्याने नरसिंहाचे रूप धारण केले नंतर ते एवढं भयंकर होतं की पाहणारा प्रत्येक जण भयभीत झाला. लोकांनी त्याची पूजा केली. आणि नंतर पुन्हा तो तरुण सत्या होऊन त्याने ते गीत पुढे चालू केले. या घटनेमुळे अशी वार्ता पसरली की जेव्हा या भजन मंडळींनी गीत गायले आणि नृत्य केले, तेव्हा पुट्टपर्तीत साक्षात देव प्रकट झाला. पारंपरिक विषयांबरोबरच नवीन देवस्थानं आणि नवीन मंदिरांबद्दल असणाऱ्या गीतांचा त्याने नाटकात समावेश केला. ते मंदिर होते शिर्डीचे व देव होते साईबाबा. जेव्हा मुले रस्त्यावरून नाचत जात असत तेव्हा हे साईबाबा कोण असतील असा प्रश्न वडीलधाऱ्या मंडळींना पडत असे. आजूबाजूच्या खेड्यातील अनेक कुटुंबांचा कॉलऱ्याच्या साथीने बळी घेतला.

पण पुट्टपूर्ती कोणालाही अपाय न होता यातून वाचली. येथील सुज्ञ माणसे एकमेकांना म्हणू लागली की भजन मंडळींनी निर्माण केलेल्या दिव्य वातावरणामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहिले व त्यांचे रक्षण केले. त्यामुळे या बालचमूला अनेक गावांमध्ये नाटक सादर करायला लोक आमंत्रण देऊ लागले.

या नाटकांमध्ये त्या पौराणिक कथांचे चित्र रेखाटलेले असे, त्यांत सत्याचा असत्यावर विजय दर्शविला जाई आणि भगवंत त्यांच्या भक्तांवर कसे प्रेम करतो व त्यांचे रक्षण करतो याचे वर्णन असे. सत्याने स्वतःसाठी ज्या अनेक भूमिकांची निवड केली, त्यांत मुख्यतः कृष्ण व मोहिनी या भूमिका होत्या. त्याच्या पदलालित्यात लय होती आणि नृत्यात लवचिकता आणि अतिशय मोहकता होती; जी त्यांनी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. त्याची पाऊले जमिनीला स्पर्शच करत नाहीत असे वाटल्याने तो आकाशातील कुठल्यातरी वेगळ्या ठिकाणाहून आल्याचा भास होई. या तरुणाने सादर केलेल्या भूमिका इतक्या उत्तम असत की जेव्हा त्याने तारामतीचे (हरिश्चंद्राची पत्नी) पात्र रंगवले तेव्हा हे सगळं नाटकात चालले आहे, हे विसरून त्याची स्वतःची माता तारामतीची शिक्षा थोपवण्यासाठी रंगमंचावर धावली.

[Source : Lessons from the Divine Life of Young Sai, Sri Sathya Sai Balvikas Group I, Sri Sathya Sai Education in Human Values Trust, Compiled by: Smt. Roshan Fanibunda]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *