ॐ नमो भगवते – पुढील वाचन
ॐ नमो भगवते – पुढील वाचन
विचार, शब्द आणि कृतिचे सामर्थ्य – ध्रुवाची गोष्ट-सत्यसाई संदेश
महाभागवतामधील ध्रुवबाळाचे चरित्र आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. जगाचे सांसारिक ज्ञान नसलेलं ते एक पाच वर्षाचं लहान मूल आहे. केवळ त्याच्या मातेने त्याच्या मनांत रुजवलेल्या आणि त्याचे गुरु ,महर्षी नारदांनी दृढ़ केलेल्या श्रध्देच्या बळावर तो अरण्यात गेला आणि देवाच्या प्राप्तिसाठी त्याने अतिशय कठोर तपश्चर्या केली.
आपण आपल्या वडिलधार्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे. ब्रह्मज्ञानी महर्षी नारदांबद्द्ल असलेल्या श्रद्धेच्या परिणामस्वरूप बाल ध्रुवाला ईश्वराचे दर्शन घडले. पण तो लहान बालक आहे. भगवान विष्णुंनी प्रकट होऊन जेव्हां ध्रुवाला विचारले की ‘तुला काय हवंय?’ तेव्हां तो म्हणाला, “हे भगवंता, मी कुठं आहे हे तुम्ही ओळखलंत आणि या निबिड अरण्यात आलात. तेव्हा मला काय हवंय, हे तुम्हाला माहीत नाही का?”
ईश्वर काही अडाणी नसतो. तो शहाण्यांमध्येही श्रेष्ठ ज्ञानी असतो. भगवंत म्हणाले, ‘तू कुठे आहेस आणि तुझी काय इच्छा आहे हे मला ज्ञात आहे. पण माझीही काही विशिष्ट पध्दत आहे. मानवतेचा अभ्यास करतांना मनुष्य जातिचा अभ्यास करायला पाहिजे. माणसाचे विचार ,शब्द आणि कृति एकमेकांना पूरक हवेत. त्यांत एकसूत्रीपणा हवा. तरंच मी त्याची इच्छा पूर्ण करु शकतो.
तू घरी असतांना म्हणालास की मी देवाची प्रार्थना करेन आणि माझ्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मला मिळावा असा आशिर्वाद ,वर मागेन. त्यानुसार तू तपश्चर्या केलीस.
परंतु तुझ्या पहिल्या विचारनुसार आता तू मागितलं नाहीस. त्यामुळे तुला खरी कशाची आकांक्षा आहे , हे नक्की करण्यासाठी मला तुझी परीक्षा घ्यावी लागेल.
ध्रुव बाळ म्हणाला, “हे भगवंता ! माझी मूळची इच्छा म्हणजे जणु क्षुल्लक काचेचा तुकडा मागणं होतं. पण तुमचं दर्शन हिऱ्याप्रमाणे तेजस्वी आहे. हे माझं महत -भाग्यच की काचेचा तुकडा शोधत असतांना मला हिरा गंवसला. म्हणून मला आतां काचेचा तुकड़ा नको.”
भगवंत म्हणाले ,”तुझा विचार, उच्चार आणि आचार यापैकी दोन गोष्टी एका बाजूला आहेत, पण आतां तू वेगळंच मागत आहेस. (शब्द वेगळे आहेत) तीन पैकी निदान दोन गोष्टी समान आहे. (बहुमत आहे) म्हणून मी तुला असा वर देतो की, “जा आणि राज्य कर.”
प्रत्येक गोष्टींसाठी परमेश्वर आचार, विचार आणि उच्चारातील एकवाक्यता पहात असतो, पडताळत असतो. ती नसेल तर ते त्याला आवडत नाही. एवढी कठोर तपश्चर्या केल्यानंतर आणि साक्षात भगवान विष्णूंनी दर्शन दिल्यावर ही, ध्रुवाला मोक्ष मिळाला नाही. याच एकच कारण म्हणजे त्याच्या आचार , विचारापेक्षा त्याचे शब्द वेगळे होते. (विसंगत होते) म्हणून आपल्या वाणीचा अतिशय काळजी पूर्वक उपयोग केला पाहिजे.