पुट्टपर्ती गाव आणि त्यामागील आख्यायिका
आकाशातून पाहिले असता, हे चित्रावती नदीच्या तीरावरील टेकड्यांच्या अंगठीमध्ये जड़वलेल्या एका छोट्याशा रत्नाप्रमाणे दिसते. ज्या छोट्या गावातील टेकड्यांवर मंदिरातील घंटांचा (अनुस्वार) किणकिणाद दुमदुमतो, त्या पुट्टपर्ती गावास अवतार श्री सत्य साई बाबांनी स्वतःचे जन्मस्थान म्हणून निवडले. पूर्वी हे, कवी, विद्वान पंडीत व वीरपुरुषांचे गांव म्हणून ओळखले जाई. तसेच हे गाव सद्भागय देवतेचे आणि वागदेवतेचे निवासस्थान मानले जाई.
दक्षिण भारतांतील ह्या शांत छोट्याशा गावाच्या नांवाभोवती अनेक आख्यायिका आहेत. पुट्ट म्हणजे वारूळ, ज्यामध्ये सर्प वास करतो आणि पर्ती म्हणजे भरपूर वाढ, आधिक्य.
खूप पूर्वी हे गाव ‘गोलापल्ली’ वा ‘गुराख्यांचे गाव’ म्हणून ओळखले जाई. हे नाव आपल्याला कृष्णाच्या खेळकर बालपणाची आठवण करून देते. हे गाव गुराख्यांच्या आनंदाने व हास्याने भरून गेले होते. गाईगुरे धष्टपुष्ट होती व अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे मधुर, मलईदार व दाट दूध देत होती. प्रत्येकाच्या घरामध्ये लोणी आणि तूप ह्यांची रेलचेल होती.
लोक शांत आणि समृध्द जीवन जगत होते, एक दिवस एका गुराख्याच्या असे लक्षात आले की त्याची आवडती गाय रानातून चरुन आल्यानंतर दूध देईनाशी झाली. त्याचे कारण शोधून काढण्याचे त्याने ठरवले. तो ते पाहण्यासाठी एका जागी लपून बसला. गाईचे विचित्र वर्तन पाहून तो विस्मयचकित झाला. गाईने आपल्या बछड्याला सोडले व गोठ्यातून निघून ती थेट गावाबाहेरील एका वारूळापाशी जाऊन थांबली. तो गुराखीही तिच्या पाठोपाठ गेला आणि त्याने काय पाहिले? एक नाग वारुळाच्या तोंडातून बाहेर आला व शेपटीवर उभा राहुन आणि त्याने गाईच्या आचळांस तोंड लावून सर्व दूध पिऊन टाकले!
ते पाहून तो गुराखी अत्यंत क्रोधित झाला. त्याने एक मोठा दगड डोक्यावर उचलला व नेम धरून त्या नागावर फेकला. वेदनांनी गडाबड़ा लोळणाऱ्या नागाने त्या गुरख्याला व त्या गावाला शाप दिला. त्याने म्हटले की हे स्थान वारुळांनी भरुन जाईल. येथे असंख्य वारुळे तयार होऊन हे सर्पांचे निवासस्थान बनेल!
आणि तसेच घडले! गाई गुरांचे आरोग्य खालावले व त्यांची संख्या घटली व सर्वत्र वारुळे दिसू लागली. गावकऱ्यांनी त्या स्थानाचे ‘वाल्मिकपुरा’ म्हणजेच ‘वारुळांचे गाव’ असे पुन्हा नामकरण केले. त्या नावामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला. वाल्मिकी म्हणजे अन्य कोणी नसून ज्याने जगाला ‘रामायण’ हे अमर महाकाव्य दिले तो संत कवी.
आजही पुट्टपर्तीमधील गावकरी, ह्या दंतकथेतील तो नागाला मारलेला, पोचा आलेला वाटोळा दगड पुरावा म्हणून दाखवतात. ह्या दगडावर लाल रंगाची एक रेघ आहे. ती नागाच्या रक्ताची निशाणी मानली जाते. त्यानंतर लवकरच कदाचित तो शाप दूर होण्यासाठी आणि गाई गुरांनी गाव समृद्ध होण्यासाठी तो दगड एक पूज्य वस्तु बनला. त्याच्याकडे गुराख्यांचा देव श्रीकृष्ण ह्याचे प्रतिक म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले. पिढ्यांन पिढ्या त्याचे पूजन केले जावे म्हणून एक मंदिर बांधून त्या दगडाची प्रतिष्ठापना केली. काही वर्षांपूर्वी दगडाची अज्ञात विशेषता उघड करण्यासाठी बाबांनी तो दगड धुवून त्याच्या पोचा आलेल्या बाजूस चंदनाचा लेप लावण्यास सांगितले. लेप लावल्यानंतर गाईला टेकून उभा असलेला व ओठांवर मुरली धारण केलेल्या कृष्णाची शिल्पाकृती दृग्गोचर झाली! गावकरी अजूनही असे म्हणतात की त्यांना मुरलीचे मधुर स्वर ऐकू येतात.
त्या दिवसापासून, आरोग्यपूर्ण, जोमदार गाई गुरांच्या सहाय्याने, पुट्टपर्ती पुन्हा एकदा एक छोटेसे समृद्ध गाव बनले! आजही तुम्ही पूर्वेकडे असलेल्या जुन्या किल्ल्याचा मनोरा पाहु शकता जो भोवतालच्या भागावरील पुट्टपर्तीचे प्रभुत्व आणि त्याच्या नेतृत्वाचे सामर्थ्य दर्शवतो.
[Source : Lessons from the Divine Life of Young Sai, Sri Sathya Sai Balvikas Group I, Sri Sathya Sai Education in Human Values Trust, Compiled by: Smt. Roshan Fanibunda]