दैवी जीवन घटना

Print Friendly, PDF & Email
श्री सत्यसाई आधोत्तर, गट १ – १ ते २७ नामावली
प्रस्तावना

श्री सत्यसाई बाबा म्हणतात, ‘नाम’, देवाचे नाम तुमच्या जिभेवर ‘रूप’, त्याचे रूप तुमच्या अंत:चक्षुंसमोर आणि त्याची थोरवी तुमच्या हदयात असू द्या. मग मोठ्या विजेचा लोळही तुमच्या जवळून सहज पुढे निघून जाईल. सत्यसाई अष्टोत्तर मध्ये भगवान श्री सत्यसाई बाबांची नामे आणि वैभव समाविष्ट आहेत.एकशेआठ किंवा एक हजार आठ नामांच्या पठणाची शिफारस का केली आहे? अशी लांबलचक मोठ्या आवाजात स्तुती केली म्हणजे भगवंत प्रसन्न होतो म्हणून नव्हे. तर त्या आकड्याची शिफारस केली आहे. याचे कारण एकशे आठ किंवा एक हजार आठ नामांपैकी निदान एखादे नाम तरी आपण प्रामाणिकपणे, आर्ततेने उच्चारण्याची शक्यता असते आणि प्रामाणिकपणाला प्रतिसाद देण्यास सदैव तत्पर असलेला भगवंत ते एक नाम ऐकेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल.१०८ आणि १००८ या संख्येचे महत्त्व – १०८ व १००८ यामध्ये १ आणि ८ हे अंक असून त्यांची बेरीज १ +८ = ९ होते. नऊ या अंकास दिव्यांक किंवा परब्रह्म संख्या म्हटले आहे. कारण या संख्येचे विभाजन होऊ शकत नाही. नवाला कोणत्याही संख्येने गुणले व त्या संख्येच्या अंकांची बेरीज केली तर ती अखेरीस नऊ होते. उदाहरणार्थ ९X ३=२७, २+७=९

ओम किंवा ओंकाराचे महत्व

ॐ किंवा ॐकार हा आदिध्वनी असून यातूनच ईश्वराने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. विश्वातील सर्व ध्वनींचा उगम ओंकारापासून झाला आहे. याने सर्व विश्व व्यापले आहे. पाचही मूलतत्त्वांमध्ये या ध्वनीमुळे कंपने उत्पन्न होतात. याला प्रणव असेही म्हणतात. हा सर्व सजीव प्राण्यांचा अंतर्ध्वनी आहे.

ईश्वराची वर्णिलेली सर्व नामे ओंकारध्वनीत सामावलेली आहेत व जतन केली आहेत. म्हणून ओंकार अतिशय शक्तिस्वरूप ध्वनी आहे. ज्याप्रमाणे डब्यांची लांबलचक आगगाडी इंजिनाला जोडली असता पुढे धावते, त्याचप्रमाणे जेव्हा सर्व मंत्रांची सुरुवात ओंकाराने होते. तेव्हा ते अधिक शक्तिशाली व फलदायी होतात.

१. ॐ श्री सत्य साईं बाबाय नमः

श्री सत्य साई बाबांना आमचे विनम्र अभिवादन.

श्री –ऐश्वर्य आणि महिमा.

सत्य – सत्य, सर्वांमधील अंतरात्मा, परमेश्वर

साई बाबा – स (सर्वेश्वर प्रभु) + आई (माता) + बाबा (पिता). विश्वाचे दैवी माता आणि पिता, विश्वाचा स्त्रोत आणि पोषणकर्ता.

नमः – विनम्र अभिवादन, त्यांच्यापुढे नमून, अंतर्गत शरणागती व्यक्त करणारी बाहयकृती.

२. ॐ श्री साई सत्य स्वरूपाय नमः

सत्य स्वरूप साईप्रभुंना आम्ही वंदन करतो.

स्वरूप – form.

स्वरूप, ते मानवी रूपातील परमेश्वर आहेत. २३ नोव्हेंबर १९२६ रोजी पुट्टपर्ती येथे, ईश्वरास्मा व पेद्दा वेंकप्पा राजू यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.

एके दिवशी, ईश्वराम्मा विहिरीवरून पाणी घेऊन येत असताना एका दिव्य तेजाने त्यांच्या देहात प्रवेश केला व त्यानंतर त्या लवकरच एका दिव्य बालकास जन्म देणार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या रात्री त्यांच्या घरातील सर्व वाद्ये आपोआप वाजू लागली, त्यातून त्या दिव्य बालकाच्या आगमनाची नांदी मिळाली.

२३ नोव्हेंबर १९२६ हया दिवशी, पेद्दा वेंकप्पाची माता लक्ष्मम्मा, पहाटेच सत्य नारायणाची पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. पूजा संपन्न झाल्यावर त्या घरी आल्या व त्यांनी आपल्या सुनेला, ईश्वराम्मांना पूजेची फुले आणि प्रसाद दिला. त्यानंतर लगेचच प्रभुंचा जन्म झाला. त्यांच्या मातेने सत्यनारायणाचा प्रसाद ग्रहण केल्यावर त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव सत्यनारायण ठेवण्यात आले. सत्त्याच्या डाव्या गालावर छोटासा तीळ होता. त्यांच्या पायाच्या तळव्यावर, शंख आणि चक्र ही दिव्यत्वाची सुचिन्हे स्पष्ट दिसत होती. त्यांना खोलीतील एका कोपऱ्यामध्ये गोधडीवर ठेवले होते. थोड्या वेळाने त्या गोधडीखाली नाग वेटोळे घालून बसल्याचे दृष्टीस पडले. खरोखरच भगवान विष्णु शेषनागावर पहुडले होते.

३. ॐ श्री साई सत्य धर्म परायण नमः

सत्य आणि धर्म हयांची स्थापना करण्यासाठी आलेल्या साईना आम्ही वंदन करतो.

सत्य – सत्य, धर्म –सदाचरण, परायण – तल्लीन, मग्न

जगामध्ये सत्य, धर्म, शांती, प्रेम ह्यांची स्थापना करण्यासाठी बाबा आले आहेत. बालपणापासून ते त्यांच्या सवंगड्यांना सत्य आणि धर्म यांचे महत्त्व पटवून देत असत.

ते त्यांना सांगत, “कोणत्याही परिस्थितीत दैनंदिन जीवनामध्ये स्वत:ला सत्याच्या मार्गावरून ढळू देऊ नका. कधीही असत्य बोलू नका. सत्याहून अधिक शक्तीशाली अन्य काही नाही. केवळ सत्य तुमचे रक्षण करेल.”

भगवान बाबा चारित्र्याची जडणघडण व शिस्त ह्यावर विशेष भर देतात. ते म्हणतात, “शिक्षणाची परिणती चारित्र्य संपन्नतेत व्हायला पाहिजे.”

त्यांनी प्रशांती निलयम येथे बरीच विद्यालये,महाविद्यालये सुरू केली. तसेच अभिमत विद्यापीठही सुरू केले. येथे विद्यार्थी केवळ शैक्षणिक प्रावीण्य व कौशल्ये संपादन करत नाहीत तर त्याचबरोबर आत्मज्ञान व आत्मविश्वासही प्राप्त करतात. ते आध्यात्मिक जाण व त्याचे व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर होणारे सुपरिणाम दर्शवणारे तेजस्वी उदाहरण बनतात.

४. ॐ श्री साई वरदाय नमः

वरदाय श्री सत्य साई बाबांना आमचे विनम्र अभिवादन

वर – वर, दाय – देणारा.

बालपणी सत्या त्याच्या मित्रांना गोड पदार्थ, पेन्सिली आणि इतर वस्तू एका रिकाम्या पिशवीतून ‘काढून’ देत असे. कधी कधी बालसत्या त्याच्या मित्रांना टेकडीवरील चिंचेच्या झाडाकडे घेऊन जाई व ‘त्यांना कोणते फळ खायला आवडेल’ हे विचारून त्या चिंचेच्या झाडावरून त्यांच्या आवडीची फळं तोडून देत असे.

मग त्या फळांचा मोसम नसला तरीही! ते चिंचेच झाड ‘कल्पवृक्ष’ म्हणून प्रसिद्ध झाले.

जसजसा काळ लोटत गेला तसे मोठ्या इच्छा आणि प्रश्नांसहित लोक येऊ लागले. स्वामींनी त्यांच्या प्रवचनाद्वारे, लिखाणांद्वारे आणि पूर्णत्वाचा दृष्टिकोन असणाऱ्या शिक्षण संस्थांद्वारे ज्ञानाचा केलेला वर्षाव हा सर्वश्रेष्ठ वरप्रसाद आहे.

बाबांच्या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नोकरीसाठी मुलाखतीच्या कक्षात बसला असता त्यातील एका मुलाखतकाराने त्याला विचारले, “आम्ही ऐकलंय की तुमचे साई बाबा लोकांना घड्याळं, माळा, अंगठ्या अशा भेटवस्तू देतात. त्यांनी तुला काय दिलं?”

मंदस्मित करीत तो विद्यार्थी उत्तरला, “सर, मी एका गरीब खेड्यामधून आलोय आणि आज मी तुमच्यासारख्या श्रेष्ठ मुलाखत घेणाऱ्यांसमोर ह्या माननीय हुद्याकरीता बसलोय. श्री सत्यसाई बाबांकडून संपूर्ण नि:शुल्क शिक्षण ही एवढी मोठी भेट; मला आधीच मिळालीय, मी त्यांच्याकडे याहून कुठच्या मोठ्या भेटीची अपेक्षा करावी?”

५. ॐ श्री साई सत्पुरुषाय नमः

अनंत साईंना आम्ही बंद करतो.

सत् – सनातन सत्य, पुरुष – पुरुषोत्तम.

साई म्हणजे कलियुगात मानवी रूप धारण करून आलेला परमेश्वर होय. गीतेमध्ये कृष्णाने म्हटले आहे, “धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे” (धर्म संस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात मानवी रूप धारण करून येईन).

सत्या त्याचे आजोबा श्री कोंडम्मा राजु ह्यांच्याबरोबर राहत होता, सत्या झोपी गेल्यावर त्याच्या श्वासामधून त्याचे दिव्यत्व दर्शविणारा आद्यध्वनी ॐकाराचा नाद ऐकून त्याचे आजोबा विस्मयचकीत झाले. काही वेळा त्यांना त्यांच्या श्वासामधून ‘सोहम’चा ध्वनीही ऐकू येत असे.

६. ॐ श्री साई सत्य गुणात्मने नमः

ज्यांच्यामध्ये सर्व दैवी गुण विद्यमान आहेत, त्या साईंना आम्ही वंदन करतो,

गुण – गुण, आत्मने – दैवी .

बाबा सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहेत.

एकदा पावसाळ्यामध्ये स्वामी मुंबईला धर्मक्षेत्र येथे आले होते. संध्याकाळी ६ वाजता सार्वजनिक सभा सुरू होणार होती. ५.१५ च्या सुमारास आभाळ भरून आले होते. मुसळधार पावसामुळे सभेमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता दिसत होती.

काही सेवादल अधिका-यांनी सभा अगोदार सुरू करावी असे मत व्यक्त केले. त्यानुसार श्री इंदुलाल शहांनी बाबांना विनंती केली. “बाबा आपण थोडी अगोदर सभा सुरू करू शकतो का?” बाबांनी विचारले, “का?”

श्री इंदुभाई शहा आर्जवी स्वरात म्हणाले, “भगवान पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेत व्यत्यय येईल व भक्तांना त्रास होईल.”

बाबा हसले. त्यांनी इंदुभाईचा हात पकडून त्यांना खिडकीपाशी नेले व पाऊस आधीच सुरू झाल्याचे दाखवले. बाबा म्हणाले, “हो पाऊस येणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे.” त्यानंतर बाबांनी आपला हात उर्ध्व दिशेला खिडकीतून बाहेर काढला. क्षणार्धात पावसाची सर थांबली आणि काळे ढग नाहीसे झाले.

सभा नियोजित वेळेनुसार सुरू झाली. बाबा परमेश्वर आहेत व त्यांची पंचतत्वांवर सत्ता आहे हे क्षणभरासाठी आपण विसरलो हे इंदुभाईंच्या लक्षात आले. बाबा सर्वशक्तिमान आहेत याचा त्यांनी सप्रमाण पुरावा दिला होता.

७. ॐ श्री साई साधु वर्धनाय नमः

जगातील लोकांमध्ये चांगुलपणा वर्धित करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

साधु – चांगले व सद्गुणी, वर्धन – वाढवणे.

बालपणापासून सत्याला कोणत्याही जीवाप्रती क्रूरता सहन होत नसे. अन्नासाठी पशुहत्या करण्यास ते त्यांच्या कुटुंबासह सर्व लोकांना परावृत्त करत असत. जेव्हा एखादा पक्षी रात्रीच्या भोजनासाठी निवडला जाई तेव्हा सत्या त्या पक्षाकडे धाव घेऊन त्यास आलिंगन देई व त्याच्यावर दया करून त्याला सोडून देण्यासाठी वडिलधाऱ्यांकडे आर्जव करीत असे.

गावामध्ये आयोजित केली जाणारी बैलगाड्यांची शर्यत व कोंबड्यांची झुंज हे कार्यक्रम त्यांना अजिबात मान्य नव्हते. ते म्हणाले, “मौजेखातर लोक मुक्या पशुपक्षांचा छळ करतात, मला हे मान्य नाही.” त्यांनी हे क्रिडा प्रकार थांबवण्यासाठी मोठ्यांचे मन वळवण्यात यश मिळवले..

सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा ह्या स्वामींच्या संदेशाने लक्षावधी लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवले.

बाबांनी सुरू केलेल्या विविध शैक्षणिक संस्थांमधून केवळ उत्तम पारंपरिक शिक्षण दिले जात नाही तर मानवी मूल्यांचे महत्व यावर ते विशेष भर देतात. जेव्हा तेथील विद्यार्थी आशीर्वाद घेऊन मुख्य प्रवाहात मिसळतात, तेव्हा उत्तम चारित्र्य व मूल्ये यांचे तेजस्वी उदाहरण म्हणून उठून दिसतात, त्यांचे विद्यार्थी जीवनाच्या सर्व थरांमध्ये परिवर्तनाचे प्रतिनिधीत्व करतात, नवयुगाचे ते अग्रदूत आहेत जे आणण्यासाठी स्वामी येथे आले आहेत.

८. ॐ श्री साई साधुजन पोषणाव नमः

साधुजनांचे (सदाचरणी लोकांचे) पोषण करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

साधु – सदाचरणी, चांगले, जन – व्यक्ती, लोक, पोषण – पोषण.

बाबा चांगल्या लोकांचे क्षेमकुशल पाहतात, बँकॉकमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एका सकाळी डॉ. आर्ट-आंग-जुमसाई ह्यांच्या आईला कोणीतरी दरवाजा ठोठावल्याचे ऐकू आले. त्यांनी दरवाजा उघडला. बाहेर एक भगवे वस्त्र धारण केलेली व्यक्ती उभी होती, त्यांनी तिला एक पाकीट दिले, ‘त्यामध्ये पावडर होती. व ती पांढव्या रेतीसारखी दिसत होती.’ त्यांनी तिला तो पावडर घरामध्ये सर्वत्र शिंपडण्यास सांगितले. ते तिच्याशी तिच्या मातृभाषेत बोलले. पावडर शिंपडल्याने बॉम्ब पासून तिच्या घराचे रक्षण होईल ह्याची ग्वाही दिली. त्या स्त्रीने त्यांनी सांगितल्यानुसार पावडर शिंपडलो. थोड्याच वेळात त्या भागात जोरदार बॉम्बहल्ला झाला. त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या सर्व इमारती त्या हल्ल्यात जमीनदोस्त झाल्या. तथापि त्यांच्या घराला स्पर्शही झाला नव्हता. अनेक वर्षानंतर स्वामीनी हे रहस्य डॉ. जुमसाईंना उघड केले. ज्यांनी त्यांच्या आईला पाकीट दिले ते स्वामी होते व त्यांनी त्यांच्या रक्षणार्थ विभूतीचे पाकीट दिले होते.

९. श्री साई सर्वज्ञाय नमः

सर्वज्ञ साईंना आम्ही वंदन करतो.

सर्वज्ञ – सर्व जाणणारा .

भक्तांना अनेकवेळा असा अनुभव आला आहे की त्यांनी कधीही स्वामींना त्यांच्याविषयी काहीही सांगितले नसूनही स्वामी त्यांचा भूत, वर्तमान आणि भविष्य जाणतात. स्वामींना सांगण्यापूर्वीच ते त्यांच्या समस्या जाणतात. त्यावर चर्चा करतात आणि त्यांचे निराकरणही करतात.

सत्या लहाने असताना एकदा अचानक एका इंग्रज मनुष्याची जीप गावाबाहेर बंद पडली. जीप सुरू करण्याचे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्याच्या ड्रायव्हरने सांगितले की येथून जवळच एक ‘दैवी मुलगा’ राहतो. तो कदाचित मदत करू शकेल. त्यांनी सत्याचा शोध घेतला व आपली समस्या सांगितली ते ऐकून सत्या जीपपर्यंत जाण्यास तयार झाला.

तेथे पोहोचल्यावर सत्या त्या इंग्रजी मनुष्यास म्हणाला, “तू एका वाघिणीची हत्या केलीस, जिने तुला काहीही इजा पोहोचवली नव्हती. ती तिच्या पिलांना सांभाळ करत असताना तू तिला मारलेस. पिलांनी त्यांच्या आईला गमावले. तुला याची जाणीव व्हावी म्हणून मीच तुझे वाहन बंद पाडले.” ते ऐकून त्या इंग्रज मनुष्याची मती गुंग झाली.

लहानग्या सत्याने त्याला सांगितले, “आपल्या स्वत:च्या मौजेखातर कधीही एखाद्या जीवाची हत्या करू नकोस.” ते पुढे म्हणाले, “त्या पिलांना शोधून त्यांना एखाद्या प्राणिसंग्रहालयात घेऊन जाण्याचे तू वचन दे, जर असे वचन तू मला दिलेस तर मी तुझी जीप सुरू करेन.”

त्याने वचन दिल्यानंतर, स्वामींनी जीपला स्पर्श केला अन् ता सुरू झाली.

१०. श्री साई सर्व जन प्रियाय नमः

सर्वांना प्रिय असणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

सर्व – सर्व, जन – लोक, प्रिय – प्रिय.

बालपणापासूनच सत्या केवळ मुलांमध्येच नव्हे तर मोठ्यांमध्येही खूप लोकप्रिय होता. शाळेतल्या शिक्षकांचाही तो अत्यंत लाडका विद्यार्थी होता.

आज स्वामी जेथे जेथे जातात तेथे, अनेक देशांमधील गरीब आणि श्रीमंत, विद्वान आणि अशिक्षित, राजकारणी, उद्योगपती आणि इतर असे जीवनाच्या सर्व थरांमधील लोक त्यांचे ओझरते दर्शन मिळावे त्यासाठी जमा होतात.

जगभरातील लक्षावधी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम व शांतीचे प्रेषित म्हणून पूज्यभाव आहे. ते सवांवर प्रेम करतात व सर्वजण त्यांच्यावर प्रेम करतात.

११. ॐ श्री साई सर्व शक्ती मूर्तये नमः

सर्व दिव्य शक्तीस्वरूप असणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

सर्व – सर्व, शक्ती – शक्ती, मूर्तये – मूर्ती, प्रतिक, स्वरूप.

असाध्य रोगांचे निर्मूलन, एकाच वेळी एकाहून अधिक ठिकाणी उपस्थिती, विशेष दृष्टी प्रदान करणे, विभूती सृजित करणे, केवळ हाताच्या हालचाली करून इतर भेटवस्तू सृजित करणे, मृत व्यक्तीस पुनर्जिवीत करणे, भक्तांना अपघातातून वाचवणे ह्यासारख्या बाबांच्या असंख्य चमत्कारांमधून त्या सर्व दिव्य शक्ती दिसून येतात.

बाबा पुट्टपर्तीमधील जुन्या मंदिरात राहत असताना, एकदा चित्रावती नदीला महापूर आला. नदीच्या पाण्याने मंदिराला वेढा घातला. काही क्षणातच पाणी मंदिरात आत येऊन सर्व जलमय होऊन जाईल अशी परिस्थिती पाहून सर्वजण भयभीत झाले.

त्याच क्षणी बाबा पाण्यातून चालत गेले आणि म्हणाले, “बास, आता. मागे जा.” तत्काळ पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. जलतत्त्वानेही बाबांची आज्ञा तत्काळ शिरसावंद्य मानली.

१२. ॐ श्री साई सर्वेशाय नमः

सर्व देवांचे देव असलेल्या साईंना आम्ही वंदन करतो.

सर्व – सर्व, ईश –देव, (सर्वेश – सर्व देव).

“सर्व नामं आणि रूपे माझीच आहेत”, ते म्हणतात, जे भगवान कृष्णाच्या रूपाची भक्ती करतात त्यांच्यासाठी ते कृष्ण आहेत. ख्रिश्चनांसाठी ते जीझस आहेत, काहींसाठी प्रभु श्रीराम आहेत आणि इतरांसाठी दिव्य माता आहेत.

एकदा एका रोमन कॅथलिक दाम्पत्याने प्रशांती निलयमला भेट दिली. त्या स्त्रीचा बाबांवर अजिबात विश्वास नसल्याने ती द्विधावस्थेत होती. बाबांनी त्यांना मुलाखतीसाठी बोलावले. त्या पुरुषाने काही फोटो काढण्यासाठी बाबांची परवानगी मागितली. बाबांनी संंमती दिली. परत गेल्यावर त्या दाम्पत्याने फिल्मवर पुढील क्रिया केली व फोटोतील श्री सत्य साईबाबांच्या जागी जीझस ख्राईस्टचा फोटो पाहून ते आश्चर्यचकित झाले.

१३. ॐ श्री साई सर्व संग परित्यागिने नमः

सर्व भौतिक आसक्तीचा त्याग केलेल्या साईंना आम्ही वंदन करतो.

संग – आसक्ती, परित्याग – त्याग.

सत्या १४ वर्षाचा असताना, त्याचे मोठे बंधू श्री शेषम राजू यांच्याबरोबर उरवकोंडा येथे राहत होता व तेथील शाळेत जात होता. २० ऑक्टोबर १९४० ह्या दिवशी नेहमीप्रमाणे सत्या शाळेतून आला व घराबाहेरील पायरीवर उभा राहून त्याने त्याची पुस्तके बाजूला टाकून दिली आणि तो म्हणाला, “आता मी तुमचा सत्या नाही. मी साई आहे. आता मी चाललो. मी आता तुमचा राहिलो नाही. माया निघून गेली. माझे भक्त मला बोलावत आहेत, मला माझे कार्य करायचे आहे.” त्याची वहिनी त्याची आर्जव करत होती. तथापि, तो वळला व निघून गेला. तेथून तो एक्साईड इन्स्पेक्टर श्री अंजनेयुलु यांच्या बगीच्यामध्ये एका दगडावर जाऊन बसला. त्याचे मागोमाग गेलेले लोक त्याच्याभोवती बसले. येथे सत्याने त्यांना “मानस भज रे गुरु चरणम्, दुस्तर भवसागर तरणम्” (हे मानवा, गुरू चरणांची भक्ती तुला भवसागर पार करतील) हे पहिले भजन शिकवले.

१४. ॐ श्री साई सर्वान्तर्यामिने नमः

सर्वाच्या अंतरात वास करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

अंतर – iआत मध्ये, यामी – वास करणारा.

स्वामी आपल्या सर्वांमध्ये वास करतात. प्रत्येकास काय हवे, हे ते जाणतात व योग्य वेळी प्रदान करतात. एका विद्यार्थ्याने आई-वडिलांना पैसे पाठवण्यास सांगितले. परंतु, ते अद्याप न मिळाल्यामुळे तो अत्यंत चिंतीत होता. स्वामींनी त्याचा चिंताक्रांत चेहरा पाहून त्याला त्याचे कारण विचारले. त्या मुलाने काहीच उत्तर दिले नाही. स्वामी त्याला म्हणाले, “तू पैसे पाठविण्याविषयी तुझ्या वडिलांना पत्र लिहिले आहेस ना? तुला अजून मनी ऑर्डर मिळाली नाही. मी हे जाणतो.”

त्यानंतर त्यांनी भक्तांकडून घेतलेल्या पत्रांमधून त्या मुलाला कोणतेही एक पाकीट घेण्यास सांगितले. त्याने घेतलेले पाकीट उघडण्यास सांगितले. ते उघडल्यावर त्या मुलाला त्यामध्ये ५०० रुपयांची एक नोट मिळाली.

ते पाहून तो मुलगा थक्क झाला. स्वामी त्याला म्हणाले, “ती नोट घे. ती तुझ्यासाठीच आहे. तू फक्त ५०० रुपयेच मागितलेस. जर तू अधिक मागितले असतेस तर मी अधिक दिले असते.”

स्वामी म्हणाले, “मी घोषित करतो मी की प्रत्येकामध्ये आहे. प्रत्येक जीवामध्ये आहे. तुम्ही माझा पदरव ऐकू शकला असता कारण मी तुमच्याबरोबर चालतो. मी तुमच्या मागे आहे, बाजूला आहे. जेव्हा तुम्ही दुःखाने विलाप करता तेव्हा मी ते ऐकू शकतो. तुम्ही माझ्याकडे तुमचे संरक्षण मागा.माझी दृष्टी सदैव तुमचे अवलोकन करेल व तुमचे रक्षण करेल”

१५. ॐ श्री साई महिमात्मने नमः

अगाध महिमा असणाऱ्या सर्वश्रेष्ठ साईंना आम्ही वंदन करतो.

महिमात्मने – मूर्तिमंत महिमा.

साई हे मानवी रूपातील दिव्यत्व आहेत, ते सर्व सद्गुणांचे दिव्यगुणांचे मूळ स्त्रोत आहेत. त्यांना सर्व कला अवगत आहेत. तसेच ते सर्वश्रेष्ठ शिल्पकार आहेत. हस्तसंचालन करून अवर्णनीय सुंदर वस्तू ते सूृजित करतात. सुरुवातीचे शिक्षण सोडले तर त्यानंतर त्यांनी कधीही औपचारिक शिक्षण घेतले नाही तरीही त्यांना सर्व भाषा अवगत आहेत. सर्व धर्मग्रंथ, सर्व शास्त्रे अवगत आहेत.

बाबांच्या चमत्कारामागे प्रेरणा देणे व श्रद्धा वळकट करणे हा हेतू असतो.

गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ, श्री सत्य साई जनरल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रसूतितज्ज्ञ डॉ. प्रभा म्हणतात की सुरुवातीच्या काळात त्या नायजेरियात असताना त्यांना एका मनुष्याने विभूतीचे पाकीट दिले व ते श्री सत्यसाई बाबांनी दिल्याचे सांगितले. त्यांना बाबांविषयी काही माहिती नव्हती परंतु त्यांनी हे पाकीट ठेवले. त्यानंतर लगेचच असे घडले, त्यांच्या एका रुग्णाची अवस्था चिंताजनक होतो. परिस्थिती पूर्णत; निराशाजनक दिसत होती. अचानक त्यांना त्या विभूतीच्या पाकिटाची आठवण झाली, त्यांनी त्या रुग्णास विभूती लावली आणि काय आश्चर्य तो स्त्री रुग्ण पूर्णपणे बरी झाली,
जेव्हा त्या भारतात आल्या तेव्हा बाबांच्या दर्शनासाठी गेल्या त्यांच्या सांगण्यानुसार नंतर, “जे घडले त्याचा तपास करण्यासाठी आलेल्या डॉक्टरला त्यांनी जिंकले व त्या त्यांच्या कमल चरणांशी प्रार्थना करण्यासाठी तेथेच राहिल्या.”

१६. ॐ श्री साई महेश्वर स्वरूपाय नमः

भगवान शिवांचे मूर्तिमंत स्वरूप असणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

महेश्वर – भगवान शिवांचे एक नाम.

स्वरूपा – स्वरूप.

उखकोंडा येथे बाबा विद्यार्थी दशेत असताना, त्यांचे मोठे बंधू श्री शेषम राजु जे शाळेमध्ये शिक्षक होते, त्यांनी हम्पी येथील प्रसिद्ध विरूपाक्ष (शिव) मंदिरास भेट देण्यासाठी सहल आयोजित केली. सर्वांनी मंदिरात प्रवेश केला परंतु सत्या मात्र थांबला. मंदिराचे पुजारी भगवान विरूपाक्षाची आरती करत असताना भक्तांंनी गाभार्यातील भगवान विरूपाक्षच्या जागी सत्याला पाहिले.

श्री शेषम राजू क्रोधित झाले. त्यांना वाटले की सत्या सर्वांची नजर चुकवून आतमध्ये गेला असावा. सत्या अजून बाहेर उभा आहे का हे पाहण्यासाठी ते रागारागाने बाहेर आले. त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्यांनी एकास, सत्या अजून गर्भगृहात आहे का हे पाहण्यासाठी आत पाठवले व स्वत: बाहेर उभ्या असलेल्या सत्यावर नजर ठेवण्यासाठी तेथे थांबले. जेव्हा त्यांना समजले की सत्या मंदिराच्या आत व बाहेर दोन्हीकडे उभा आहे तेव्हा त्यांची मती गुंग झाली.

सत्यानी त्याच्या दिव्यत्वाची, सर्वव्यापकतेची व त्याच्या वास्तवाची झलक दाखवली.

१७. ॐ श्री साई पर्तीग्रामोद्भवाय नमः

पुट्टपर्ती गावामध्ये जन्मलेल्या साईंना आम्ही वंदन करतो.

पर्ती – पुट्टपर्ती, ग्राम – गाव, उद्भव – जन्म.

आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे २३ नोव्हेंबर १९२६ रोजी ईश्वराम्मा व पेद्दा वेंकप्पा राजू या दाम्पत्याच्या पोटी श्री सत्यसाई बाबांचा जन्म झाला. त्यांचा जन्म होण्याअगोदरच त्यांच्या घरातील सर्व वाद्ये आपोआप वाजू लागली, ज्योतिषांनी दिव्यत्व अवतार घेणार असल्याचे भाकित केले.

पूर्वी पुट्टपर्ती गोलापल्ली म्हणजेच गुराख्यांचे गाव म्हणून ओळखले जाई. ते अत्यंत समृद्ध व सधन गाव होते. गावातील एका गुराख्याच्या असे लक्षात आले की, दररोज त्याची एक गाय रानातून घरी परतल्यावर दूध देत नाही. तिची आचळे रिक्त असतात. त्याचा छडा लावण्यासाठी तो गाईच्या मागोमाग गेला. त्याने जे दृश्य पाहिले त्याने तो आश्चर्यचकीत झाला. एक नाग वारुळातून बाहेर आला व तो तिच्या आचळांना तोंड लावून दूध पीत होता. गुराखी क्रोधित झाला व त्याने एका मोठ्या दगडाने नागाला ठार मारले.

या घटनेनंतर तेथील गुराख्यांची संख्या घटली व सर्वत्र वारुळाचे पेव फुटले. हे त्या मारलेल्या नागाच्या शापाने घडले अशी लोकांची समजूत होती. अशा त-हेने गोलापल्लीचे नाव पुट्टपर्ती (वारुळाचे गाव) पडले.

स्वामींच्या जन्मानंतर हे गाव पुन्हा समृद्ध व सधन होऊ लागले.

१८. ॐ श्री साई पर्तीक्षेत्र निवासिने नमः

पर्तिक्षेत्र निवासी साईंना आम्ही वंदन करतो.

क्षेत्र – स्थान, निवास – वास्तव्य.

वयाच्या १४ व्या वर्षी, उरवकोंडा येथे बाबांनी त्यांचे दिव्य अवतारकार्य प्रकट केले, जसे जसे दूरदूरच्या गावातून लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले व त्याला दर्शनासाठी आपल्या गावी येण्याची विनंती करू लागले तशी त्याच्या आई-वडिलांना तो आपल्याला सोडून दूर जाईल अशी भीती वाटू लागली. ईश्वराम्मा सत्याला म्हणाल्या, “बाळा, तू केवळ पुट्टपर्तीतच राहशील असे मला वचन दे. तुझे भक्त येथे येऊ देत. आपण त्यांचे आनंदाने स्वागत करू.” सत्या म्हणाला, “माझे कार्यक्षेत्र म्हणून मी पुट्टपतींची निवड केली आहे. हे वरदान केवळ तुझ्यासाठी दिले नसून, या गावासाठी, विश्वासाठी आहे.”

जशी जशी त्यांची कीर्ति वाढत गेली तसे जगभरातून त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. ते छोटेसे गाव हळूहळू विकसित होऊन त्याचे परमशांतीचे धाम म्हणजेच प्रशांतो निलयम नावाच्या आध्यात्मिक केंद्रात रूपांतर झाले. बाबांनी घोषित केले आहे. पुट्टपतों हे दुसरे तिरुपती वा मथुरा असेल.”

१९. ॐ श्री साई यशः काय शिर्डीवासिने नमः

पूर्व अवतारामध्ये शिर्डी वासी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

यश – कीर्ति, प्रसिद्धीकाया – देह, वास – निवास.

शिर्डी साईबाबांनी अलौकिक आध्यात्मिक शक्ती दर्शवल्या , त्याची कीर्ति दूरवर पसरली. इहलोकगमन करण्यापूर्वी शिर्डीसाईंनी लोकांना सांगितले की, त्यांनी त्यांच्या मृत्युचा शोक करू नये. कारण ते ८ वर्षांनी पुन्हा जन्म घेणार आहेत. १९१८ साली त्यांनी देहत्याग केला. श्री सत्य साई बाबांनी १९२६ साली जन्म घेतला.

सत्या बालपणापासून त्यांचा परिचय देताना संकेतार्थ शिडींसाईंचा संदर्भ देत असे. त्यांनी त्यांच्या सवंगड्यांना शिर्डी साईवर रचलेली गीते शिकवली. वास्तविक भारताच्या त्या भागातील कोणासही शिर्डीविषयी काही माहिती नव्हती. शिर्डी तीर्थक्षेत्र आहे हे ही कोणी ऐकले नव्हते.

वयाच्या १४ व्या वर्षी सत्याने तो शिर्डीसाई बाबांचा अवतार असल्याचे घोषित केले. जेव्हा त्याला ते सिद्ध करण्यास सांगितले तेव्हा त्याने थोडी जुईची फुले मागितली. त्याला फुले दिल्यावर त्याने ती जमिनीवर फेकली आणि चमत्कार झाला. त्या फुलांनी तेलगु भाषेत ‘साईबाबा’ हे शब्द धारण केले.

२0 . ॐ श्री साई जोड़ी आदि पल्ली सोमप्पाय नमः

शिवशक्ती स्वरूप, अर्धनारीनटेश्वर साईंना आम्ही वंदन करतो.

२५ नोव्हेंबर १९५८ चा तो दिवस होता. प्रशांती निलयममधील स्वामींच्या जन्मदिनाचा समारंभ आटपून एक भक्त व त्यांचे कुटुंबिय बंगळुरला निघाले होते. वाटेत त्यांच्या २ वर्षाच्या मुलीला फीट आली आणि अचानक तिचा श्वास थांबला. शोकाकुल झालेले कुटुंबिय कोणाची मदत मिळते का ते पाहू लागले. अवचित तेथे एक वृद्ध गृहस्थ अवतीर्ण झाले. त्यांनी त्या मुलीला आपल्या हातामध्ये घेतले. त्यांचा स्पर्श होताच त्या मुलीच्या देहामध्ये चैतन्य आले व ती रडू लागली. पालकांच्या आनंदाला सीमा उरली नाही.

तेव्हा त्या वृद्ध गृहस्थांना त्यांचे नाव विचारले तेव्हा त्यांनी सांगितले “जोडी आदिपल्ली सोमप्पा”.

नंतर बाबांनी ती वृद्ध व्यक्ती जिने त्या मुलीला पुनर्जीवन दिले ती म्हणजे स्वत: स्वामीच असल्याचे स्पष्ट केले.

बाबांनी त्यांच्या त्या नावाचे स्पष्टीकरण दिले. आदिपल्लीचा अर्थ – मूळ स्थान, कैलास – भगवान शिवाचे निवासस्थान, जोडीचा अर्थ दांपत्य, सोमचा अर्थ (सा + उमा भगवान शिव + पार्वती, शक्ती) अप्पा म्हणजे पिता. म्हणून स्वामी शिव-शक्ती आहेत. अशा त-हेने भगवानांनी त्यांचे खरे शिव-शक्ती स्वरूप प्रकट केले.

२१. ॐ श्री साई भारद्वाज ऋषी गोत्राय नमः

महान ऋषी भारद्वाज ह्यांच्या गोत्रामध्ये जन्म घेतलेल्या साईंना आम्ही वंदन करतो.

भारद्वाज – कठोर तप करून अलौकिक सिद्धी प्राप्त केलेल्या प्रसिद्ध महान कवीचे नाव, ऋषी – ऋषी , गोत्र – गोत्र, वंश.

२३ मे या दिवशी सत्या नेहमीप्रमाणे झोपेतून उठला. थोड्या वेळाने त्याने घरातील सर्व सदस्यांना बोलावले व त्यांनी शून्यातून फुले आणि खडीसाखर काढली व सर्वांना दिली.

त्यांच्या शेजाऱ्यांनीही तेथे गर्दी केली. त्यांनी प्रत्येकाला हस्त संचलनाने सृजित केलेली दूधभाताची एक एक मूद दिली. त्यांचे वडील वेंकप्पा राजू यांना मात्र ही हातचलाखी वाटत होती.

हातात काठी घेऊन त्यांनी सत्याला बोलावले व अत्यंत क्रोधित होऊन त्यांनी विचारले, “तू कोण आहेस? तू परमेश्वर आहेस. भूत पिशाच्च आहेस का वेडा आहेस? सांग मला.’

सत्या शांतपणे म्हणाला, “मी साईबाबा आहे. माझे आपस्तंब सूत्र व भारद्वाज गोत्र आहे. मी तुमच्या पीडा, अडचणी दूर करण्यासाठी आलो आहे.”

२२. ॐ श्री साई भक्तवत्सलाय नमः

आपल्या भक्तांवर मातृवत प्रेम करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

भक्त -भक्त, वत्सलाय – मातेची ममत, मातेचे वात्सल्य.

आपण सर्वजण श्री सत्यसाई बाबा हया दिव्य मातेची लेकरे आहोत.

एकदा एका विद्यार्थ्यांच्या पावलाला फ्रेंक्चर झाले होते. स्वामींनी त्या मुलाला बोलावून एक विशेष मलम सृजित करून दिले आणि त्यांनी स्वतः ते त्याच्या पावलावर लावले. स्वामीनीं ते करू नये यासाठी तो त्यांचा आर्जव करत होता.

Swस्वामी म्हणाले, “जर तू घरी असतास तर तुझ्या आईने हेच केले नसते का? मी तुझी माता आहे!”

२३. ॐ श्री साई अपान्तरात्मने नमः

सर्वाच्या हृदयात वैश्विक चैतन्याच्या रूपाने वास कारणाच्या साईंना आम्ही वंदन करतो.

अंतरात्मा – अंतरात्मा.

स्वामी म्हणतात, “lमी सर्व जीवांमध्ये वास करणारा आत्मा आहे”

कोडाईकॅनॉलमध्ये त्यांच्याबरोबर आलेल्या एका विद्यार्थ्याला बाबांनी विचारले, “काल रात्री तुला चांगली झोप लागली का? मला माहीत आहे, काल तुझे पोट बिघडल्यामुळे तुला शांत झोप लागली नाही.”

कोडाईमध्ये रात्रीच्या भोजन वाढते वेळी स्वामी व्यक्तीश: लक्ष घालतात. कोणीही न सांगता, त्यांना प्रत्येकाचा आवडता पदार्थ माहीत असतो व तो पदार्थ त्याला पुन्हा वाढला जातोय ना याचा ते खात्री करतात. हे सर्व ते कसे जाणतात? हे सर्व ते जाणतात कारण ते आपल्या प्रत्येकामध्ये वास करतात.

२४. ॐ श्री साई अवतार मूर्तये नमः

सर्व अवतारस्वरूप साईंना आम्ही वंदन करतो.

अवतार – अवतार, मूर्ति – स्वरूप

अवतारांच्या विविध रूपांमध्ये स्वामींनी स्वतःला प्रकट केले आहे. ज्या भक्तांची इष्टदेवता श्रीराम आहे त्यांना स्वामींनी श्रीराम प्रभुंच्या रूपात दर्शन दिले. जे कृष्ण रुपाची भक्ती करतात त्यांना कृष्णरूपात दर्शन दिले, काहींना गणपती रूपात तर काहींना कालीमातेच्या रूपातही दर्शन दिले.

एकदा बालसत्या आपल्या सवंगड्यांबरोबर अंजनेय स्वामी (हनुमान) मंदिरात गेला, त्याने मुलांना सांगितले, “तुम्ही अंजनेय स्वामींना प्रदक्षिणा घालून परत या. मी येथेच थांबतो.” परंतु ती मुलं त्याच्याशिवाय जायला तयार झाली नाहीत. त्यांनीही आपल्याबरोबर यावे असा मुलांनी आग्रह धरला, अखेरीस सत्या त्यांच्याबरोबर जाण्यास तयार झाला व तो मंदिराभोवती चालू लागला. अचानक कोठून तरी एक मोठे वानर त्याच्या मार्गात येऊन उभे राहिले व त्याचा मार्ग आडवला. मुलांनी त्याला हुसकावून लावण्याचा खूप प्रयत्न केला. तथापि ते वानर जागचे हालले नाही.

मुलांना ते समजले नाही की ते महा वानर म्हणजे प्रत्यक्ष हनुमान होते व त्यांनी स्वामींना प्रार्थना केली, “स्वामी मी तुम्हाला प्रदक्षिणा घातली पाहिजे. तुम्ही मला प्रदक्षिणा घालू नका.”

स्वामी म्हणाले, “हे मानवी रूप असे आहे की ज्यामध्ये, दिव्यत्वाचे प्रत्येक अस्तित्व, प्रत्येक दिव्य तत्व आणि मानवाची परमेश्वराशी जोडलेली सर्व नामे आणि रूपे विद्यमान आहेत. तुम्ही अत्यंत भग्यवान आहात की तुम्हाला आता ह्यच जन्मात सर्वदेवता स्वरूपाच्या दर्शनाच्या आनंदाची अनुभूती घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.”

२५. ॐ श्री साई सर्व भय निवारिणे नमः

सर्व भयांचे निवारण करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

स्वामींची अभय हस्त मुद्रा म्हणजे अभयाची ग्वाही म्हणजेच ‘भिऊ नकोस’ ही मुद्रा म्हणजे व्याधी, निराशा, आपत्ती, संशय, शंका आणि भय ह्यापासून आपल्या संरक्षणाची हमी. तुम्ही त्यांच्याकडे संरक्षण मागण्यापूर्वीच तुम्हाला संरक्षण देण्याची त्यांना घाई असते.

प्रशांती निलयममध्ये काम करणाऱ्या एका तरुण बांधकाम मजूराचा पाय एका वजनदार ट्रकखाली चिरडला गेला. त्याचा भाऊ रडत रडत स्वामींकडे गेला व त्याने स्वामींना त्याच्या लहान भावाचा पाय गमावल्याची घटना सांगितली.

स्वामी त्याला म्हणाले, “काळजी करू नकोस त्याच्या पायाला काहीही झालेले नाही. त्यांनी त्यांचा हाताचा तळवा त्या मुलाला दाखवला त्यावर त्या वजनदार ट्रकच्या टायरच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्या तरुण मुलाच्या पायाचे रक्षणा करण्यासाठी, त्या मुलाने त्यांना’ बोलावण्याअगोदरच स्वामींनी ट्रकचे टायर व त्या तरुण मुलाचा पाय ह्यामध्ये स्वत:च्या हाताचा तळवा ठेवला.

२६. ॐ श्री साई आपस्तम्ब सूत्राय नमः

ब्रह्मर्षि आपस्तंबांच्या घरामध्ये जन्म घेतलेल्या साईंना आम्ही वंदन करतो. आपस्तंब ऋषिंनी दीर्घकाल कठोर तप केले आणि अखेरीस त्यांना भगवान शिवाचे दर्शन झाले. त्यांनी धार्मिक विधी व आध्यात्मिक साधना सूत्र लिहिले. १४ व्या वर्षी बाबांनी ते ऋषि आपस्तंब ह्यांच्या वंशातील असल्याचे घोषित केले.

२७. ॐ श्री साई अभय प्रदाय नम:

सर्वांना अभय प्रदान करणाऱ्या साईना आम्ही वंदन करतो.

अभय – अभय, प्रदाय – देणे.

“मी जवळ असताना भीती कशाची? मी तुमच्यामध्ये आहे. तुझ्याबरोबर आहे. तुमच्याभोवती आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे व तुमचे संरक्षण करत आहे.”

 बाबा सर्वांना खात्री देतात.

जेव्हा आपल्याला निकड असेल तेव्हा ते आपल्यासाठी धावून येणारा सच्चा मित्र आहेत. आपल्या भौतिक व आध्यात्मिक समस्यांपासून ते आपलं रक्षण करतात. दुखापतींपासून ते आपलं रक्षण करतात. जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा ते त्यांच्या स्वतःच्या वा अन्य रूपात येऊन आपला बचाव करतात. एकदा कस्तुरींचा मुलगा, मूर्ती आसामच्या जंगलामध्ये काही कामासाठी गेला होता. जंगलातून एकटाच जात असताना, एक जंगली अस्वल त्याचा पाठलाग करू लागले. भयभीत होऊन त्या अस्वलापासून दूर धावताना, तो अडखळला आणि पडला. तथापि “बाबा! बाबा!” असा अखंड धावा त्याने सुरू ठेवला. क्षणार्धात कोठून कोण जाणे परंतु एक ट्रक तिथे आला आणि त्यामध्ये चढ़ून मूर्ती संकटातून बचावला.

काही महिन्यांनी जेव्हा तो प्रशांती निलयममध्ये गेला तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, “मला तुझा फोन मिळाला आणि मी एक ट्रक पाठवला. तो वेळेत तुझ्यापर्यंत पोहोचला ना?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: