जसे अन्न तसे विचार
ज्या दिवशी भीष्म पडले तो महाभारत युद्धाचा दहावा दिवस होता. त्या दिवसापासून अठराव्या दिवसापर्यंत कृष्ण युद्धाच्या विविध घटना घडवून आणत होते, परंतु भीष्म अर्जुनाने त्यांच्यासाठी तयार केलेल्या शरासनावर झोपले होते. युद्धाच्या शेवटच्या भीष्मांचे दर्शन घेण्यासाठी विजयी पांडव द्रौपदीबरोबर भीष्माजवळ गेले. शराशनावर झोपलेल्या भीष्मांनी पांडवांबद्दल आपुलकी दाखवली आणि त्यांना उपदेश केला, तो शांतिपर्व म्हणून ओळखला जातो.
त्या संदर्भात ज्यावेळी भीष्म शांतीसंबंधातील शांतिपर्वातील वर्तनाचे नियम सांगत होते त्यावेळी द्रौपदीच्या मनात काही विचार आले आणि ती मोठ्यांदा हसली आणि प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. पांडवांना द्रौपदीचे वागणे अगदी अनुचित वाटले. गुरुजनांच्या उपस्थितीत द्रौपदीचे असे हसणे पांडवांना आवडले नाही.
भीष्म सर्वज्ञ होते. त्यांनी पांडवांच्या मनात उत्पन्न झालेल्या विचारांना ओळखले. त्यांना योग्य स्पष्टीकरण देण्यासाठी भीष्मांनी द्रौपदीला आपल्या आणखी जवळ बोलावले. त्यांनी तिला आशीर्वाद दिले आणि ते म्हणाले की द्रौपदीचे सौभाग्य दीर्घकाळ टिकावे आणि पुढे त्यांनी सांगितले की विशेष कारण असल्याखेरीज ती हसणार नाही. त्यांनी तिला सांगितले की आपल्या हसण्याचे कारण सांगावे त्यामुळे तिच्या पतींना तिच्या हसण्याचे उत्तर मिळू शकेल. अत्यंत श्रद्धेने आणि आदराने द्रौपदी भीष्मांना उद्देशून म्हणाली, “ज्या वेळी दुर्योधनाच्या दरबारात माझा अवमान करण्यात आला त्यावेळी तुम्ही कोणत्याही वर्तनाच्या नियमांबद्दल बोलला नाहीत आणि ज्यावेळी माझ्या पतींना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास झाला त्यावेळी तुम्ही वर्तनाच्या नियमांबद्दल काहीही उपदेश केला नाहीत आणि आता जे पांडव धर्माचे मूर्तस्वरुप आहेत त्यांना तुम्ही शांतिपर्व समजावून देत आहात. ज्या माणसांना हे सर्व शिकवण्याची गरज नाही त्यांना तुम्ही हे सर्व का शिकवत आहात? हे सर्व तुम्ही दुर्योधन आणि त्याच्या साथीदारांना शिकवायला हवे होते. असा विचार माझ्या मनात आला आणि मी हसले.
एवढेच नव्हे तर ज्या दरबारात धर्मराज ध्युतात हरले आणि ध्युतात स्वत:ला लावूनही हरले. त्यानंतर त्यांनी मला पणाला लावले. पांडवांनी जंगलात जायचे ठरले आणि माझा अवमान करण्यात आला. हा धर्म होता का? तुम्ही धर्म आणि सदाचरणाचे प्रतीक आहात. स्वत:ला हरवल्यानंतर मला पणाला लावण्याचा धर्मराजांना अधिकार होता असे तुम्हाला वाटते का? त्यावेळी तुमच्या तथाकथित सदाचरणाला धरुन राहण्याचे काय झाले होते? दुसरे म्हणजे धर्मराजांनी मला स्वतः हरल्यानंतर ध्यु तात पणास लावले. त्यांना असे करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्याच दिवशी मी प्रश्न विचारला होता की धर्मराज प्रथम हरले आणि नंतर मला पणाला लावले का प्रथम मला पणाला लावले व नंतर स्वतः हरले? त्यावेळी तुम्ही मला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यावेळी तुमच्या सर्व योग्य आचरणाचे काय झाले? आज ज्यावेळी या सर्वाची काहीही आवश्यकता नाही त्यावेळी तुम्ही हे सर्व पांडवांना सांगत आहात हीच खरोखर हास्यास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळेच मी हसले.’
ज्यावेळी भीष्म जन्म-मरणाच्या घोटाळत होते त्यावेळी द्रौपदीने आवेशाने केलेले खंडन आणि अडचणीत टाकणारे विचारलेले प्रश्न यामुळे धर्मराजसुद्धा नाराज झाले..
तथापि भीष्म जोरात हसले आणि त्यांना असे प्रश्न विचारल्याबद्दल द्रौपदीची प्रशंसा केली आणि सांगितले या प्रश्नांची उत्तरे आगामी कलियुगात अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्यांनी पांडवांना शांत राहण्यास सांगितले.
भीष्म म्हणाले, “अनेक वर्षे मी दुराचारी आणि पापी लोकांची सेवा करीत होतो आणि त्यांनी दिलेल्या अन्नावर जगत होतो म्हणून माझ्यातील सर्व धर्म आणि औचित्य बुडून गेले. तुझा पति अर्जुन – त्याच्या बाणांचा परिणाम म्हणून सर्व पापी रक्त बाहेर निघून गेले आणि जो धर्म बुडून गेला होता तो वर आला आहे आणि मी चांगल्या वर्तनाच्या आवश्यकतेबद्दल उपदेश करीत आहे.”
भीष्मांनी उपदेश केलेल्या शांतिपर्वातून आपणांला असा धडा शिकला पाहिजे की वाईट पापाचाराने संचित केलेल्या पैशातून एखादा आपला विकास करु इच्छित असेल तर त्याच्यातील चांगुलपणा त्याच्यात असणाऱ्या पापी रक्तात बुडून जाईल. या संदर्भात कृष्णाने शिकवले आहे की ज्या भांड्यात आपण अन्न शिजवतो, ते अन्न शिजवण्यासाठी जे धान्य वापरतो आणि खुद्द ते अन्न स्वच्छ असले पाहिजे.
या संवादात भीष्माने जगाला सांगितले होते की जे अन्न तुम्ही खातात त्यात पाप असू शकेल. जसे अन्न आपण खातो तसे आपले विचार बनतात आणि जसे विचार आपल्यात उत्पन्न होतात त्यातूनच आपल्या क्रिया निर्माण होतात. आपल्या कर्मातून चांगले वाईट घडते पांडवांना योग्य उपदेश केल्यानंतर भीष्मांनी आपले प्राण सोडले.
Narration: Ms. Sai Sruthi S.V.
[Sri Sathya Sai Balvikas Alumna]