दैवी जीवन घटना

Print Friendly, PDF & Email
श्री सत्यसाई आधोत्तर, गट २ – २८ ते ५४ नामावली
प्रस्तावना

श्री सत्यसाई बाबा म्हणतात, ‘नाम’, देवाचे नाम तुमच्या जिभेवर ‘रूप’, त्याचे रूप तुमच्या अंत:चक्षुंसमोर आणि त्याची थोरवी तुमच्या हदयात असू द्या. मग मोठ्या विजेचा लोळही तुमच्या जवळून सहज पुढे निघून जाईल. सत्यसाई अष्टोत्तर मध्ये भगवान श्री सत्यसाई बाबांची नामे आणि वैभव समाविष्ट आहेत.एकशेआठ किंवा एक हजार आठ नामांच्या पठणाची शिफारस का केली आहे? अशी लांबलचक मोठ्या आवाजात स्तुती केली म्हणजे भगवंत प्रसन्न होतो म्हणून नव्हे. तर त्या आकड्याची शिफारस केली आहे. याचे कारण एकशे आठ किंवा एक हजार आठ नामांपैकी निदान एखादे नाम तरी आपण प्रामाणिकपणे, आर्ततेने उच्चारण्याची शक्यता असते आणि प्रामाणिकपणाला प्रतिसाद देण्यास सदैव तत्पर असलेला भगवंत ते एक नाम ऐकेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल.१०८ आणि १००८ या संख्येचे महत्त्व – १०८ व १००८ यामध्ये १ आणि ८ हे अंक असून त्यांची बेरीज १ +८ = ९ होते. नऊ या अंकास दिव्यांक किंवा परब्रह्म संख्या म्हटले आहे. कारण या संख्येचे विभाजन होऊ शकत नाही. नवाला कोणत्याही संख्येने गुणले व त्या संख्येच्या अंकांची बेरीज केली तर ती अखेरीस नऊ होते. उदाहरणार्थ ९X ३=२७, २+७=९

ओम किंवा ओंकाराचे महत्व

ॐ किंवा ॐकार हा आदिध्वनी असून यातूनच ईश्वराने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. विश्वातील सर्व ध्वनींचा उगम ओंकारापासून झाला आहे. याने सर्व विश्व व्यापले आहे. पाचही मूलतत्त्वांमध्ये या ध्वनीमुळे कंपने उत्पन्न होतात. याला प्रणव असेही म्हणतात. हा सर्व सजीव प्राण्यांचा अंतर्ध्वनी आहे.

ईश्वराची वर्णिलेली सर्व नामे ओंकारध्वनीत सामावलेली आहेत व जतन केली आहेत. म्हणून ओंकार अतिशय शक्तिस्वरूप ध्वनी आहे. ज्याप्रमाणे डब्यांची लांबलचक आगगाडी इंजिनाला जोडली असता पुढे धावते, त्याचप्रमाणे जेव्हा सर्व मंत्रांची सुरुवात ओंकाराने होते. तेव्हा ते अधिक शक्तिशाली व फलदायी होतात.

२८. ॐ श्री साई रत्नाकर वंशोद्भवाय नमः

रत्नाकर वंशात जन्म घेतलेल्या साईंना आम्ही वंदन करतो.

वंश– कुळ, उद्भव– जन्म

श्री सत्यसाई बाबांनी रत्नाकर राजु यांच्या कुळात जन्म घेतला. बाबा म्हणतात की, जेव्हा जेव्हा परमेश्वर अवतार घेतो, तेव्हा तो उचित कुटुंब आणि स्थान निवडतो. त्या अवतारासाठी बाबांनी रत्नाकर कुळ निवडले. वेंकावधूत नावाच्या एका महात्म्याने बाबांचे आजोबा श्री कोंडम राजू यांच्याकडे भविष्यवाणी केली होती, “प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या कुटुंबात जन्म घेणार आहे. तुम्हाला हे पाहण्याचे सद्भाग्य लाभणार आहे.”

२९. ॐ श्री साई शिडी साई अभेद शक्ती अवताराय नमः (अभेदशक्त्यावताराय)

ज्यांचा महिमा शिर्डी अवताराहून भिन्न नाही अशा साईंना आम्ही वंदन करतो.

अभेद – भिन्न, शक्ती – महिमा, अवतार – अवतार.

एकदा श्री सत्य साईबाबा डॉ. भगवंतम यांना घेऊन केरळला चालले असताना त्यांनी डॉ. भगवंतम यांना एका मोठ्या जनसमुदायाच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका वृद्ध स्त्रीकडे बोट दाखवून म्हटले. “या स्त्रीला मी तिच्या बालपणापासून ओळखतो.”

डॉ. भगवंतमना खूप आश्चर्य वाटले, “बाबा तर खूप तरुण आहेत आणि ती स्त्री खुप वृद्ध आहे मग तिचे बालपण स्वामीना कसे माहीत असेल?” बाबांनी तत्काळ त्यांच्या शंकेचे निरसन केले. ते म्हणाले की ते त्यांच्या पूर्व अवतारात शिर्डी साई अवतारात ओळखत होते.

थोड्या वेळाने डॉ. भगवंतम त्या वृद्ध स्त्रीकडे गेले व त्यांनी तिच्याकडे चौकशी केली. “तुम्ही कधी शिर्डीला गेला होता का?”

ती उत्तरली, “मी लहान असताना माझे काका मला बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला घेऊन गेले होते. तेव्हा बाबांनी मला एक पदक दिले होते ते अजूनही मी गळ्यात घालते.” असे म्हणून तिने ते पदक डॉ. भगवंतमना दाखवले व त्यांचा संशय फिटला.

भगवद्गीतेत कृष्ण म्हणतो, “हे अर्जुना, यापूर्वी तुझे आणि माझे अनेक जन्म झालेले आहेत. तुला माहीत नाही परंतु मला माहीत आहेत.”

३७. ॐ श्री साई शंकराय नमः

आनंद आणि समृद्धी प्रदान करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

शंम् – आनंद, करा– प्रदायक, देणारा .

शंकर हे भगवान शिवांचे एक नाव आहे. शिव म्हणजे मांगल्य. बाबा भक्तांच्या जीवनात मांगल्य.

घेऊन येतात. ते त्यांना आनंद व समृद्धी प्रदान करतात. ते ज्ञानज्योत प्रज्वलित करून अज्ञानाचा अंध:कार दूर करतात. बाबांनी हंपी येथील विरुपाक्ष मंदिरात शिवस्वरूपात व कोथनघट्टा येथील मंदिरातील लिंगामध्ये त्यांच्या रूपाचे व शिडींसाई रूपाचे दर्शन घडवले.

३१. ॐ श्री साई शिडी साई मूर्तये नमः

शिडी साईचा अवतार असलेल्या साईना आम्ही वंदन करतो.

आंध्र प्रदेशात राहणाऱ्या शारदादेवी हया शिर्डी साई बाबांच्या नि:स्सीम भक्त होत्या. देहत्याग करण्या अगोदर काही दिवस बाबांनी शारदादेवींना सांगितले, “मी साई बाबा हवाच नावाने आंध्र प्रदेशामध्ये पुन्हा जन्म घेणार आहे. तेव्हा तु माझ्याकडे येशील व माझ्या दिव्य सान्निध्याचा आनंद लुटशील.”

अनेक वर्षांनंतर, त्या तरुण सत्याला भेटल्या तेव्हा तो केवळ १६ वर्षांचा होता. त्या त्याचे १६ रुपये देणे लागतात असे सत्याने त्यांना सांगितले. त्या तर त्याला पहिल्यांदाच भेटत होत्या. त्यामुळे त्यांच्या त्या बोलण्याचे त्यांना खूप आश्चर्य वाटले. बऱ्याच वर्षांपूर्वी शारदादेवींनी शिर्डीला पाठवण्यासाठी ४० रुपये गोळा केले होते व त्यातले फक्त २४ रुपयेच त्यांनी शिर्डीला पाठवले असे सत्याने त्यांना सांगितले. सत्या त्यांना म्हणाला, “हे मी तुला सांगतोय ते केवळ मीच तो शिर्डी साई बाबा हे प्रमाणभूत करण्यासाठी.”

त्यानंतर त्या तेथेच निलयममध्ये राहिल्या व त्यांनी अनेक वर्ष सेवा केली. त्या कपाळावर मोठी बिंदी लावत असत त्यामुळे त्यांना प्रेमाने ‘पेदाबोट्टू’ म्हणत.

३२. ॐ श्री साई द्वारकामाईवासिने नमः

द्वारकामाईमध्ये वास करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

वास – वास्तव्य.

श्री सत्य साई, त्यांच्या पूर्व अवतारात शिर्डीमधील ‘द्वारकामाई’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पडक्या मशिदीत निवास करत होते. ‘द्वारका’ या शब्दाचा अर्थ एक असे स्थान, ज्याचे दरवाजे सर्वासाठी सदैव खुले असतात. ‘माई’ म्हणजे माता. स्वामींचे आताचे निवासस्थान प्रशांती निलयम हे ही जात, वंश, धर्म, राष्ट्रीयत्व असा कोणताही भेदभाव न करता सर्वांचे स्वागत करते.

बाबा नेहमी त्यांच्या आशीर्वादाचे प्रतीक म्हणून हस्तसंचलनाने विभूती सृजित करून भक्तांना देतात. ही विभूती काळजीपूर्वक जतन केली जाते व ती सर्व संकटांमध्ये, व्याधी आणि नकारात्मक प्रभावापासून वाचवण्यासाठी आपले संरक्षक कवच बनते.

शिर्डीबाबांकडे जे कोणी जात त्या सर्वांना शिर्डी साई बाबा आशीर्वाद म्हणून उदी देत असत. या अवतारात त्या उदीचेच पुढील रूप म्हणजे विभूती.

शिवारात्रीच्या दिवशी, प्रशांती निलयममधील पूर्णचंद्र हॉलमध्ये श्री कस्तुरी शिर्डी साईंच्या मृत्तीवर एक कलश उपडा धरत असत, स्वामी त्यांच्या बाह्या मागे सारून, त्या रिक्त कलशामध्ये हात घालून हलवत असत आणि त्यातून अक्षय्य विभूतीचा त्यांच्या शिर्डी माई मूर्तीवर वर्षाव होत असे.

३३. ॐ श्री साई चित्रावती तट पुट्टपर्थी विहारिणे नमः

पुट्टपर्ती मधील चित्रावती नदीच्या तीरावर लिला करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

तट – नदी तीर, विहार – लीला

चित्रावती नदीच्या तीरावर, बाबा त्यांच्या भक्तांबरोबर बराच वेळ व्यतीत करत असत. तेव्हाचे ते क्षण म्हणजे निव्वळ आनंददायी व विस्मयकारक होते. कधी कधी ते तत्त्वज्ञानाविषयी बोलत व धार्मिक संकल्पनेवर कथा सांगत, तर कधी कधी भजने म्हणत. बऱ्याचदा ते वाळूमध्ये हात घालून मूर्ती, गरम गरम खाण्याचे पदार्थ व मिठाई यासारख्या विविध वस्तू बाहेर काढत आणि विशेष म्हणजे त्या वस्तूंना वाळूचा एक कणही चिकटलेला नसे.

एकदा स्वामी भारत सरकारचे माजी विज्ञान सल्लागार डॉ. एस. भगवंतम् यांच्याशी भगवद्गीतेवर चर्चा करत होते. त्यांनी चित्रावतीच्या तीरावरील थोडीशी वाळू हातात घेतली व त्या वाळूचे भगवद्गीतेच्या प्रतीमध्ये रूपांतर झाले. डॉ. भगवंतम् यांनी नंतर त्या प्रतीचे जेथे मुद्रण झाले, त्या मुद्रणालयाच्या नावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तथापि ती प्रत परमेश्वराच्या स्वत:च्या दिव्य मुद्रणालयातून आली असल्यामुळे त्यावर नामनिर्देश नव्हता.

३४. ॐ श्री साई शक्ती प्रदाय नमः

शक्ती प्रदान करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

Shakti – strength, Pradaaya – giver of, bestower.

एका मुलाचा गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती . दोन आठवड्यानंतर स्वामींनी त्याला कुबड्यांच्या साहाय्याने लंगडत चालताना बघितले. स्वामींनी त्याला बोलावून त्याची विचारपूस केली. त्याला आधाराशिवाय जमिनीवर पाय ठेवायला खूप भीती वाटत असल्याचे त्याने स्वामींना सांगितले. स्वामीनी त्याचा हात पकडला व त्याला दोन-चार पावले टाकण्यास सांगितली व नंतर कोणत्याही आधाराशिवाय चालवले. “बघ, बंगारू तू हे करू शकतोस!” कोमल स्वरात स्वामी म्हणाले.

त्यांनी त्याच्यासाठी एक अंगठी सृजित केली व म्हणाले की तो इथून पुढे नेहमीसारखा चालू शकेल, नंतर त्या वर्षी त्या मुलाने १५०० मीटरच्या शर्यतीत भाग घेऊन यश मिळवले. “माझे हे यश मी माझ्या प्रिय साई मातेला समर्पित करतो.” हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव दाटून आले होते.

३५. ॐ श्री साई शरणागत त्राणाय नमः

शरणागत येणाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

शरणागत – शरण येणारा, त्राण – रक्षण.

परमेश्वर नेहमी त्याला प्रामाणिकपणे शरण येणाऱ्यांचे रक्षण करतो.

अमेरिकेतील एक लक्षाधीश श्री, जॉन सिनक्लेअर म्हणतात की एकदा ते व्यवसायानिमित्त स्वत: हेलिकॉप्टरने एका ठिकाणी जात होते. त्यांच्याकडे ‘अ’ श्रेणीतील पायलट लायसन्स होते. वाटेत हेलिकॉप्टर इंजिन बंद पडले.

ते म्हणतात, “माझे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले. माझा मृत्यु निश्चित होता. मी माझ्या खिशातून स्वामींचा फोटो काढला व त्याकडे पाहू लागलो. पुढच्याच क्षणी, स्वामी हेलिकॉप्टरमध्ये आल्याचे आढळले. त्यांनी अत्यंत कुशलतेने हेलिकॉप्टर चालवून सुरक्षितपणे टेकडीच्या बाजूला उतरवले. त्यांनी बाजूचे दार उघडून मला सावधानतेने बाहेर ओढले व हेलिकॉप्टर दूर ढकलून ते अंतर्धान पावले!”

बाबांनी म्हटले आहे. “मी तुमची सर्व ओझी वाहीन. तुम्ही आगगाडीत बसल्यावर तुमचे सामान डोक्यावर का घेता? सारं काही माझ्यावर सोडा!”

३६. ॐ श्री साई आनंदाय नमः

सदैव आनंदी असणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो

आनंद  – आनंद.

बाबा सदैव शांत आणि प्रसन्न असतात. ते सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असल्यामुळे चिंता आणि दुःख त्यांना स्पर्श करू शकत नाही.

ते म्हणतात,“स्वामी आनंदनिधान आहेत. चिंता, दुःख व अस्वस्थता साईंना स्पर्श करू शकत नाहा. मी आनंदस्वरूप आहे, आनंद माझा स्वभाव आहे, आनंद माझी निशाणी व स्वाक्षरी आहे.”

सत्या लहान असतानाही सदैव शांत असे. त्यांचे पालक कुटुंबातील सर्व मुलांसाठी जेव्हा वेगवेगळी कापडे घेऊन येत व सर्वांना त्यांच्या पसंतीचे कापड निवडण्यास सांगत तेव्हा सत्या कोणत्याही कापडासाठी कधीही आग्रह धरत नसे, सगळ्यांनी कपडे निवडून घेतल्यानंतर जे उरेल त्यावर तो संतुष्ट असे.

३७. ॐ श्री साई आनंददाय नमः

आनंद प्रदान करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

आनंद  – आनंद, दाय  – देणारा

त्यांचे दर्शन घेऊन, त्यांची वाणी ऐकून व त्यांच्या लिलांचे साक्षी बनून आपल्याला अतीव आनंदाचा लाभ होतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या लिला ऐकून वा वाचूनही आपल्याला निर्मळ आनंद मिळतो. बाबांचा एक दृष्टिक्षेप आपले अंत:करण परमानंदाने भरून टाकतो.

जेव्हा प्रशांती निलयममध्ये आपण बाबांच्या आगमनाची प्रतिक्षा करत असतो. तेव्हा आपल्याला भोवताली काही दुःखी चेहरे, काही चिंताग्रस्त तर काहींच्या चेहर्यावर भक्तीची आभा पसरलेली असल्याचे पाहायला मिळते. बाबांचे आगमन होता क्षणीच चमत्कार घडतो, जेव्हा भक्तजन मूक पूज्यभावाने. त्यांच्यावर दृष्टी केंद्रित करतात तेव्हा त्यांच्या सर्व चिंता, काळज्या, दुःख लयास जाते व शेष राहते ते केवळ प्रेम आणि त्यांच्या मुखावर विलसणारा आनंद!

ते सर्वांना त्यांचे दुःख, वेदना व विपत्ती त्यांच्या चरणांवर अर्पण करून त्यांच्याकडून आनंद घेऊन जाण्यासाठी आमंत्रित करतात. अत्यंत आनंदाने ते भक्तांना आनंद प्रदान करतात.

३८. ॐ श्री आर्तत्राणपरायणाय नमः

जे आपल्या दुःखाचे शमन करण्यासाठी साईंचा धावा करतात, त्यांना वाचवणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

आर्त – दुःख, त्राण – बचाव, सुटका, परायणाय – व्यस्त असलेले.

जे संकटसमयी त्यांचा धावा करतात त्यांना श्री सत्य साई बाबा तत्काळ प्रतिसाद देतात.

अल ड्रकर हे अमेरिकेच्या संरक्षण विभागातील मिसाईल सेंटरमध्ये एरोस्पेस इंजिनिअर होते. काही वर्षांपूर्वी अल डूकर व त्यांचा एक मित्र, हे दोघेजण एक छोटे विमान घेऊन फेरी मारण्यासाठी गेले. अचानक ते एका भयंकर वादळामध्ये सापडले. अल् ड्रकर त्या भयंकर वादळाशी सामना करत विमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा मित्र बेहोश झाला होता. निराश होऊन ते रेडिओ ट्रान्समीटरकडे ओरडुन मदत मागू लागले. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. त्या छोट्या विमानातले इंधनहीं संपत आले होते.

अशा या निराशाजनक परिस्थितीत ते देवाचा धावा करू लागले, “हे परमेश्वरा, मला वाचव. मी तुझ्या हातात आहे. तुला जे योग्य वाटते त्याप्रमाणे कर!”

अशा त्या आणीबाणीच्या क्षणी, अचानक वायरलेस सुरू झाले. धीरगंभीर आवाजात एकजण बोलत होते, “घाबरू नकोस, मी तुला सुरक्षितपणे खाली घेऊन येईन, माझ्या सूचनांचे पालन कर.”

अल ड्रकर यांनी त्या अज्ञात हितकर्त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले. अखेरीस तो हितकर्ता म्हणाला, “जर. तू याच दिशेने सरळ पुढे गेलास की तुला रेनो विमानतळ दृष्टीस पडेल. तू खाली उतरायला सुरुवात कर. आता मी तुझी रजा घेतो. तुला सद्भाग्यासाठी शुभेच्छा!”

बरोबर १२ मिनिटांनंतर, ढग निधून गेले आभाळ निरभ्र झाले व विमानतळ दिसू लागले आणि ते सुरक्षितपणे पोहोचले. ते जमिनीवर उतरल्यावर त्यांचा मित्र शुद्धीवर आला.

त्यांना पाहून विमानतळाच्या वाहतूक नियंत्रकास आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “आता यावेळी तुम्ही येथे कसे आलात? अगदी काही मिनीटांपूर्वी विमानतळावर अत्यंत गोंधळाची स्थिती होती. तुम्ही येथे जिवंत कसे पोहोचलात? तुम्ही सुरक्षितपणे विमानतळावर उतरलात हे अविश्वसनीय आहे.”

त्याने त्यांना हिमवादळ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले म्हणून विमानात इंधन भरून त्यांनी मेक्सिकोच्या सीमेकडे प्रस्थान करावे अशा सूचना दिल्या. त्यांना त्यांच्या सूचनांचे पालन केले. मेक्सिकोमध्ये उतरल्यावर ते आसऱ्याचे स्थान शोधत होते. त्यांच्या असे लक्षात आले की ते इंद्रादेवीच्या आश्रमात आहेत. तेथे काही लोक बाबांची आरती करत होते. अल् ड्रकरच्या मनात क्षणार्धात एक विचार चमकून गेला की हे सत्पुरुष आणि सुरक्षेसाठी मार्गदर्शन करणारा तो आवाज ह्यामध्ये काहीतरी संबंध आहे.

त्यानंतर लवकरच त्यांनी प्रशांती निलयमला भेट दिली. जेव्हा त्यांनी बाबांचे दर्शन घेतले तेव्हा त्यांना जाणवले की ते श्री सत्यसाईबाबाच होते ज्यांनी त्यांना त्या भयंकर वादळातून वाचवले.

३९. ॐ श्री साई अनाथ नाथाय नमः

अनाथांचे नाथ असणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

अनाथ – अनाथ,नाथ – रक्षणकर्ता, पालनकर्ता.

साईबाबा असहाय्याचे रक्षणकर्ते आहेत .

एक अत्यंत आजारी असलेली स्त्री आपल्या दोन्ही मुलांना स्वामींकडे घेऊन आली आणि म्हणाली, साईमाता, मी माझी मुले तुझ्या स्वाधीन करते.” त्यानंतर तिने अखेरचा श्वास घेतला. दोन्ही मुलांना स्वामीनीच लहानाचे मोठे केले. त्यातील एका मुलाने एका सार्वजनिक भाषणात “माझी साई माता” असा स्वामींचा परिचय देत म्हटले, “मी एक माता गमावली तथापि मला हजारो मातांच्या प्रेमाचा लाभ झाला.”

बाबा दीन दुःखीतांचे नाथ आहेत. ते म्हणतात, कोणालाही अनाथ असे संबोधू नका कारण सर्व जीव हे त्यांचीच लेकरे आहेत आणि ते सर्वांचे पालनकर्तेआहेत.

४०. ॐ श्री साई असहाय्यसहाय्याय नमः

असहाय्यांना सहाय्य करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

असहाय्य – असहाय्य, सहाय्य – मदत करणारा.

कोणीही एकटा नसतो. बाबा सदैव सर्वांबरोबर असतात. ते म्हणतात, ते आपल्या वर आहेत. आपल्या खाली आहेत, आपल्या समोर आहेत आणि आपल्या मागे आहेत.

युद्धामध्ये उद्ध्वस्त झालेल्या बोस्नियात एक साईभक्त शरणार्थीना पाव, बिस्किटांची पाकिटे वाटण्यासाठी गेली होती. तिने त्याबरोबर प्रत्येकाला स्वामींचा फोटो व विभूतीचे पाकिटही दिले. पाव, बिस्किटे खाताना, शरणार्थी स्वामींच्या फोटोकडे बघून एकमेकांना सांगत होते, “हा मनुष्य (फोटोतील) आपल्याला दररोज पाव, बिस्किटे देतो. परंतु आज त्यांनी ते तिला दिले आणि आपल्या सर्वांना वाटण्यास सांगितले.”

सर्वसाक्षी स्वामी त्या सर्व शरणार्थीची आधीपासूनच काळजी घेत होते. रंजल्या गांजल्यांना दिलासा देण्यासाठी ते नेहमीच त्यांच्या पाठीशी असतात, मग ते कितीही दूर अंतरावर का असेनात!

४१. ॐ श्री साई लोकबांधवाय नमः

अखिल विश्वाचे आप्तस्वकीय असणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

लोक – विश्व, बांधवाय – मित्र, सगेसोयरे.

एकदा मुलाखतीसाठी आलेल्या एका भक्ताने स्वामींना सांगितले, “स्वामी, मी गेल्या तीन आठवड्यापासून तुमची प्रतिक्षा करतोय.” स्वामींनी त्याला प्रेमाने उत्तर दिले, प्रिय वत्सा, मी किती वर्षापासून तुझी प्रतिक्षा करतोय हे तुला माहीत आहे का?” स्वामी त्याची प्रतिक्षा करत आहे ह्या विचाराने तो मनुष्य स्तंभित झाला. त्याला गहिवरून आले. त्याच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या.

स्वामी म्हणतात, “प्रिय मुलांनो, जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल, तेव्हा मी तुमच्या आगमनाची प्रतिक्षा करताना तुम्ही पहाल. तुम्ही केव्हा माझ्याकडे याल हे महत्त्वाचे नाही. तुमच्या वेळेनुसार या. मी सदैव तुमच्या प्रतिक्षेत असेन.” आपली प्रेमळ साई माता आपल्या सर्वांची प्रतिक्षा करते.

४२. ॐ श्री साई लोकरक्षापरायणाय नमः

लोक – विश्व, रक्षा – संरक्षण परायणाय – व्यस्त.

Loka – world, Rakshaa – protection, Paraayana – engaged in.

बँकॉकचे डॉ. आर्ट- आँग -जुमसाई एका रात्री त्यांच्या बँकॉकमधील कारखान्यात चोर कसे घुसले ती हकिकत सांगत होते. चोर घुसल्यानंतर स्वामींनी तेथील सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये प्रवेश केला. ज्या खोलीचे दार आतल्या बाजूने बंद होते व सुरक्षा रक्षकास उठवले, स्वामी त्याच्याशी थायी भाषेत बोलले आणि त्याला त्याचे काम करण्यासाठी सावध केले, दाराला आतून कडी असूनही हा मनुष्य आत कसा आला हे कोडे त्या सुरक्षा रक्षकाला उलगडले नाही. दुसऱ्या दिवशी त्या घटनेची पुनरावृत्ती झाली.

तिसऱ्या दिवशी, डॉ.आर्ट आँग तेथे आले व तो सुरक्षारक्षक त्यांना सर्व हकिकत सांगत असताना, त्याचे लक्ष त्यांच्या खोलीत लावलेल्या स्वामींच्या फोटोकडे गेले व तो म्हणाला हीच व्यक्ती माझ्या खोलीत आली व त्याने मला उठवले. अशा त-हेने स्वामींनी त्यांच्या भक्ताचा कारखाना वाचवला.

जे अंत:करणपूर्वक परमेश्वराचा धावा करतात त्यांच्या जीवांचे व मालमत्तेचे स्वामींनी रक्षण केले आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

कुमार कुर्ग येथील एका मोडकळीस आलेल्या घरामध्ये राहत होते. एका रात्री मुसळधार वादळी पाऊस सुरू होता. कुमारनी स्वामीच्या फोटोपुढे उदबत्ती लावली आणि काही भजने गाऊन ते झोपी गेले. अचानक त्यांना “कुमार धाव” असा आवाज ऐकू आला, त्यांनी ताबडतोब दार उघडले व ते अंधारात बाहेर पडले. रस्त्यावर आल्यावर त्यांनी एक मोठाआवाज ऐकला. त्यांनी वळून पाहिले तर त्यांची इमारत जमीनदोस्त झाली होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी सर्व उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले, अपवाद होता तो केवळ एका वस्तूचा काचेमध्ये फ्रेम केलेला बाबांचा फोटो!

४३. ॐ श्री साई लोकनाथाय नमः

अखिल विश्वाचे स्वामी असणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

लोक – विश्व, नाथ– स्वामी

एकदा स्वामींनी काही भक्तांना त्यांचा हाताचा तळवा दाखवला व त्यांना विचारले की, त्यामध्ये काय आहे. कोणी म्हणाले की त्यामध्ये काही नाही. त्यावर स्वामी शांतपणे म्हणाले, “ह्या रिक्त हातात सर्वकाही आहे.”

त्यांनी हाताची मूठ बंद केली आणि लगेचच उघडली, त्यामध्ये एक टोळ (नाकतोडा) ब एक पानही होते व तो टोळ ते पान खात होता. त्यांनी मूठ बंद केली आणि उघडली तेव्हा तेथे काहीही नव्हते.

या प्रसंगाद्वारे, विश्वाची निर्मिती, पोषण आणि संहार सर्व त्यांच्या नियंत्रणात असल्याचे उघड केले.

४४. ॐ श्री साई दीनजनपोषणाय नमः

दीनजनांचे आणि निराधारांचे पोषण करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

Dheena – poor, miserable, Jana – people, Poshana – nourish, sustain.

लहानपणीही मनुष्याचे दुःख पाहून सत्याचे हृदय गलबलून जाई. जेव्हा दारावर एखादा भिकारी येई तेव्हा सत्या खेळ थांबवून धावत आत जाई व आई-बहिणीशी गोड गोड बोलून त्या भिकाऱ्यास अन्न देण्यास सांगे. एवढेच नव्हे तर तो स्वत:च्या वाट्याचे अन्नही देत असे व स्वत: उपाशी राहत असे. तो म्हणे, “मी केवळ माझ्या वाट्याचे अन्न त्याला दिले. त्याची क्षुधा शांत झाल्यावर, मी ही तृप्त झालो आहे.”

सत्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसूनही तो स्वतःचे कपडेही गोरगरिबांना, गरजूना देऊन टाकत असे.

आज श्री सत्य साई सेवा संघटना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरिबांची, गरजूंची सेवा करत आहे. पुट्टपर्ती आणि सर्व जगामध्ये नियमितपणे नारायण सेवा केली जाते, त्याचबरोबर वैद्यकीय सेवा आणि शिक्षण मोफत दिले जाते.

४५. ॐ श्री साई मूर्तित्रय स्वरूपाय नमः

Salutations to Lord Sai who is the incarnation of the Holy Trinity: Brahma, Vishnu and Maheshwara.

मूर्ती – मूर्ती, त्रय – तीन, स्वरूप – स्वरूप

ब्रह्मा, विष्णु, महेश्वर हया त्रिमूर्तीचा अवतार असलेल्या साईंना आम्ही वंदन करतो.

ब्रह्मा (निर्माता), विष्णु (पालनकर्ता), आणि शिव (संहारकर्ता) ही तीन रूपे बाबांच्या वास्तविकतेचे प्रतिनिधित्व करतात. एकदा एका विद्यार्थ्याने, त्याच्या पोलरॉईड कॅमेराने बाबांचा फोटो काढला. त्यांनी जेव्हा त्या फिल्मवर पुढील प्रक्रिया केली तेव्हा तो फोटो पाहून तो विस्मयचकित झाला. कारण त्या फोटोमध्ये स्वामी नव्हते. परंतु, ब्रह्मा, विष्णु आणि शिव ह्या त्रिमूर्तीचे भगवान दत्तात्रयांचे रूप होते. स्वामीच अखिल विश्वाचे निर्माते, पालनकर्ते व संहारकतें असल्याचे त्यांनी उघड केले.

४६. ॐ श्री साई मुक्तीप्रदाय नमः

मुक्ती प्रदान करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

मुक्ती – मोक्ष, प्रदाय – देणारा .

आध्यात्मिक संदर्भात मुक्ती म्हणजे पुन्हा जन्म घेण्यातून मुक्तता – मानवी जीवनाचे अंतिम ध्येय.

स्वामी म्हणतात, “तुम्ही माझ्याकडे लहानसहान उपचार व लाभ यांच्यासाठी क्षुल्लक गोष्टींची मागणी करता. परंतु मी जे देण्यासाठी आलो आहे, ‘मुक्ती’ ती माझ्याकडून मिळावी अशी फार थोड्या जणांची इच्छा असते.” कर्णम् सुबम्मा, ही एक अत्यंत भाग्यशाली स्त्री होती. त्या या ध्येयाप्रत पोहचण्यात यशस्वी झाल्या, स्वामी लहान असताना त्या स्वामींची काळजी घेत. स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी त्या भोजन बनवत असत. त्या वयोवृद्ध झाल्यावर त्यांनी स्वामीकडे त्यांच्या एका इच्छेची परिपूर्ती करण्यासाठी प्रार्थना केली – त्यांच्या अखेरच्या क्षणी स्वामींनी त्यांना दर्शन द्यावे आणि त्यांच्या मुखामध्ये पवित्र गंगाजल घालावे. स्वामींनीही त्यांना तसे वचन दिले. काही काळानंतर त्या आजारी पडल्या व त्यातच त्यांचे देहावसान झाले त्यावेळी स्वामी तिरुपतीमध्ये होते. स्वामी त्यांचे वचन विसरले. असेच सर्वाना वाटते.

सुबम्मांच्या मृत्युनंतर काही तास लोटल्यावर स्वामी परत आले आणि मोठ्याने तिला हाका मारू लागले, “सुबम्मा सुबम्मा” त्यांच्या भोवती असणाऱ्या सर्वांनी आश्चर्यचकित होण्यासारखी घटना घडली. सुबम्मांनी डोळे उघडले. स्वामींनी हळुवारपणे बोटांनी त्यांच्या ओठांना स्पर्श केला आणि त्यांच्या बोटांमधून पावन गंगेचे शीतल जल त्यांच्या मुखात ओघवते झाले. त्यांनी गंगाजल प्राशन केले. त्यांच्या मुखावर आनंदाचे तेज विलसत होते आणि त्यांनी अखेरचे डोळे मिटले. मुक्त झालेल्यांचे स्थान त्यांनी प्राप्त केले.

४७. ॐ श्री साई कलुषविदुराय नमः

आपले दोष आणि कलंक दूर करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

कलुष – कमजोरी, दोष, विदुर – दूर.

स्वामी आध्यात्मिक साधकांचे कलंक आणि दोष दूर करतात.

जे भगवानांच्या दैवी व आल्हादक छायाछत्राखाली येतात त्या भक्तांच्या जीवनशैलीत अनेक बदल घडतात, ते बाबांची शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात आणि शांत, दयाळू व समंजस होतात. हे परिवर्तन म्हणजे अव्याहतपणे सुरू राहणारा चमत्कार आहे. जो भगवान बाबा हर क्षणी घडवतात.

४८. ॐ श्री साई करुणाकराय नमः

करुणाघन साईंना आम्ही वंदन करतो.

करुणा – दया, करा – करणारा.

एकदा भगवान श्री सत्य साई बाबा गाडीने बंगळुरहून पुट्टपर्तीला चालले होते. त्यांचा एक विद्यार्थी गाडी चालवत होता. रस्ता खडकाळ व खडबडीत होता. तो भूप्रदेश डोंगराळ होता. तो विद्यार्थी गाड़ी चालवत होता आणि अचानक एक नाग त्यांच्या गाडीसमोरून रस्ता ओलांडताना त्याने पाहिला. परंतु बाबांना झोप लागल्याचे पाहून त्यांच्या झोपेत व्यत्यय येऊ नये असा विचार करून त्याने ब्रेक मारण्याचे टाळले व तो तसाच पुढे जाऊ लागला. त्यामुळे नागावरून गाडी गेली.

प्रशांती निलयमला आल्यावर, तो विद्यार्थी गाडीतून खाली उतरला व त्वरेने स्वामींचे मागील दार उघडण्यासाठी धावला. स्वामी खाली उतरले आणि त्यांच्या निवासस्थानाकडे जाऊ लागले. स्वामींच्या कफनीच्या मागील बाजूस चिखलाचा मोठा डाग पडलेला पाहून त्या विद्यार्थ्याची जिज्ञासा जागृत झाली. तो म्हणाला, “स्वामी तुमची कफनी मागच्या बाजूस खराब झाली आहे.” स्वामी म्हणाले, “थोड्या वेळापूर्वी त्या बिचाऱ्या नागाला वाचवण्यासाठी मला गाडीच्या चाकाखाली जावे लागले!”

स्वामींचे प्रेम आणि करुणा केवळ मानवालाच नाही तर सर्व जीवांना सामावून घेते.

४९. ॐ श्री साई सर्वाधाराय नमः

सर्वांचा आधार असणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

सर्व – सर्व, आधार – आधार

ते सर्वांचे पोषणकतें आणि रक्षणकर्ते आहेत.

एकदा कोडाईमध्ये स्वामी मुलांबरोबर नाश्ता करण्यासाठी येणार होते. म्हणून हॉलमध्ये बसून मुले त्यांची प्रतिक्षा करत होते. अचानक स्वामी स्वयंपाकघरातून बाहेर आले, त्यांच्या हातात एक ग्लास व चमचा होता. ते म्हणाले, एका मुलाची तब्येत बरी नाही. त्याच्यासाठी मी ही खीर बनवली आहे. ती त्याला देण्यासाठी मी त्याच्या खोलीत जात आहे, मी तुमच्याकडे नंतर येतो, ते आपली लहान-मोठी प्रत्येक गरज ओळखून ती पूर्ण करतात.

५०. ॐ श्री साई सर्व- हृदयवासिने नमः

प्रत्येकाच्या हृदयात वास करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

हृदय – हृदय, वासि – निवास करणारा.

बाबा म्हणतात, “मी सर्वांमधील अंतस्थ सत्य आहे. म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करता याचाच अर्थ तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याला दुखावता तेव्हा तुम्ही मला दुखावता.”

गंटूर जिल्हयातील, पाली गावामध्ये एका नवीन मंदिरात बाबांनी शिर्डी साईबाबांच्या मूर्तीची स्थापना केली. तेथील ग्रामस्थांना ते म्हणाले, “तुमच्या गावात शिडौं साईची स्थापना झाली आहे. आता तुमच्या हृदयात, प्रेमाच्या वेदिकेवर त्यांची स्थापना करा कारण साई प्रेमस्वरूप आहेत. साई हे मंदिरवासी नाहीत ते केवळ तुमच्या हृदयात वास करतात.”

स्वामी म्हणतात, “संपूर्ण राज्यांमधील इंचन इंच जागा, जो राज्य करतो त्या राजाच्या मालकीची असतो. परंतु तो जेव्हा मागे टेकून बसण्याचा विचार करतो तेव्हा तो प्रथम जे स्थान दिसेल तेथे बसत नाही. बसतो का? तो एक असे स्थान निवडतो जे स्वच्छ आहे. जेथे काटेकुटे नाहीत, जे सपाट आणि मऊ, मृदु आहे. त्याचप्रमाणे सर्व हृदये त्याचीच आहेत. (सर्व हृदय वासिने) परंतु ज्यांची हृदये शुद्ध आहेत केवळ त्यांच्या हृदयातून तो स्वतःला प्रकट करतो.”

५१. श्री साई पुण्यफलप्रदाय नमः

पुण्यफल प्रदान करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

पुण्य – पुण्य, फल – फळ, प्रसाद – देणे.

प्रत्येक कर्मास त्याचा परिणाम असतो. आपल्या कुकर्माचा परिणाम वेदनादायी असतो तथापि आपल्या सत्कर्मा बद्दल परमेश्वर आपल्याला इनाम देतो.

प्रसिद्ध संत श्री रमण महर्षींचा शिष्य स्वामी अमृतानंद, अरुणाचलमधून भगवान श्री सत्यसाईबाबांच्या दर्शनासाठी पुट्टपर्तीला गेले होते. स्वामींनी त्यांना मुलाखत दिलौ. ८५ वर्षांच्या त्या वयोवृद्ध अमृतानंदांशी संभाषण करताना स्वामींनी त्यांना सांगितले. वयाच्या सातव्या वर्षी तू दररोज १००० वेळा पवित्र गणपती मंत्र उच्चारून अखंड ४५ दिवस गणपती होम केला होतास. धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की या साधनेच्या फलस्वरूपात महागणपतीचे दर्शन होते. या कारणामुळेच तू माझ्या सान्निध्यात आलास, आता तुला त्या होमाचा लाभ प्राप्त होईल. स्वामी अमृतानदांना स्वामीकडे पाहण्यास सांगितले गेले आणि त्यांनी तसे केल्यावर त्यांना भगवानांच्या जागी सोनेरी रंगातील तेजस्वी रूपात महागणपतीचे दर्शन घडले.

५२. ॐ श्री साई सर्वपापक्षयकराय नमः

सर्व पापांचा नाश करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

सर्व – सर्व, पाप – पातक, क्षय – नाश.

परमेश्वराची करुणा आपल्या कर्माच्या परिणामांचे उपशमन करू शकतो असे स्वामींनी सांगितले आहे.

ने म्हणतात, “पश्चात्ताप व भविष्यात त्या कर्मापासून दूर राहण्याचा निश्चय करून परमेश्वराकडे त्यासाठी आवश्यक असणारे मनोबल देण्याची प्रार्थना तुमच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेस सहाय्य करते.”

सुरुवातीच्या काळात पुट्टपर्तीतील एका स्त्रीने बाबांना इजा पोहचवण्यासाठी विष घातलेला वडा दिला होता, बाबांना त्यामध्ये विष घातल्याचे माहीत असूनही त्यांनी तो वडा खाल्ला, नंतर त्या विषाचा परिणाम काय होतो हे पाहण्यासाठी ती स्त्री बाबांच्या मागोमाग गेली. तिने जसा वडा त्यांना खाण्यासाठी दिला होता, तसा अख्खा वडा त्यांनी वांतीद्वारे बाहेर काढल्याचे तिने पाहिले, ते पाहून त्या स्त्रीला त्यांच्या दिव्यत्वाचा बोध झाला. तिने त्यांच्या पायावर लोळण घेतली आणि क्षमायाचना केली. करुणाघन स्वामींनी तिला क्षमा केली.

५३. ॐ श्री साई सर्वरोग निवारणे नमः

Salutations to Lord Sai who removes all the diseases.

सर्व – सर्व, रोग – व्याधी, illnesses, निवार – निवारण.

एका वकिलांना घशाचा कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया व त्याबरोबर रेडिएशन व केमोथेरपीचा सल्ला दिला. उपचार सुरू करण्यापूर्वी स्वामींची संमती घेण्यासाठी ते प्रशांती निलयमला आले.

ते तेथे गेल्यावर स्वामींनी त्यांना मुलाखत कक्षामध्ये बोलावले. मुलाखतीनंतर बाबांनी बऱ्याच प्रमाणात विभूती सृजित करून त्यांच्या हातामध्ये ओतली व अत्यंत प्रेमाने ती त्यांना खाऊन टाकण्यास सांगितले. मुलाखतीनंतर ते कॉफी पिण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेले. त्यांनी तेथे तयार असलेली भजी पाहून एक बशीभर भजी घेतली. ते आश्चर्यचकित झाले की भजी खाताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ज्या ठिकाणी घशात कॅन्सरग्रस्त भाग होता तो त्यांना जाणवत होता परंतु वेदना जाणवत नव्हत्या. स्वामीच्या कृपेने रोग निवारण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर ते सनातन सारथीचे सिंधी भाषेत भाषांतर करणारे भाषांतरकार बनने.

५४. ॐ श्री साई सर्वबाधाहराय नमः

सर्व दुःख दूर करणाऱ्या साईंना आम्ही वंदन करतो.

बाधा -दुःख,, हारा -दूर करणे.

रूथला आरोग्यविषयक समस्या होत्या. कधी कधी तिला अतीव वेदना होत असत. ती अमेरिकेत साई भजनास जात असे. एका संध्याकाळी तिला भयंकर वेदना होऊ लागल्या. दुःखातिरेकाने ती आक्रोश करू लागली, “मला कोणी सहाय्य करणारे आहे का? मला असे दुःख का भोगावे लागत आहे? मी काय करू? कृपा करून मला मदत करा!’ अचानक तिला तिच्या खांद्यावर एका कोमल स्पर्शाची जाणीव झाली. तिने वळून पाहिले तेव्हा तिच्या पलंगाच्या बाजूस तिला बाबा दिसले. ते म्हणाले, अशी ओरडू नकोस. मी येथे सदैव तुझ्याबरोबर आहे.” त्यानंतर ते जसे अचानक दिसले तसेच अचानक अदृश्य झाले व त्याचबरोबर तिच्या वेदनाही नाहीशा झाल्या.

स्वामी म्हणतात, “परमेश्वर केवळ एकच आहे व तो सर्वव्यापी, सर्वसाक्षी आहे. त्याला हाक मारा तो प्रतिसाद देतो, प्रकट होतो, आशीर्वाद देतो.”

(स्त्रोत: श्री सत्य साई बाल विकास भाग-२-श्री सत्य साई बुक्स अँड पब्लिकेशन्स ट्रस्ट, महाराष्ट्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *