दिव्यत्वाचे प्रकटीकरण

Print Friendly, PDF & Email
दिव्यत्वाचे प्रकटीकरण

८ मार्च १९४० रोजी सत्याला एका मोठ्या काळ्या विंचूने दंश केला हे ऐकून उरवकोंडाच्या लोकांना धक्काच बसला. विंचू किंवा सर्प जरी सापडला नाही तरी सत्या बेशुद्ध पडला होता व त्याचे शरीर कडक झाले होते. शेषमराजु सत्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना घेऊन आले. सत्या १/२ दिवसांत स्वतःहुन शुद्धीवर आला. परंतु त्यानंतरची त्याची वर्तणूक वेगळीच वाटत होती. शेषमांनी ताबडतोब त्यांच्या मातापित्यांना निरोप पाठवला व पुट्टपर्तीहुन तेथे येण्यास सांगितले.

आज, जर स्वामी असे निचेष्ट पडले तर आपल्याला माहित आहे की केवळ दुसरीकडे असणाऱ्या भक्ताच्या सहाय्यासाठी स्वामींनी त्यांचा देह सोडला असणार. आपल्याला हे ही माहित आहे की एखाद्या भक्ताचे अधुरे कार्य त्याच्याकडून पुरे करून घेण्याच्या हेतूने त्याला जीवदान देण्यासाठी स्वामी त्या भक्ताचा आजार स्वतःवर घेतात.

परंतु त्यावेळी सत्याभोवती असणाऱ्या लोकांना हे माहित नव्हते. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर ते भयभीत होत असत. एक आठवड्याने त्यांचे पालक तेथे पोहोचले. (त्यावेळी संपर्काची गती अत्यंत धीमी होती). त्यांनी जे ऐकले व पाहिले, त्याने ते गोंधळात पडले. कधी कधी सत्या एकदम शांत आणि गप्प गप्प असे तथापि मधूनच एकदम, गीते वा कविता म्हणे, संस्कृतमधील दीर्घ श्लोक म्हणे तर कधी धर्मग्रंथांमधील तत्त्वज्ञान विशद करून सांगे.

एक दिवस पहुडलेल्या सत्याने एकदम म्हटले,” बाजूच्या घरातील व्यक्ती संस्कृतच्या पाठ्य पुस्तकाचे चुकीचे वाचन करीत आहे. तो चुकीच्या पद्धतीने ते स्पष्ट करून सांगत आहे. जा, त्याला इकडे घेऊन या.” त्याने आज्ञा केली. एका लहान मुलाकडून आलेली सूचना ऐकून त्या वाचकास खूप राग आला व प्रतिटोला देत तो म्हणाला, “त्याचा अर्थ बरोबर आहे का चूक आहे हे तो कसं काय सांगू शकतो? त्याला ऐकु तरी कसे आले? त्याला सांगा त्यांने स्वतःच्या गोष्टीत लक्ष घालावे इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये”.

परंतु सत्याने अखेरपर्यंत आपला हेका चालूच ठेवला. सत्याच्या पालकांखातर तो वाचक आला. त्या वाचकानी येऊन त्या मुलास विनयशीलतेचा धडा शिकवावा अशी सत्याच्या पालकांनी त्या वाचकास विनवणी केली. जेव्हा तो विद्वान मनुष्य तेथे आला तेव्हा सत्याने त्याला तो आगोदर वाचत असलेला मजकूर पुन्हा वाचण्यास सांगितले. त्याने त्या वाचकाच्या चुका दाखवून दिल्या आणि नंतर ह्या महाकाव्यावरील प्रश्नमालिका विचारली. त्याने तो विद्वान भारावून गेला व त्याने सत्याच्या पायावर लोळण घेतली व त्यांनी बोलावल्यानंतर त्वरीत नआल्याबद्दल क्षमा मागितली.

सत्याला जिल्ल्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यास दाखवण्यात आले, परंतु काही उपयोग झाला नाही. सत्याने गीतांचे गायन केले. परमेश्वराविषयी बोलला. जेथे कोणीही भेट दिली नाही अशा तीर्थक्षेत्रांचे त्याने वर्णन केले. समग्र जीवन एक नाट्य असल्याचे त्याने घोषित केले. असेच सुरु होते. “तुम्ही काळजी का करता? काही करण्याची गरज नाही.” असा सत्याने सौम्य शब्दात निर्वाळा दिला तरी त्याच्या खचून गेलेल्या पालकांनी सत्याला त्यांच्याबरोबर पुट्टपर्तीस नेले.

अज्ञानामुळे गावकऱ्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की त्याला एखादा आजार वा त्याला बाहेरची(भूत पिशाच्याची) बाधा आली असावी. कोणीतरी त्यांच्या चिंतीत पालकांना ब्राह्मणपल्ली गावातील एका शक्तीशाली मांत्रिकाकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तो मांत्रिक सत्याला लवकरच बरे करेल असे त्यांनी सांगितले. सत्याला त्या मांत्रिकाकडे नेले. त्या मांत्रिकाने सत्यावर काही उपाय केले. त्याने एका धारदार वस्तऱ्याने सत्याचे डोके भादरले व त्यावर क्रुसाची खूण काढली. व त्याने त्या जखमेवर लिंबू, लसूण व इतर फळांचा रस ओतला. सत्या हे सर्व शांतपणे सहन करत असल्याचे पाहून पालकांना आश्चर्य वाटले. त्याच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंबही बाहेर पडला नाही. वा त्याने माघारही घेतली नाही. सर्व उपाय निष्फळ ठरल्याने चिडून त्या मांत्रिकाने सत्याच्या डोळ्यांमध्ये एक घातक मिश्रण घातले. सत्याच्या डोळ्यांची भयानक आग आग होऊ लागली. त्याचा चेहरा ओळखू न येण्याइतका सुजला त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते. व त्याचा देह थरथरत होता. हे पाहून त्याचे पालक व मोठी बहिण ह्यांना दुःख अनावर झाले परंतु सत्या मात्र शां होता.

त्याने त्यांना त्या खोलीतून बाहेर जाऊन त्याची प्रतीक्षा करण्याची खूण केली. सत्याही त्या मांत्रिकाचा डोळा चुकवून तेथून निसटला. व त्याने त्याला माहित असलेली एक विशिष्ट रामबाण औषध घेऊन येण्यास पालकांना सांगितले. पालकांनी ते ओषध आणून सत्याच्या डोळ्यात घातले. त्याच्या चेहऱ्याची सूझ ओसरली. त्यांनाही हायसे वाटले.

ह्या सर्व यातना, त्रास सहन करताना सत्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. सत्या नेहमीच देहभावाच्या पलीकडे असल्याने वेदना जाणवत नव्हत्या. त्याने नंतर पालकांना विचारले,” मी साईबाबा आहे ह्याची तुम्हाला खात्री पटली नाही का? माझ्या दिव्यत्वाचा तुम्हाला बोध व्हावा ह्यासाठी मीच हे सर्व घडवून आणले. जर मी एखाद्या शुभदिनी हे घोषित केले असते तर त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली असती? दुःख,वेदना आणि आनंद मला कधीही स्पर्श करू शकत नाही. ह्या सर्व दुःखमय प्रसंगाने, पालकांची खात्री पाटली . त्या मांत्रिकास भरपूर पैसे देऊन दुसऱ्या दिवशी ते सत्याला पुट्टपर्तीला घरी घेऊन गेले.

वेंकप्पा राजूंचा एक वकील मित्र त्यांच्या घरी आला व ह्या घडलेल्या घटनेवर विचार विनिमय करून त्यांना म्हणाला, “ही बाब गंभीर आहे. सत्याला ताबडतोब नरसिंह मंदिरात घेऊन जा. -हा शेवटचा उपाय आहे. ते ऐकून सत्या त्यांना म्हणाला,” गम्मत आहे नाही का? मी अगोदरच त्या मंदिरात आहे आणि तुम्ही मला तिकडे घेऊन जा म्हणताय !” तो वकील मित्र गुपचुप तेथून गेला. २३ मे १९४०. रोजी,१४ वर्षाच्या सत्याने घरातील सर्व सदस्यांना एकत्र बोलावले व केवळ हस्त संचालनाने खडीसाखर व फुले सृजित करून त्यांना दिली. ते पाहुन शेजारी पाजारीही धावत आले. त्याने पुन्हा हस्तसंचलन करून सर्वांना दुधभाताचे गोळे, खडीसाखर व फुले दिली. सत्या इतका आनंदी दिसत होता की कोणीतरी श्री वेंकप्पा राजूंना तेथे येऊन सत्यामधील बदल पाहावा असा निरोप दिला. श्री वेंकप्पा राजू गर्दीमधून वाट काढत आले. ‘वरददायकांस’ भेटण्या आगोदर त्यांनी हात, पाय,तोंड धुवावे असे लोकांनी सांगितले. त्यांना ह्याचा खूप राग आला, व ते अधिकच संभ्रमित झाले. त्या रागाच्या आणि संभ्रमाच्या भरात त्यांनी एक काडी उचलली व सत्याला दरडावून विचारले, “तू देव आहेस का भूतपिशाच्च आहेस का वेडा आहेस? सांग मला!” सत्या त्वरित उत्तरला, “मी साई बाबा आहे” ते ऐकून वडिलांची मती गुंग झाली व त्यांच्या हातातून काठी गळून पडली. सत्या पुढे म्हणाला,” माझे आपस्तंब सूत्र आहे व मी भारद्वाज गोत्रातील आहे. (हेच शब्द शिर्डी बाबांनीही उच्चारले होते). मी सर्व दुःख दूर करण्यासाठी आलो आहे. तुमची मने आणि निवास स्थाने स्वच्छ ठेवा.”

त्याचे बंधू शेषमानी त्याच्या जवळ जाऊन विचारले,” साई बाबा म्हणजे तुला काय म्हणायचे आहे?” सत्या सहजतेने म्हणाला,” तुमच्या कुटुंबामध्ये मी जन्म घ्यावा अशी तुमच्या वेंकवधूतांनी प्रार्थना केली म्हणून मी आलो.” आम्ही तुझ्यासाठी काय करावे? “असे वडिलांनी विचारल्यावर सत्याने त्वरित उत्तर दिले,” दर गुरुवारी माझे पूजन करा.” साई बाबा ह्या शब्दाचा अर्थ दिव्य मातापिता असा आहे. ‘माता’ निःस्वार्थ प्रेमाचे व ‘पिता’ ज्ञान व शिस्त ह्यांचे प्रतीक आहे. परमेश्वर प्रेम आणि कायदा ह्या दोन्ही गोष्टींदवारे विश्वाचे नियमन करतो.

नंतर गुरुवारी कोणीतरी सत्याला आव्हान दिले, ‘जर तू साईबाबा आहेस तर आम्हाला तसा पुरावा दे. “हो देतो. ती जुईची फुले माझ्या हातात द्या.” सत्याने आज्ञा केली. सत्याने ती फुले जमिनीवर टाकत म्हटले,” पाहा!” त्या फुलांनी आपोआप तेलगु अक्षरांमध्ये “साई बाबा” असा आकार धारण केला. येथे एका गोष्टीचा उल्लेख उचित ठरेल की बाबांनी शिर्डीमध्ये देहत्याग केला तेव्हा त्यांनी दासगणुंना त्यांचा देह फुलांनी आच्छादित करण्यास सांगितला. ही त्यांची अखेरची इच्छा होती. आणि पुट्टपर्तीमध्ये दिव्यत्वाची घोषणा केल्यानंतर, त्यांच्या हातात फुले द्यावीत ही त्यांची पहिली इच्छा होती.

शेषमांना अजूनही सत्याच्या दिव्यत्वाची ओळख पटत नव्हती. सत्याला पुन्हा हायस्कूलमध्ये पाठवण्याचे त्यांनी योजले व ते त्याला पुन्हा उरवकोंडयाला घेऊन गेले. जेथे ते जाण्या आगोदरच सत्याची कीर्ति पसरली होती. उरवकोंडयामध्ये गुरुवारास खूप महत्त्व आहे. बाबांनी शिरडीसाईंचे चित्र सृजित करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचबरोबर त्यांनी साई बाबांनी वापरलेल्या कफनीचे भगव्या रंगाचे काही तुकडे, शिर्डी मंदिरात समर्पित केलेली फुले, खजूर व उदी ह्या गोष्टीही सृजित केल्या.

हॉस्पेटमधील काही नामवंत व्यक्तींनी सत्याला त्यांच्या गावी येण्यास निमंत्रण दिले. शेषमांनी जाण्याचे व त्याचबरोबर, तेथून काही मैलांवर असलेली प्राचीन विजयनगर राज्याची राजधानी भग्न हम्पी येथे भेट देऊन येण्याचे ठरवले. दूरवरचा प्रवास व सहल हा सत्यासाठी चांगला बदल होऊ शकेल असे त्यांना वाटले! त्या सहलीसाठी दसऱ्याची सुट्टीही होती.

सर्वजण त्या भग्न झालेल्या हम्पीमध्ये पोहोचले व तेथे विरुपाक्ष मंदिरास भेट हा प्रमुख उद्देश होता. जेव्हा सर्व गट मंदिरामध्ये गेला तेव्हा सत्या बाहेरच थांबला. त्याला मंदिराची उंची, भव्यता, मंदिराचे प्रवेशद्वार इ. गोष्टी पाहण्यात जास्त रस होता. थोड्या वेळाने मंदिराच्या पुजाऱ्याने लिंगासमोर (लिंग हे, निर्गुणातून रूप साकारणे वा सगुण रूप निर्गुणात विलीन होणे ह्याचे प्रतिक आहे.) कापूर प्रज्वलीत करून ओवाळला. त्या ज्योतीने मंदिर प्रकाशमान झाल्यावर सर्वजण विस्मयचकीत झाले. त्यांनी त्या लिंगाच्या जागी सत्याला उभे असलेले पाहिले. तो सुहासी वदनांने भक्तीचा स्वीकार करत होता. शेषमांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. सत्याला पाहण्यासाठी, ते धावत बाहर गेले. सत्या भिंतीला टेकून दूरवर आकाशामध्ये पाहत होता!

त्या दिवशी गुरुवार नसूनही त्या गटातील सदस्यांनी सत्याचे विशेष पूजन केले. सत्या दिव्यत्वाचे प्रकटन आहे ही त्यांची श्रध्दा अधिक बळकट झाली. दुसऱ्या दिवशी सर्वजण हॉस्पेटला पोहोचले. हम्पी येथे घडलेल्या चमत्काराची बातमी गावामध्ये आगोदरच पसरली होती. तो गुरुवारचा दिवस होता, सत्याचे दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी एका रुग्णास केवळ स्पर्श करून त्याचे जुनाट टि.बी. चे दुखणे बरे केले व भक्तांसाठी विविध वस्तु सृजित केल्या. लोकांच्या आनंदास पारावार राहिला नाही. ते रात्री उशिरापर्यंत भजने गात होते. दुसऱ्या दिवशी सर्वजण उरवकोंडयास परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *