पोकळ बढाई धडा शिकते
एकदा गांधीजी एका मोठ्या परदेशी आगबोटीतून प्रवास करीत होते. ते एका परिषदेसाठी इंग्लडला निघाले होते. डेकवरील एका मेजापाशी बसून ते पत्र लिहित होते. झकपक पोशाख केलेल्या एका युरोपियन माणसाला गांधीजींकडे पाहून खूप मौज वाटली कारण ते बोटीवरील इतर प्रवाशापेक्षा अगदीच निराळे होते.
हा बढाईखोर युरोपियन आपल्या खोलीत गेला आणि काही कागदाचे कपटे घेऊन त्याने त्यावर गलिच्छ वाक्ये लिहायला व चमत्कारिक चित्रे काढायला सुरवात केली. गांधीजींना चिडवावे असा त्याचा हेतु होता, अर्धनग्न, टकल्या, दंतहीन म्हाताऱ्याने इंग्लंडला जायचेच कशाला असा त्याला प्रश्न पडला होता. परदेशी जाण्याचा हा ‘वेडेपणा’ गांधीजींनी सोडून द्यावा असा उपदेशही त्याने केला होता. त्याने त्या सगळया कपट्यांना व्यवस्थित टाचणी टोचली आणि तो खोलीबाहेर आला. डेकवर मोठ्या रूबाबत चालत तो गांधीजी लिहीत बसले होते त्या मेजापाशी आला, गांधीजींनी वर पाहिल्याबरोबर ते कागद ‘काळ्या आदमी’ विषयी अनादर प्रकट करीत त्याने त्यांच्या हातात दिले.
“तुम्हाला हे आवडेल व उपयुक्त ठरेल. वाचा आणि ते तुमच्या जवळच ठेवा,” असे तो गांधीजींना म्हणाला, नंतर तो जरासा दूर जाऊन उभा राहिला. त्याने जे काही केले होते त्यावर गांधीजींची प्रतिक्रिया काय होते हे तो पाहत होता. त्याने लिहिलेला प्रत्येक शब्द गांधीजींनी शांतपणे वाचला. मग त्यांनी एक क्षणभर त्या तरुण माणसाकडे पाहिले. नंतर सावकाश त्या त्या कागदांची टाचणी काढून घेतली आणि ते कपटे मेजाखालच्या कचऱ्याच्या टोपलीत टाकले. ते नेहमीप्रमाणे त्या तरुणाकडे पाहून मधुर हास्य करून म्हणाले, “तू मला जे करायला सांगितलेस तेच बरोबर मी केले आहे. तू मला दिलेली टाचणी मी ठेवून घेतली आहे. मला आवडेल व उपयुक्त ठरेल अशी एकच गोष्ट तू मला दिलीस, आभारी आहे।”
त्या युरोपियन तरूणाला तात्काळ आपली चूक उमगली, त्याने जे लिहिले होते ते वाचून गांधीजी संतापतील आणि बोटीवरच्या गोऱ्या माणसांना चांगला तमाशा पाहायला मिळेल अशी त्याची अपेक्षा होती आणि आता हे गांधीजींचे छोटेसे मधुर बोलणे सरळ त्याच्या हृदयाला जाऊन भिडले. गांधीजी किती बुद्धिमान, सुसंस्कृत व नम्र आहेत हे त्याच्या लक्षात आले. त्याने लाजेने खाली मान घातली आणि आला तसा तो निघून गेला. गांधीजींपासून शिकलेल्या या धड्यामुळे त्याचा बढाईखोरपणा त्यानंतर नक्कीच कधी डोके वर काढू शकला नसेल.
प्रश्न:
- त्या युरोपियन तरुणाची चूक कोणती होती?
- गांधीजींनी त्याला काय धडा शिकवला?
- समजा तुमच्या वर्गातल्या बढाईखोर विद्यार्थ्याने तुम्हाला ‘अडाणी मूर्ख’ म्हटले तर तुम्ही काय कराल?