जन्म व आरंभीचे बालपण
काही काळ गेला आणि ईश्वराम्मा जी स्वामींनी निवडलेली माता तिला आपल्याला अजून एक पुत्र व्हावा अशी इच्छा झाली. त्यासाठी तिने प्रार्थना केली आणि भगवान सत्यनारायणाच्या पूजेचे व्रत अंगिकारले. लवकरच हे स्पष्ट झाले की ती पुन्हा माता होणार आहे.
आजोबा व त्यांच्या दोन मुलांना महाकाव्ये व पुराणातील कथा यावर गावात होणाऱ्या संगीतनाटकांमध्ये खूप रस होता. त्यामुळे त्यांच्या घरी या नाटकाच्या तालमी चालत आणि म्हणून एक मोठा तंबोरा भिंतीवरील खिळ्याला टांगून ठेवला होता आणि त्याच्या खाली जमिनीवर मृदुंग ठेवला होता एरवी ही वाद्ये शांत असत परंतु ज्या पुत्राच्या प्राप्तीची इच्छा त्या कुटुंबाने बाळगली होती त्या पुत्राच्या जन्माची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसे तंबोऱ्याच्या मधुर नाद आणि मृदुंगाचे बोल या ध्वनींनी मध्यरात्री अथवा पहाटे ते कुटुंब जागे होऊ लागले, जणु काही कोणत्या तरी कुशल हातांनी ती वाद्ये वाजविली जात होती.
अशा घडणाऱ्या गूढ घटनांचा अर्थ काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी श्री पेद्द वेंकप्पा राजू बुक्कपट्टणं येथील एका विद्वान शास्त्रींना भेटले. शास्त्रीबुवांनी त्यांना सांगितले की ही शुभ घटना असून समता, सुव्यवस्था, आनंद आणि आध्यात्मिक उन्नती हे प्रदान करणाऱ्या कल्याणकारी शक्तीचे अस्तित्व यातून दर्शविले जात आहे.
आणि – २३ नोव्हेंबर १९२६ रोजी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस पुत्ररत्नाचा, आपल्या बाबांचा जन्म झाला. त्या दिवशी सकाळी ईश्वराम्मा सत्यनारायणाची पूजा करत असताना तिला जाणवले की बाळाच्या जन्माची वेळ झाली आहे आणि म्हणून पुजाऱ्यांच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेसाठी गेलेल्या तिच्या सासूबाईंना लक्षम्मांना ताबडतोब निरोप धाडण्यात आला. ही वृद्ध स्त्री इतकी शिस्तबद्ध आणि खंबीर होती आणि सत्यनारायणाच्या कृपेवर तिचा इतका विश्वास होता की चालू असलेल्या पूजेतून मधूनच उठून जाण्यास तिने नकार दिला. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर काही फुले आणि मूर्ती प्रक्षालनाचे पवित्र तीर्थ बरोबर घेऊनच ती घरी परतली.
ईश्वराम्माने ती फुले आपल्या केसात माळली आणि पवित्र तीर्थ प्राशन केले. काही क्षणातच बाळाचा जन्म झाला. शिवपूजनाचा पवित्र कार्तिक महिन्यातील तो सोमवार होता आणि शिवाचे स्मरण करून गावकरी शिवनामाचा जयघोष करत होते. तो दिवस अजूनच शुभ होता कारण त्या दिवशीचे नक्षत्र आर्द्रा होते. असे क्वचित प्रसंगी होते जेव्हा महिना, दिवस आणि नक्षत्र जुळून येते आणि त्या दिवशी मंदिरामध्ये खास पूजा होते. ते वर्ष होते अक्षय “कधीही ऱ्हास न होणारे – सदैव पूर्ण”. ते छोटे बाळ अतिशय सुंदर होते अगदी वर्णन करण्याच्या पलीकडचे! शास्त्रांमध्ये जसे सांगितले आहे की अवतारांकडे सर्व आध्यात्मिक शक्ती असतात, त्या सर्व आध्यात्मिक शक्तींसह त्या बाळाने जन्म घेतला होता. त्या चमत्कारिक शक्ती, ज्या त्यांच्या दिव्य संकल्पातून प्रकट झाल्या.
खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये एका चटईवर बाळाचे अंथरूण ठेवले होते. बाळाच्या आजीने बाळाला त्यावर ठेवले. अचानक एका स्त्रीच्या लक्षात आले की बाळ हळुवारपणे वर खाली होत आहे. त्याच्या अंगावरील अंथरूण वर होत होते आणि एका बाजूला पडत होते. श्वास रोखून काही क्षण त्यांनी पाहिले आणि ताबडतोब बाळाला तेथून उचलले. बाळाच्या अंथरुणाखाली वेटोळे घालून बसलेला नाग त्यांनी पहिला आणि त्या आश्चर्याने थक्क झाल्या आदिशेषाची भूमिका बजावणाऱ्या त्या नागाने भगवान विष्णुंच्या त्या नवजात अवताराला शय्या उपलब्ध करून दिली होती.
भगवान सत्यनारायणाला केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांची पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण झाली होती म्हणून बाळाचे नाव सत्यनारायण ठेवण्यात आले. जेव्हा नामकरण विधीच्या दरम्यान हे नाव त्या बाळाच्या छोटाश्या कानात सांगण्यात आले तेव्हा त्या बाळाने स्मितहास्य केले कारण खरोखरी तो ‘तोच’ तर होता! छोटाश्या मनुष्य रूपातील भगवंत त्यानेच ही कल्पना सुचविली होती. सत्य म्हणजे खरेपणा आणि नारायण म्हणजे मनुष्याच्या हृदयात वास करणारा भगवंत आणि खरेच मनुष्याला सत्याचा मार्ग दाखविण्यासाठी आणि भगवंत मनुष्याच्या अंतर्यामीच वास करतो हे त्याला समजावून देण्यासाठी तर बाबांचा अवतार होता.
बाळाच्या आजोबांनी कुटुंबाच्या घराशेजारीच स्वतःसाठी एक कुटीर बांधली होती. आजोबा श्री कोंडम्मा राजू यांना बाळाला मांडीवर घेता यावे म्हणून आजी बाळाला घेऊन त्याच्या कुटीमध्ये जायची. ते त्याला घेऊन देवघरात जात असत. बाळाने त्यांच्या प्रार्थनेमध्ये कधीच अडथळा आणला नाही उलटपक्षी आजोबांच्या लक्षात आले की बाळाच्या उपस्थितीमुळे त्याचे मन अधिक शांत होत असे आणि चित्त परमेश्वराच्या ठिकाणी लागत असे.
लवकरच ते बाळ संपूर्ण गावाचे लाडके बनले. त्याच्या मोहक हास्याने आकर्षित होऊन प्रत्येकाला त्याला जवळ घेऊन त्याचे लाड करावेसे वाटत असे, त्याला काहीतरी भरवावे असे वाटत असे, आणि म्हणून श्री पेद्द वेंकप्पा यांचे घर नेहमी भेटायला आलेल्या लोकांनी भरलेले असे. हे सगळे लोक त्या छोट्या बाळाच्या पाळण्याच्या अवती भोवती रेंगाळत असत. ते बाळ त्यांना त्यांच्या रोजच्या कामातून येणारा कंटाळवाणेपणा विसरायला लावत असे.
राजुच्या शेजारचे घर, गावाचे हिशोब तपासनीस कर्णम् यांचे होते. कर्णम् जातीने ब्राम्हण होते. त्यांची पत्नी सुबम्मा त्या बाळाला घेत असे, त्याचे लाड करत असे, त्याला अगदी कवटाळून धरत असे. ते बाळही आनंदाने खिदळत असे आणि सुबम्मा मोठ्या आंनदाने त्याला आपल्या घरी घेऊन जात असे. सुबम्मा वयस्क स्त्री होती आणि तिला मूलबाळ नव्हते त्यामुळे ईश्वराम्माच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती होती आणि म्हणून ईश्वरामाने तिला कधीही आडकाठी केली नाही. त्या छोट्या बाळाचा सुबम्माकडे जाण्याचा तो उत्साह पाहून इतर बायका म्हणत असत,” हे ब्राम्हणाचे पोर दिसतय” ते बाळ स्वतःच्याही घरी इतक्या उत्स्फूर्तपणे हसत खिदळत नसे जेवढे ते सुबम्माच्या घरी खिदळत असे. आणि म्हणून गावातील बायका ईश्वराम्माला देवकी आणि सुबम्माला यशोदा म्हणत असत. जसेजसे दिवस जाऊ लागले ते बाळ अधिकच गोड दिसू लागले आणि आपले बाळ सर्वांचे प्रेम आणि अवधान यांचा केंद्र बिंदू बनले आहे हे पाहून ईश्वराम्माला खूप आनंद होत असे.
छोटासा सत्या मोठा झाल्यावर एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली की मोठ्या माणसांप्रमाणे कपाळावर विभूतीचे मोठे पट्टे ओढून घेण्यात त्याला कोण आनंद मिळत असे आणि कपाळावरची विभूती गेली तर पुन्हा लावण्याचा आग्रह तो धरत असे. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटे. कपाळाच्या मधोमध कुंकवाचा लाल ठिपकाही त्याला लावायचा असे आणि त्यासाठी तो बहिणींच्या कुंकवाच्या डबीतील कुंकू हळूच घेत असे. तो शिव होता तो शक्ती होता ! “ईश्वर आणि ईश्वराची शक्ती” म्हणून त्याला भगवान शिवाची पवित्र विभूती आणि त्याच्या अर्धांगिनीचे लाल कुंकू दोन्ही हवे असे.
त्याला मांसाहारी अन्नाचा इतका इतका तिटकारा होता की जेथे बकरे, मेंढ्या, गुरे यांची कत्तल केली जात असे किंवा कोंबड्या, मासे पकडले जात असत अशा ठिकाणांपासून तो नेहमी दूर राहायचा. ज्या स्वयंपाकघरांमध्ये आणि ज्या भांड्यांमध्ये मांस शिजवले जायचे अशी ठिकाणे, अशी भांडी तो नेहमी टाळत असे. कधी, कधी जर त्याला ऐकू आले की खाण्यासाठी म्हणून पक्षी मारणार आहेत तेव्हा तो धावत तेथे जात असे तो पक्षी शोधून काढत असे त्याला आपल्या मिठीत घट्ट धरत असे, त्याला प्रेमाने कुरवाळत असे जणु काही त्याच्यावर प्रेमाचा एवढा वर्षाव केल्यावर मोठ्यांना दया येऊन ते त्या पक्षाला सोडून देतील. अशा वेळेस तो धावतच कर्णम्च्या घरी जात असे कारण ते शाहाकारी होते आणि सुबम्माने त्याच्या यशोदेने दिलेले भोजन ग्रहण करत असे. सर्व प्राणीमात्रांच्या प्रति असलेले त्याचे प्रेम पाहून आसपासचे लोक त्याला ब्रम्हज्ञानी, ‘आत्मसाक्षात्कारी’ म्हणत असत. तीन-चार वर्षाच्या कोवळ्या वयाचे असताना देखील मनुष्याचे दुःख, भोग पाहून बाबांचे हृदय द्रवत असे.
जर दारावर कोणी भिकारी आला तर तो धावतच घरात जात असे आणि आपल्या बहिणींना त्या भिकाऱ्याला काही अन्न द्यायलाच लावत असे. बहिणी कधी कधी चिडत असत आणि कधी कधी भिकाऱ्याला हाकलून देत. असे झाले की सत्या मोठ्याने रडत बसे आणि इतका वेळ रडत बसे की त्याला शांत करण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे त्या भिकाऱ्याला परत बोलावणे! मग त्याच्या दारावर ओळीने भिकारी येतच राहत. मग सत्याच्या आईने त्याला ताकीद दिली,”हे बघ तू त्यांना अन्न दे, पण मग तुला उपाशी बसावे लागेल.” पण त्यामुळे तो नाउमेद झाला नाही, तो भुकेलेल्यांना अन्न देत राहिला आणि स्वतः उपाशी रहात असे. अशा वेळेस त्याने जेवावे म्हणून कोणीही त्याचे मन वळवू शकत नसे, तो जेवणाला हातही लावत नसे.
एक गूढ व्यक्ती सत्याला भेटायला येत असे आणि त्याला जेवू घालत असे. ओळीने काही दिवस उपाशी राहिला तरी इतके दिवस उपाशी असल्याचे कोणतेच चिन्ह त्याच्यामध्ये दिसायचे नाही. आणि दिवसभर त्याचे जे उपक्रम चालायचे ते करताना तो थकल्यासारखा, दमल्यासारखा पण दिसायचा नाही. तो आईला सांगत असे की माझे जेवण झाले. एक वृद्ध माणूस आला होता आणि त्याने मला चविष्ट दूधभात खाऊ घातला! हे सिद्ध करण्यासाठी तो आपला उजवा हात आईच्या समोर धरत असे जेणे करून ज्या प्रकारचे दूध, तूप, दही आईनेही खाल्ले नव्हते अशा पदार्थांचा त्याचा हाताला येणार सुरेख वास आईला घेता यावा.
सत्या जेव्हा बाहेर रस्त्यावर खेळायला जाऊ शकण्याएवढा मोठा झाला तेव्हा तो आंधळे, पांगळे, रोगी, ज्यांना काही काम करता येत नाही अशा भिकाऱ्यांना शोधून घरी घेऊन येत असे. त्याच्या बहिणींना मग त्या भिकाऱ्यांना अन्न किंवा धान्य काहीतरी द्यावे लागत असे आणि ते पाहताना सत्याला खूप आनंद होत असे.
मुलाने कसे असावे याचे सर्वात योग्य उदाहरण म्हणजे सत्यनारायण असे गावातल्या प्रत्येक पालकाला वाटत असे. लवकरच गावातील छोटे मित्र त्याला आपला गुरु मानू लागले. त्याच्या कुटुंबाला याबद्दल जरा विलक्षण प्रकारे समजले. एके दिवशी राम- नवमीच्या रात्री खूप उशिरा एक रंगीबेरंगी मिरवणूक गावामधून चालली होती. या मिरवणुकीमध्ये फुलांनी सजविलेली एक बैलगाडी होती जिच्यामध्ये भगवान श्रीरामाची एक मोठी प्रतिमा ठेवली होती. तिच्या शेजारी एक पुजारी बसला होता जो घराघरातून अर्पण केले जाणारे हार, कापूर इत्यादिंचा स्वीकार करत होता. पावा आणि ढोलकी यांच्या निनादणाऱ्या आवाजाने गावकरी आनंदून गेले होते.
सत्याचे घरही या आवाजाने जागे झाले आणि त्यांनी पाहिले तर सत्या घरी नव्हता. मध्यरात्र उलटून गेली होती, घाबरून ते सत्याला शोधू लागले. भगवान श्रीरामाची प्रतिमा घेऊन त्यांच्या दारात आलेल्या त्या बैलगाडीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. फोटोच्या खाली मोठ्या अधिकाराने बसलेल्या त्यांच्या पाच वर्षाच्या छोट्या सत्याला पाहून त्यांना कोण आश्चर्य वाटले असेल याची कल्पना करा. त्याच्या छोट्या साथीदारांना जेव्हा विचारले की सत्या तुमच्याबरोबर न चालता त्याला तेथे का बरे बसविले आहे ? यावर त्याचे मित्र तात्काळ उत्तरले की,” तो आमचा गुरु आहे.” खरोखर तो जगभरातील सर्वांचा गुरु आहे.
पुट्टपर्ती गावात एक छोटीशी शाळा होती. लहान असताना गावातील इतर मुलांबरोबर बाबा त्या शाळेत जात असत. वक्तशीरपणा आणण्यासाठी शाळेत जरा कडक शिक्षा होती. उशीरा येणाऱ्या मुलांमध्ये जी पहिली दोन मुले शिक्षकांना अभिवादन करत त्यांना सोडून दिले जाई. यानंतर उशीरा येणाऱ्या प्रत्येक मुलाला वेताच्या छडीचा मार बसे. उशीरा येणाऱ्यांच्या यादीत तुमचा नंबर कितवा आहे यावरून हातावर किती छड्या बसणार ते ठरत असे. या त्रासातून सुटका होण्यासाठी मुले सूर्योदयापूर्वीच शाळेच्या इमारतीच्या वळचणी खाली येऊन थंडी, पावसात, धुक्यात कुडकुडत उभी राहायची. त्यांची अशी अवस्था पाहून छोटा सत्या त्यांच्यासाठी टी शर्ट, टॉवेलस् घेऊन यायचा. शेवटी घरातल्यांनी कपडे हरवू नयेत म्हणून कुलपात बंद करून ठेवण्यास सुरुवात केली.
सत्यनारायण खरोखर एक अनमोल बालक होते. तो स्वतःचा अभ्यास स्वतः करत असे आणि त्याचा अभ्यास इतर मुलांपेक्षा खूपच लवकर होत असे. गावात होणाऱ्या संगीत- नाटकांच्या तालमी त्याच्या घरी चालत असत आणि त्यातील सर्व गाणी त्याला तोंडपाठ झाली होती; वयाच्या केवळ सातव्या वर्षीच त्याने सार्वजनिक ठिकाणी गाण्यासाठी गाणी रचली होती. सत्या जेव्हा आठ वर्षांचा होता तेव्हा पुट्टपर्तीपासून अडीच मैलावर असलेल्या बुक्कपट्टण येथील उच्च प्राथमिक शाळेत जाण्यास तो योग्य आहे असे सांगण्यात आले. हे सर्व अंतर, शाळेच्या पुस्तकांचे दप्तर डोक्यावर घेऊन उन्हात, पावसात, दगडी टेकड्या ओलांडत, चिखलानी भरलेली कुरणे तुडवत, कधी गुडघाभर पाण्यातून तो चालत जात असे. थंड भात आणि त्याबरोबर चटणी किंवा दही असे जेवण जेवून आणि दुपारच्या जेवणाचा डबा बरोबर घेऊन तो सकाळी लवकर घरून निघत असे.
शाळेपर्यंतचे संपूर्ण अंतर तो त्याच्या छोट्या मित्रांबरोबर चालत जात असे. साध्या, मोठेपणाची हौस नसलेल्या, प्रामाणिक व समंजस असलेल्या, आज्ञाधारक आणि गरजेपुरतच बोलणाऱ्या सत्याने रोज वर्गात लवकर पोहचून सर्व मुलांच्या समोर एक उत्तम उदाहरण घालून दिले. वर्गात लवकर पोहोचल्यावर तो देवाचे एखादे चित्र किंवा फोटो ठेवत असे आणि पूजा करत असे आणि नंतर काहीतरी प्रसाद वाटत असे. तो आपल्या रिकाम्या पिशवीतून वेगवेगळ्या गोष्टी काढून देत असे आणि त्यासाठी सगळी मुलं त्याच्याभोवती गोळा होत. त्याबद्दल विचारले असता तो सांगत असे की देवदूत त्याच्या इच्छा पूर्ण करतो आणि त्याला जे काही हवे आहे ते आणून देतो.
एकदा एका शिक्षकांना त्या देवदूताच्या शक्तीचा ( सत्याच्या दिव्य संकल्पाचा ) अनुभव द्यावा लागला होता. एकदा वर्गामध्ये शिक्षकांच्या असे लक्षात आले की इतर मुलांप्रमाणे सत्या ‘ नोटस्’ लिहून घेत नव्हता तर तो स्तोत्रे रचत होता आणि ती इतर मुलांमध्ये वाटण्यासाठी त्याच्या ‘कॉपी’ करत होता. त्याबद्दल त्याला विचारले असता सत्या म्हणलं,”गुरुजी मला ‘नोटस्’ लिहून घेण्याची गरज नाहीयं. तुम्ही जे लिहून घ्यायला सांगत आहात ते सर्व मला समजले आहे. त्यावरील कोणताही प्रश्न तुम्ही मला विचारा मी त्याचे बरोबर उत्तर सांगतो, “परंतु शिक्षकांनी त्याचे काहीच ऐकले नाही. सत्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून त्यांनी सत्याला शेवटची घंटा वाजेपर्यंत बाकावर उभे राहण्याची शिक्षा केली. सत्याने त्यांची आज्ञा मान्य केली. आपल्या ‘गुरूला’ तोल सांभाळत बाकावर उभे राहणे त्रासदायक होत आहे हे पाहून त्याच्या मित्रांना वाईट वाटले.
त्या शाळेत जनाब महबूब खान नावाचे अजून एक शिक्षक होते ज्यांना सत्या खूप आवडत असे आणि ते सत्याचा आदर करीत. ते इंग्लिश इतके सुंदर शिकवत की प्रत्येक मुलाला प्रत्येक धडा व्यवस्थित समजत असे. सत्या इतर मुलांपुढे जे उत्तम आदर्श घालून देत असे त्यावरून त्यांना जाणवले होते की त्यांच्याजवळ काही महान शक्ती आहेत आणि म्हणून ते सत्याला अतिशय प्रेमाने वागवत. ते जेव्हा सत्याला घरी जेवायला बोलावत ते आपले घर अगदी स्वच्छ करत कारण मांसाहारी पदार्थांशी जरासुद्धा संपर्क आलेल्या अन्नाचा सत्याला तिटकारा होता. महबूब खान शांतपणे सत्याजवळ काहीवेळ बसायचे आणि त्याचे केस कुरवाळत हळूच त्याला म्हणायचे,”सत्या तू एक अद्भुत मुलगा आहेस, तू हजारोंना मदत करशील, तू एक महान शक्ती आहेस!” त्यांनी जेव्हा वर्गामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना दिसले की त्यांचा छोटा विद्यार्थी बाकावर उभा आहे. त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी पाहिले की ज्या शिक्षकांनी त्याला शिक्षा केली होती ते अजून खुर्चीवरच बसून होते. खरं तर त्यांनी पुढच्या तासाच्या शिक्षकांसाठी खुर्ची रिकामी करून देणे आवश्यक होते. खुर्चीवर बसलेल्या शिक्षकांनी त्यांच्या कानात सांगितले की त्यांना खुर्चीतून उठताच येत नव्हते, ते उठले की त्यांच्याबरोबर खुर्चीपण चिटकून येत होती.
ज्या मुलांनी हे ऐकले ती मुले गालातल्या गालात हसू लागली कारण त्यांना समजले की सत्याच्या त्या देवदूतामुळे शिक्षकांची अशी अवस्था झाली आहे. मेहबूब खान यांनाही हाच संशय आला आणि त्यांनी त्या शिक्षकांना सुचविले की त्यांनी सत्याला खाली बसण्यास सांगावे. शिक्षकांनी त्याप्रमाणे केले आणि तेव्हाच त्यांना चिकलेली खुर्ची निघाली.
काही वर्षांनी या प्रसंगाबद्दल बोलताना बाबा म्हणाले की हे सर्व त्यांच्या इच्छेनेच घडले परंतु रागाने नव्हे तर त्यांचा अवतार आणि त्यांचे कार्य याबद्दल ते पुढे जी घोषणा करणार होतो त्यासाठी लोकांची मने तयार व्हावीत म्हणून त्यांनी असे केले.
सत्याला त्याचे ज्ञान आणि शुचिता यामुळे ‘ब्रम्हज्ञानी’ हे टोपणनाव दिले होते आणि त्या नावाप्रमाणेच त्याने आपली शिकवणूक आणि आचरण यातून दाखवून दिले की या मर्यादित, भौतिक जगातून मिळणारे लहान- सहान आनंद हे भक्ती, भजन, समाधान, प्रार्थना यातून मिळणाऱ्या परमानंदापेक्षा अगदी क्षुद्र असतात. अशा गुणांनी युक्त असणाऱ्या संताच्या कथांमधून त्याला खूप आनंद मिळत असे.
त्या कोवळ्या वयातही सत्याची संगत मिळवण्यासाठी, त्याचे मन जिंकण्यासाठी आणि त्याने रिकाम्या पिशवीतून काढलेला गोड खाऊ मिळवण्यासाठी मुलांच्या अंगी स्वच्छता आणि प्रामाणिकपणा हे गुण असणे आवश्यक होते.