एकाग्रतेचे महत्त्व
स्वामी विवेकानंदांना बालपणी प्रेमाने बिली म्हणत असत. बिली आणि त्याचे मित्र मिळून “ध्यानाचा” खेळ खेळत असत. सर्व मुले डोळे मिटून बसत व आपापल्या इष्टदेवतेचे चिंतन करत असत.
एक दिवस ते सर्वजण हा खेळ खेळत असताना त्यांच्यातील एकास अस्पष्ट आवाज ऐकू आला. त्याने डोळे उघडून पाहिले. त्याला एक साप जमिनीवरुन सरपटत त्यांच्याकडे येताना दिसला. तो जोरात ओरडला,” साप! साप! ” बिली सोडून सगळी मुले धावली व ओरडून म्हणाली, “बिली लवकर ऊठ, एक मोठा साप आला आहे. तो तुला दंश करेल. धाव,धाव.” परंतु हा सर्व आरडाओरडा बिलीच्या कानावर गेलाच नाही. तो डोळे मिटून स्तब्ध आणि निश्चल बसला होता. व केवळ परमेश्वराचे चिंतन करत होता. त्याच्या भोवती काय चाललय हे त्याला माहितच नव्हते. आणि मग त्या सापाने काय केले? तो साप जमिनीवर इकडे तिकडे फिरला व नंतर दूर निघून गेला. बिलीच्या एकाग्रतेचे सामर्थ्य आणि त्याचे परमेश्वराप्रती प्रेम पाहून त्याचे मित्र, पालक व शेजारी सर्व जण थक्क झाले.
ह्या एकाग्रतेच्या शक्तीमुळे बिलीला एकदा किंवा दोनदा वाचून धडे पाठ होत असत. कॉलेजमध्येही तो एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे. ह्या शक्तीच्या सहाय्याने बिली स्वामी विवेकानंद बनू शकला. एकदा अमेरिकेतील शिकागो ह्या शहरात असतांना विवेकानंदांनी काही तरुण मुलांना नदीच्या पाण्यात तरंगणारी अंड्याची टरफले बंदूकीने उडवतांना पाहिले. ती टरफल छोट्या लाटांवर खाली वर होत असल्यामुळे मुलांना नेम धरता येत नव्हता. सर्व मुलांनी खूप वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांना निशाणा साधता आला नाही. विवेकानंद कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत असल्याचे त्या मुलांच्या लक्षात आले. व त्यांनी विवेकानंदांना हाक मारली,” सर, तुम्ही बराच वेळ आमचे अवलोकन करत आहात. तुम्ही हे आमच्याहून अधिक चांगले करू शकाल, असे तुम्हाला वाटते का?” विवेकानंद हसले आणि म्हणाले की त्यांना प्रयत्न करून पाहायला आवडेल. त्यांनी बंदूक हातामध्ये घेतली, त्यांनी नेम धरला व थोडा वेळ टरफलांवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर त्यांनी १२ वेळा बंदुकीतुन गोळ्या झाडल्या व प्रत्येक वेळी टरफलास गोळी लागली. स्वामीजींचे कौशल्य पाहुन मुले आश्चर्यचकित झाली. त्यांनी स्वामीजींना विचारले, “सर, तुम्ही सरावशिवाय हे कसे करू शकलात? विवेकानंद मोठ्याने हसले आणि म्हणाले”.
मी तुम्हाला त्याचे रहस्य सांगतो. तुम्ही जे काही करत असाल, तुमचं सर्व लक्ष त्याच्यावर केंद्रित करा. अन्य कशाचाही विचार करू नका. जर तुम्ही बंदूक चालवत असाल तर तुमच मन केवळ तुमच्या लक्षावर केंद्रित करा. म्हणजे तुमचा नेम चुकणार नाही. एकाग्रतेतून अनेक आश्चर्ये घडतात. जेव्हा तुम्ही अभ्यास करता, तेव्हा केवळ हातामधील धड्याचा विचार करा. म्हणजे तुम्ही जे वाचाल, ते तुमच्या स्मरणशक्तीवर कोरले जाईल. ह्या एकाग्रतेच्या शक्तीने विवेकानंदांनी विश्वकल्याणासाठी अनेक महान गोष्टी केल्या.
प्रश्नावली
- एकाग्रतेचे काय फायदे होतात?
- पुढे दिलेल्या प्रसंगांमध्ये जर तुम्ही लक्ष केंद्रित केले नाही तर काय होईल?
-
- जेव्हा तुम्ही रस्ता ओलांडत असाल.
- वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना
- गृहपाठ करताना
- भजन गातांना
- परीक्षेसाठी अभ्यास करताना
- जेवण करताना
- चित्रपट पाहताना
- क्रिकेट खेळताना
- वर्णन करा- अ) पूर्ण लक्ष केंद्रित केल्याचा व त्याचा सुपरिणाम प्राप्त झाल्याचा एखादा स्वानुभव ब) एकाग्रतेचा अभाव असलेला एखादा स्वानुभव