समाधान आणि शांती
गौतम बुद्ध एका अरण्यातून एका शहराकडे चालले होता. वाटेत त्यांना पाण्याचा एक झरा दिसला. त्यात त्यांनी हातपाय धुतले व ते एका झाडाखाली ध्यानस्थ बसले.
त्या शहराचा राजा त्याच रस्त्याने घोड्यावरून चालला होता. स्वतःच्या राज्याचा विस्तार वाढविण्यासाठी तो नेहनी इतर राजांशी युद्ध करीत असे. त्यामुळे त्याचे अतःकरण द्वेष, भीती आणि मत्सर यांनी व्यापलेले असे. एक संन्यासी डोळे मिटून झाडाखाली निष्क्रिय बसलेला पाहून तो घोड्यावरून खाली उतरला आणि रागाने बुद्धांवर ओरडू लागला. “ए सन्याशा, डोळे उघड आणि बघ तुझ्यासमोर कोण उभे आहे ते! माझ्यासारखा राजासुद्धा स्वस्थ बसत नाही. तुम्ही संन्यासी इतरांच्या कष्टाचं खाता आणि इतरांनाही आळशीपणा शिकवता!” उंच स्वरात रागाच्या व निंदेच्या तिखट शब्दांचा त्याने गौतमांवर वर्षाव केला. शेवटी तोच थकला आणि दमून गेला.
या सर्व वेळात गौतम शांत होते. त्यांनी हळूच डोळे उघडले आणि स्मितहास्य करीत ते राजाला म्हणाले, “खाली बैस मुला! तू नक्कीच दमला असशील. आणि तुला तहान लागली असेल. मी तुला या झऱ्याच पाणी आणून देऊ काय?”
या मृदु मधुर प्रेमळ शब्दांनी राजा थक्क झाला. त्याला लगेच असे वाटले की हा सन्यासी शांतीच्या शोधार्थ राजवाड्यातील सुखे सोडून देणारा आणि शेवटी बुद्ध (ज्ञानी) झालेला थोर राजपुत्र सिद्धार्थच असला पाहिजे म्हणून तो त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, “माझ्या थोर चुकीबद्दल मला क्षमा करा. मला इतकच सांगा की माझा एवढा क्रोध व निंदा सहन करूनही तुम्ही इतके निवांत, शांत व माझ्याशी इतके प्रेमळ कसे?”
“मुला”, बुद्ध म्हणाले, “समज, तू एक बशी भरून मिठाई एखाद्याला दिली आणि त्याने घेतली नाही तर म ती कुठे जाते? राजाकडून ताबडतोब उत्तर आले, “अर्थात ती देणाऱ्याकडे परत जाते.” मग तुला लक्षात येत नाही का, की तू जे काही काही बोललास, त्यातला एकही शब्द मी स्वीकारलेला नाही. मग ते शब्द मला इजा कशी करू शकतील?”
आता राजाची खात्रीच झाली की हा सन्यासी दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द बुद्धच आहे. विनम्र होऊन तो पुन्हा म्हणाला, “हे बुद्धदेवा, कृपा करून खऱ्या सुखाचा मार्ग मला दाखवा.”
बुद्धाचे डोळे दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने चमकू लागले. “मुला,” ते म्हणाले, “क्रोध, लोभ, मत्सर, भय आणि असे सर्व विकार माणसाचं सुख हिरावून नेतात. समाधान, शांती व प्रेम हे जीवनातील खऱ्या सुखाचा आधार आहेत. ज्याच्यापाशी समाधान व शांती नाही तो भिकारी, जो इतरांना मदत करीत नाही व इतरांची सेवा करीत नाही तो आळशी. जो सदैव शांती, समाधान आणि सर्वांबद्दल प्रेमाचा मुकुट घालतो. तो राजाधिराज असतो. कारण फक्त त्यालाच जीवनातील खरे सुख सापडलेले असते.”
राजाने कृतज्ञतेने बुद्धासमोर लोटांगण घातले आणि म्हणाला, “भगवान! मला शिष्य म्हणून स्वीकार करा आजपासून तुम्ही माझे स्वामी! आपण मार्ग दाखवा. मी अनुसरण करीन.
प्रश्न:
- राजा गौतम बुद्धांवर का रागावला? त्याने बुद्धाची निंदा केली. ती बरोबर की चूक? तुमच्या उत्तराला कारणे द्या.
- राजा जरी निंदेच्या तिखट शब्दांचा वापर करीत होता तरी बुद्ध शांत कसे राहू शकले?
- बुध्दाने राजाला काय उपदेश दिला?