गुरुपौर्णिमा
गुरु पौर्णिमा उत्सव, सर्वश्रेष्ठ पावन सद्गुरू वेदव्यास यांना भावपूर्ण वंदन करण्यासाठी साजरा केला जातो. मानव जातीच्या फायद्यासाठी, गुरु व्यासांनी, आज उपलब्ध असलेल्या क्रमाने वेदांची रचना केली. वेद ही शाश्वत सत्ये आहेत, परमेश्वरी इच्छेचा पाठिंबा मिळालेल्या विश्वनिर्मितीच्या शक्तीने ते युक्त आहेत आणि ही सत्ये सर्व ज्ञानाचा आणि धर्माचा आधार आहेत, हे योग्यच आहे.
द्वापारयुगाच्या शेवटी ही सत्ये वेगाने नाहीशी होवू लागली आणि सामान्यत: माणसांना त्यांचे विस्मरण झाले. या काळात कोणत्याही तऱ्हेची व्यवस्था नव्हती की पद्धती नव्हती. या सत्याचे वर्गीकरण करून कोणत्याही विद्वानाला अथवा धर्मज्ञाला ती उपयोगी पडतील अशी त्यांची रचना करण्यासाठी महात्म्याचीच आवश्यकता होती. व्यासांनी ते केले. या महान् कार्यामुळेच त्यांना वेदव्यास म्हणतात. ते पराशरपुत्र होते व थोर ग्रंथकार असलेल्या महर्षी वशिष्ठांचे प्रपौत्र होते (पणतू होते) ते मोठे भक्त व मानवजातीचे उपकारकर्ते होते. ते महान् आचार्यही होते. त्यांचा वर्ण काळा होता, म्हणून ते ‘कृष्ण’ म्हणून ज्ञात होते, तर त्यांचा जन्म दीपामध्ये (बेटामध्ये) झाला, म्हणून त्यांना ‘द्वैपायन’ म्हणत असत.
एकूण चार वेद आहेत– ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. महात्मा व्यासांनी ब्रह्मसूत्रे, महाभारत हे महाकाव्य, श्रीमद् भागवत आणि भगवद्गीता यांची रचना केली.
गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. तो अत्यंत पवित्र दिवस आहे. प्रार्थना आणि पश्चातापाची भावना यांनी तो साजरा केला पाहिजे. कारण त्यामुळेच हृदयशुद्धी होऊ शकते. मेजवान्या वा उपवासाने नव्हे; कारण त्यांचा तर उलट शरीरावर अनिष्ट परिणाम होत असतो. गुरुपौर्णिमा हा पूर्णचंद्राचा दिवस असतो, कारण याच दिवशी चंद्र पूर्णपणे व कोणत्याही बाधेशिवाय प्रकाशतो. तो तेजस्वी, शीतल व संपूर्ण असतो. माणसाच्या मनाची तुलना चंद्राशी केली आहे. चंद्र जसा तेजस्वीपणा व काळोख यांच्यामध्ये हिंदोळत असतो, तसेच मनही स्वच्छंदी व चंचल असते. तेही तेजस्विते कडून काळोख व पुन्हा तेजस्विता यांच्यामध्ये हिंदोळत असते. पौर्णिमेला चंद्राप्रमाणे मनही तेजस्वी, प्रकाशमय व शांत असले पाहिजे.
महर्षी व्यासांनी अज्ञानाचा अंध:कार, स्वार्थाचा क्षूद्रपणा आणि भेदबुद्धीचा भ्याडपणा माणसाच्या मनातून घालविण्यासाठी महाभारत हे महाकाव्य रचले. यासाठी केवळ मनातून त्यांना ‘लोक– गुरु’ असेही म्हणतात. ते दिव्या तेजस्वरूप आहेत. महर्षी व्यासांनी वाट दाखविली आहे. वाटचाल मात्र आपणच करावयाची आहे. आपल्याला चित्तशुद्धीचामंत्र त्यांनी दिला आहे. तो आपल्या दैनंदिन जीवनात आपण आचरणात आणावयाचा आहे व शांती, संतोष व भगवत्कृपा संपादन करावयाची आहे.