Significance of नवरात्री-mr
नवरात्री
नवरात्री, नऊ रात्रींचा हा उत्सव दरवर्षी आश्विन (सप्टेंबर-ऑक्टोबर) महिन्यात साजरा केला जातो. ह्या उत्सवामध्ये परमेश्वराच्या मातृरूपाची उपासना केली जाते.
देवी शक्तीस्वरूपिणी आहे. काली, लक्ष्मी, सरस्वती, चंडिका, दुर्गा,भवानी, अंबिका अशा विविध नावांनी ती ओळखली जाते. दुष्टांचा विनाश हे तिचे प्रमुख कार्य आहे. तिच्या चतुर्भुजा, अष्टभुजा वा दशभुजांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आयुधे असतात. तिच्या हातांची संख्या तिच्या शक्तीचे प्रतीक आहे. ती सिंहावर आरूढ झालेली आहे हे तिच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. शौर्य आणि पराक्रम दुर्गादवीचे मूलतत्त्व आहे. महिषासुराचा वध केल्याने दुर्गा महिषा सूरमर्दिनी या नावानेही ओळखली जाते. ‘महिष’ या शब्दाचा अर्थ – रेडा. हा शब्द आळस,जडत्व, स्तुती यांचे प्रतीक आहे. हे दुर्गुण व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि संसारिक प्रगतीत अडथळा आणतात. म्हणून त्यांचा नाश करणे गरजेचे आहे.
देवीच्या विविध रूपांची उपासना
हे नऊ दिवस त्रिमूर्तींच्या नारी रूपातील दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ह्या देव्यांची भक्ती करण्यासाठी समर्पित केलेले असतात.
दुर्गा आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते. लक्ष्मी आपल्याला धनसंपदा, वैभव, समृद्धी आणि केवळ धन नव्हे तर बौद्धिक संपदा,चारित्र्य आणि स्वास्थ्य संपदाही बहाल करते. आणि सरस्वती आपल्याला बुद्धिमत्ता, जिज्ञासूवृत्ती आणि सद्सदविवेकबुद्धी देते.
पूजाविधी आणि उत्सव
ह्या नऊ दिवसांमध्ये, देवीमातेची नामे आणि तिचे माहात्म्य वर्णन करणाऱ्या ‘दुर्गा सप्तशती’, ‘देवी माहात्म्य’ आणि ‘ललिता सहस्त्रनाम’ ह्या पवित्र ग्रंथांचे (पोथ्यांचे) वाचन केले जाते. तिचे प्रत्येक नाम दिव्यत्वाच्या विशिष्ट गुणाचा संदर्भ देते.
नवरात्री उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने भारतभर साजरा केला जातो. मंदिरामध्ये वा अन्य ठिकाणी अत्यंत कौशल्याने बनवलेल्या आणि सुंदर सुशोभित केलेल्या दुर्गेच्या मोठमोठ्या आकाराच्या आणि महिषासुराचा वध दर्शवणाऱ्या मातीच्या मूर्तींची स्थापना केली जाते.
एखाद्या पवित्र स्थानी, पहिल्या रात्री घटस्थापना केली जाते. अखंड तेवणारा दीप एका पात्रामध्ये ठेवला जातो. ते पात्र विश्वाचे प्रतीक आहे. अखंड तेवणारा दीप हे माध्यम आहे. ज्याद्वारे आपण तेजोमय आदिशक्तीची, श्री दुर्गादेवीची आराधना करतो.
देवीच्या प्रतिमेसमोर वेदमंत्रांच्या उच्चारणात पाण्याने भरलेला कलश ठेवतात. त्या कलशाच्या बाजूस थोडीशी माती पसरून त्यात धान्य पेरले जाते. नऊ दिवसामध्ये त्या धान्याला फुटलेले अंकुर हे समृद्धीचे प्रतीक आहे. काही भागांमध्ये लोकं दिवसातून एकदाच जेवण घेतात.
नवरात्रीचा ८ वा दिवस म्हणजे महाअष्टमी, त्यादिवशी कुमारीकांचे पूजन केले जाते. कुमारीका म्हणजे दिव्य मातेचे प्रगटीकरण, ह्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाते. काही ठिकाणी, कुमारीका पूजन नवव्या दिवशी म्हणजे नवमीला केले जाते.
भारतातल्या अनेक भागात नवमीला आयुध पूजा केली जाते. असे मानले जाते की महिषासुर आणि इतर राक्षसांचा वध केल्यानंतर, दुर्गामातेस शस्त्रांची गरज उरली नाही. म्हणून शस्त्रे बाजूला ठेवून त्यांचे पूजन केले. म्हणून त्या धर्तीवर लोकं त्यांच्या व्यवसायातील अवजारे, हत्यारे, साधने ह्यांची पूजा करतात.
दशमीला, साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला जातो. मूर्तींची भव्य मिरवणूक काढली जाते आणि जवळपास असलेल्या नदीमध्ये, जलाशयांमध्ये वा समुद्रमध्ये विधीपूर्वक विसर्जन केले जाते. साकार निराकारात लय पावते.
दक्षिण भारतात लोक पायऱ्या बनवून त्यावर मूर्ती ठेवतात, बहुतांश मूर्ती देवदेवतांच्या असतात. ह्यास ‘गोलू’ असे म्हटले जाते.
गुजरातमध्ये, ह्या दिवसांमध्ये प्रार्थना आणि उपवास करतात. संध्याकाळी गाणी आणि नृत्य केली जातात. ते गरबा नृत्य करतात. नृत्याचा तो एक अत्यंत आकर्षक प्रकार आहे. ज्यामध्ये स्त्रिया, कशीदाकाम केलेला, घागरा, चोळी आणि दुपट्टा हा सुंदर वेश परिधान करतात आणि एका पात्रातील दिव्याभोवती गोल करून नृत्य करतात. दांडीयांचे (टिपऱ्यांचे) नृत्यही अत्यंत लोकप्रिय आहे.
उत्तर भारतातील काही भागात रामलीला सादर करून नवरात्री सादर केली जाते. नवरात्री दरम्याने रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित नाट्याचे सादरीकरण केले जाते. अखेरच्या दिवशी म्हणजे विजया दशमीच्या दिवशी प्रभु रामांचा रावणावर विजय म्हणजेच चांगल्याचा वाईटावर विजय. यांचे प्रतीक म्हणून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे दहन केले जातात