साध्या वेशातील साधी अंतःकरणे
उंची व सुंदर कपडे परिधान केल्यामुळे आपण अधिक आदरणीय होतो काय? फक्त अडाणी माणसे असे समजतात की उत्तम पोषाख, सोने व दागदागिने यांच्यामुळे एकदाच पाहिजे त्यांना सगळ्यांकडून मान मिळवणे शक्य होईल. अर्थात प्रत्येकाने नेहमी स्वच्छ धुतलेले, नीट घडी घातलेले कपड़े घालावेत आणि व्यवस्थित दिसावे. पण भडक व भारी पोशाख घालून आपण लोकांकडून सन्मान मिळवू शकू असे समजणे ही चूक आहे. खरे तर भारी पोशाख आणि दागिने खरेदी करणे हा पैशाचा अपव्यय आहे. त्याचा इतरांच्या भल्यासाठी वापर करता येईल.
जगातील अनेक थोर पुरुष साधा पोशाख करीत असत. खरोखर त्यांच्या पोशाखातील व वागण्यातील साधेपणा त्यांच्या मोठेपणात भरच घालीत असे. ही दोन उदाहरणे पाहा.
मायकेल फॅरडे
मायकेल फॅरडे हा एक मोठा शास्त्रज्ञ, त्याने डायनॅमो शोध लावला. त्यामुळे आपल्या घरात विद्युतप्रकाश व आपल्या घरात व कारखाने यांना विद्युतशक्ती मिळू शकली. त्याने आपल्या मोठेपणाचे कधी प्रदर्शन केले नाही. पुष्कळ वेळा त्याचा साधा पोशाख व विनम्र वर्तन इतरांपासून त्याची श्रेष्ठ बुद्धिमत्ता लपवून ठेवीत असत, एकदा इंग्लंडमधील राजाच्या टांकसाळीतील एका अधिकाऱ्याला फॅरडेची भेट घ्यायची होती. तो ‘रॉयल सोसायटी ऑफ सायन्स’ च्या कार्यालयात गेला आणि तिथे कोणीतरी फेरडे ज्या मोठ्या खोलीत आपले शास्त्रीच प्रयोग करीत असे तिकडे त्याला पाठवून दिले. पाहुणा जेव्हा खोलीत शिरला तेव्हा तपकिरी पँट व पांढरा शर्ट घातलेला एक म्हातारा माणूस बेसिनमध्ये बाटल्या धुवीत असलेला त्याला दिसला. पाहुण्याने विचारले, “तू या संस्थेचा पहारेकरी आहेस काय?” “होय,” झकपक पोशाख केलेल्या पाहुण्याकडे पाहात म्हाताऱ्याने उत्तर दिले.
“इथे किती दिवस काम करीत आहेस?” पाहुण्याने विचारले. “झाली की चार वर्ष,” म्हाताऱ्याने शांतपणे उत्तर दिले. “तुला जो पगार मिळतो त्यात समाधानी आहेस काय? तिसरा प्रश्न आला आतामात्र स्मित करीत म्हातारा उत्तरला, “अर्थातच!”. “काय रे, तुझे नाव काय?” पाहुण्याने कुतुलाने विचारले. “लोक मला मायकेल फॅरडे म्हणतात!” असे म्हाताऱ्याचे उत्तर आले. पाहुणा अतिशय शरमला आणि आपल्या घोर चुकीबद्धल त्याने फॅरडेची क्षमा मागितली. “हा थोर पुरुष किती साधा आहे! पाहुणा स्वतःशीच म्हणाला, “की तो अंत:करणाने इतका साधा आहे म्हणूनच मोठा आहे?”
महात्मा गांधी
ब्रिटिश अंमलातून भारत स्वतंत्र करण्यासाठी गांधीजींनी राष्ट्रीय चळवळ सुरू केली होती. ते जिकडे जातील तिकडे लोकांचे जमाव ‘महात्मा गांधी की जय’ या सुप्रसिद्ध घोषवाक्याने त्यांचा जयजयकार करीत असत.
एके दिवशी सकाळी रिचर्ड ग्रेग हा गांधीजींचा अमेरिकन चाहता साबरमती आश्रमात आला. परकीय शासनाविरुद्ध तीव्र लढा देणाऱ्या या थोर देशभक्ताबद्दल त्याला अतिशय कौतुक होते. आश्रमाचे कार्यालय अजून उघडायचे होते. गांधीजी कुठे भेटतील असे ग्रेगने कुणाला तरी विचारले. गांधीजी भोजनगृहात आहेत असे त्याला सांगण्यात आले. “मी तिथे जाऊन त्यांना भेटू शकतो काय?” ग्रेगने घुटमळत विचारले. “हो हो! जा ना!” उत्तर आले, “ते तिथे एकटेच आहेत.”
ग्रेग हलकेच भोजनगृहात गेला. त्याला असे वाटत होते की आपण गांधीजींच्या न्याहारीत अडथळा आणू की काय? पण त्याला काय दिसले? तो थोर स्वातंत्र्यसैनिक सकाळच्या जेवणासाठी भाजी निवडत बसला होता. त्यांनी गुडघ्यापर्यंत धोतर नेसले होते आणि एक छोटीशी शॉल पांघरली होती. “या, या” आपल्या पाहुण्याकडे पाहून गांधीजी हसून म्हणाले, “मी ही छोटीशी कामे केली तर आपली काही हरकत नाही ना?” त्या अमेरिकन माणसाने जे काही पाहिले, ऐकले त्याने तो हेलावून घेला. गांधीजींचा साधेपणा व विनम्रपणा यांनी त्याला लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित केले. पुढच्या क्षणी तो गांधीजींच्या शेजारी बसून भाजी निवडायला मदत करू लागला.
साध्या पोशाखात फिरणारी आणि साध्या अंतःकरणाची ही अशी थोर माणसेच त्यांच्या बांधवांसाठी हे जग अधिक सुखावह करतात.
प्रश्न:
- तुमच्या शब्दात (अ) चांगला पोशाख व (ब) वाईट पोशाख वर्णन करा.
- या दोन घटनांवरून तुम्ही काय शिकलात?
- जास्त सुखी माणूस कोणता? गंभीर, संकोची व गर्विष्ठ की वर्तनाने साधा व विनम्र? तुमच्या उत्तराची कारणे द्या.