सद्गुणी गांधारी
कौरव पांडवांचे घनघोर महायुद्ध संपले होते. या युद्धात, राजा धृतराष्ट्राचे सर्व पुत्र मरण पावले होते. युद्धाच्या शेवटच्या रात्री तर, पांडवाच्या शिबिरातील त्यांच्या मुल बाळांची आणि उरलेल्या सैन्याची निद्रिस्त अवस्थेतच, अत्यंत बीभत्सरीत्या कत्तल करण्यात आली होती! त्यानंतरची, दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली ती हे भयाण आणि नैराश्यपूर्ण दृश्य दाखवूनच! या युद्धात सर्व पांडव आणि भगवान श्रीकृष्ण मात्र कोणतीही इजा न होता सुखरूप राहिले. पांडवानी युद्ध जिंकले खरे, पण त्यात त्यांच्या सर्व मुलाबाळांची आणि आप्तसुहृदांची आप्तसुहृदांची हत्या झाल्याने त्यांच्या आशाआकांक्षा लयाला गेल्या होत्या! युद्धोत्तर, एका मोठ्या साम्राज्याचे ते अधिपती झाले खरे. पण त्याचे नंतर या साम्राज्याला कोणी वारसच उरला नव्हता! त्यांना राजपद मिळाले खरे, पण त्याचबरोबर त्यांचे घर, मुलांबाळांविना सुनेसुने झाले होते.
दुसऱ्या बाजूला, कौरव स्त्रिया, त्यांच्याकडील योद्ध्यांच्या मृत्युमुळे शोकाकूल होऊन विलाप करत होत्या! त्यांची ही दारुण अवस्था पाहून, पांडवांचा सुद्धा थरकाप झाला. रणभूमीवर, धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, मृतावस्थेत पडलेले दिसत होते. या सर्व पार्श्वभूमीवर, वृद्ध आणि अंध, राजा धृतराष्ट्र आणि राणी गांधारी यांचे पुत्रवियोगाचे दु:ख आणि हानि अनेकविध प्रकारची होती. आपल्या राजकुलाच्या दर्जाला शोभेल अशा दृष्टीने आणि इतरेजनापासून जरा अलिप्ततेने, या रणभूमीवर एका बाजूला, आपल्या राजरथात ते बसून राहिले होते. या युद्धात ज्यांचा पूर्ण पराजय झाला त्या कुरुकुलाचे ते प्रमुख तर होतेच, पण ज्या पांडवांचा या युद्धात विजय झाला, त्यांच्याशी पण त्यांचे रक्ताचेच नाते होते. या युद्धातील विजयानंतर, कुरुकुलातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून, युधिष्ठिरासहित सर्व पांडव जेव्हा त्यांना भेटायला आले तेव्हा त्यामागे ‘जेता व जित’ अशी भावना नव्हती. वडील मंडळींना दर्शविलेला आज्ञाधारकपणाच त्यामागे होता. त्यामुळे धर्मराज, त्याचे चार बंधू, राणी द्रौपदी आणि भगवान श्रीकृष्ण, ही सर्व मंडळी जेव्हा त्यांचेकडे आली, तेव्हा त्या दोघांच्या चरणाना वंदन करुन, हे सर्वजण, त्यांचेपुढे विनम्रतेने स्तब्ध उभे राहिले.
वृद्ध गांधारीच्या दुःखाला पारावार नव्हता. पण, एका साम्राज्ञीला साजेशा, समयोचित वृत्तीने ती यावेळी वागली. राजा धृतराष्ट्र हा जन्मांध होता, परंतु पत्नीधर्माला स्मरुन केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे आपल्या नवन्यासाठी, तिने पण आपणहून जन्मभर, स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून अंधत्व पत्करले होते.
या उग्र तपःश्चर्येमुळे तिला दिव्य अंतदृष्टी प्राप्त झाली होती. तिला वाचासिद्धी प्राप्त झाल्याने ती म्हणेल तसे घडे. तिने उच्चारलेल्या वाणीप्रमाणे घटना घडून येण्याचे चुकत नसे.
या उग्र तपःश्चर्येमुळे तिला दिव्य अंतदृष्टी प्राप्त झाली होती. तिला वाचासिद्धी प्राप्त झाल्याने ती म्हणेल तसे घडे. तिने उच्चारलेल्या वाणीप्रमाणे घटना घडून येण्याचे चुकत नसे.
राजा धृतराष्ट्राने आपले दौर्बल्य (पुत्रमोह) आणि कामना, याना वेळीचे आवर घातला असता तर हा सर्वनाशाचा अनर्थच ओढवला नसता. हेच या अरिष्टामागचे खरे कारण होते. हे तिला पक्के माहीत होते. या दारुण प्रसंगात सुद्धा, तिचा निश्चय कधीही डळमळला नव्हता.
धर्माचरणानेच राज्य चालावे असे तिला अंत:करणापासून वाटे. कुरु साम्राज्याची अभिलाषा तिला कधीच नव्हती. आपल्या पतीने स्वहस्ते सर्वनाश ओढवून घेतला आहे, या दारुण प्रसंगी तो पूर्णत: उन्मळून पडला आहे. ही पूर्ण सत्यस्थिती लक्षात घेऊन, अत्यंत मार्दवाने आणि हळुवारपणे ती राजा धृतराष्ट्राचे सांत्वन करु पहात होती. एक मानी आणि करारी स्त्री म्हणून जरी ती साऱ्या जगाला परिचित होती, तरी राजा धृतराष्ट्रासाठी ती एक प्रेमळ मृदु शांत अशी पत्नी होती.
गांधारीला हे पक्के माहित होते की, अशा भयंकर प्रसंगी, तिच्या तोंडून पांडवासंबंधीची एकादी उग्र शापवाणी बाहेर पडेल. तिला वंदन करण्यासाठी जेव्हा धर्मराजा येईल, तेव्हा त्याला यापासून अपाय होईल. म्हणून मोठ्या प्रयत्नाने आपल्या मनावर संयम ठेवून तिने आपली दृष्टी खाली वळवली की ज्यामुळे तिला अभिवादन करणारे धर्मराजाचे हात तिला दिसू नयेत. असे म्हणतात की तिची अंधदृष्टीसुद्धा इतकी प्रखर आणि शक्तिशाली होती की त्यामुळे धर्मराजाच्या पायाची कातडी एका जागी भाजली गेली त्यानंतर द्रौपदीशी व पांडवांच्या राजमातेशी ती गोड शब्दात आणि कनवाळूपणे बोलली. भगवान श्रीकृष्णाशी बोलताना मात्र तिला आत्मसंयमन करण्याची जरूरी नव्हती. कोणताही आडपडदा न ठेवता तिला त्याच्याशी अगदी मोकळेपणाने बोलायचे होते. भगवान श्रीकृष्णाचा हात तिने आपल्या हातात घेतला. इतर सर्वांकडे अंतर्दृष्टी ठेवून आणि त्याचा विचार मनात आणत आपल्या अंतःकरणातील दु:ख आणि वेदना याबद्दल तिला भगवान श्रीकृष्णाला सांगावयाचे होते.
भगवान श्रीकृष्णाशी बोलताना तिच्या दुःखाचा बांध फुटला. रडत रडतच ती त्याला म्हणाली, “हे कमलनयन प्रभो! माझ्या कुलातील या विधवा स्त्रियांकडे पहा. या रणांगणात, त्यांचे पति मृत्यु पावले आहेत. आपले केस मोकळे सोडून त्या कसा विलाप करत आहेत ते ऐक. या वीरांच्या शवांमधून आपापल्या पतीचे आणि इतर मृत सेनानींचे चेहरे ओळखण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. या युद्धात त्याचे पती, वडील, मुलेबाळे, भाऊ या सर्वांचा संहार झाल्याने, ती सर्व प्रेते त्या कशी हुडकत आहेत ते निरखून पहा! ही प्रेते शोधण्यासाठी, रणभूमीवर, मुले, वीरपत्न्या आणि माता यांची गर्दी झाली आहे. नामांकित योद्धे आणि तेजस्वी वीरपुरुष म्हणून जे आयुष्य जगले त्यांची प्रेते पहा! आता, या प्रेतावरचे मांस भक्षण करण्यासाठी हिंस्त्र श्वापदे, कोल्हे, कुत्री मधेच भटकत आहेत. किती भयंकर! हे कृष्णा! हीच ती रणभूमी ना? या सर्व गोष्टींच्या निरीक्षणामुळे, हे सर्वशक्तिमान प्रभो! माझ्यात दुःखाग्नीचा डोंब उसळला आहे. हे सर्व विश्वच आता किती उजाड दिसते आहे! या महायुद्धात, कौरव आणि पांडवांच्या प्रचंड सैन्याचा सर्वनाश झाला.”
“हा प्रचंड संहार होताना, हे कृष्णा! तू त्याकडे डोळेझाक का केलीस? सर्वनाश करणारा, दुर्दैवाचा हा फेरा, तू का येऊ दिलास?” शोकविव्हल होऊन ती भगवान श्रीकृष्णाशी बोलत होती.
गांधारीचा शोकावेग संपल्यावर भगवान श्रीकृष्णाने, तिच्याकडे अत्यंत प्रेममय दृष्टीने पाहिले. सांत्वनपर स्मित करून तो म्हणाला, “ऊठ, गांधारी ऊठ! तुझा शोक आवर. तू दुःख करत राहिलीस तर ते द्विगुणित होईल. ब्राह्मण स्त्रिया, मुलांना जन्म देतात ते उग्र तप:श्चर्येला पाठवण्यासाठी. गाय, वासरांन जन्म देते, मोठेपणी वाहतुकीसाठी जड ओझी वाहून न्यायला आणि कष्टाची कामे करायला ! काबाडकष्ट आणि मजुरी करणाऱ्या स्त्रिया, समाजासाठी राबणारी पिढी तयार करतात ! राजकुलातील मुलांनी जन्मानंतर रणांगणावर केव्हा धारातीर्थी पडावयाचे हे विधिलिखितच असते !”
भगवान श्रीकृष्णाचे बोलणे रास्त होते हे गांधारीला पटले. उर्वरित आयुष्य , उग्र तपःश्चर्येत आपण व्यतीत करावयास हवे हे पण तिला कळून चुकले. या सर्व घटनांमुळे गांधारीची अंर्तज्ञानी दृष्टी अत्यंत पवित्र झाली. या जगाची नश्वरता तिला कळून चुकली. ती मग निःशब्द झाली. त्यानंतर ती राजा धृतराष्ट्र , धर्मराज आणि इतर पांडवासह, रणांगणावर मृत्यु पावलेल्या, सर्वांच्या उत्तरक्रिया , गंगाकिनारी करण्यासाठी, पुढे गेली.