Saint Kabir
तो मुसलमानांचा एक पवित्र दिवस होता. कबीरच्या काकांनी जंगी मेजवानीची तयारी केली होती आणि सर्व नातेवाईक व मित्रांना बोलावले होते. तथापि कबीरला आमंत्रण नव्हते. काकांच्या घरी मेजवानीचे आयोजन आहे आणि आपले माता पिता तिथेच गेले आहेत, याची कबीरला कल्पना नव्हती. तो आई, बाबांना शोधत शोधत काकांच्या घरी पोहोचला. तिथे त्याला दिसते की मुसलमान लोकांचा मेळावाच जमला आहे. तिथे मौलवी, काझी आणि गावातील सर्व श्रीमंत लोक जमले आहेत.
जसा कबीर घरात गेला, तसे त्याला खांबाला बांधलेले कोकरु दिसले. खांब पानाफुलांनी सजवलेला होता. कोकराच्याही गळ्यात फुलांचा हार घातला होता. त्याच्या सभोवताली बरेचसे मुसलमान पंडित काही पठण करीत होते. एकाच्या हातात तळपता सुरा होता. कोकरु रडत होते.
कबीराला क्षणात सगळी कल्पना आली. त्याला समजले की हे लोक आता ह्या कोकराचा देवासमोर बळी देणार आहेत. त्यामुळे झटक्यात पुढे होऊन तो त्या पंडितावर ओरडला, “सद्गृहस्थहो, थांबा! त्या निष्पाप कोकराला नका मारू!”
ते सर्व रागाने त्याच्यावर ओरडले, “कोण आहे हा उद्धट मुलगा?” त्यातील एक वृद्ध म्हणला, “तू शांत राहशील का? तुला ठाऊक नाही का हे अल्लासाठी आहे. तू ह्या महान संतांच्या विरुद्ध का बरे बोलतोस?”
“नाही, नाही!” कबीर उदगारला, “प्रथम मी तुम्हाला एक साधा सोपा प्रश्न विचारतो. तुम्हाला, तुमच्या घरातील महिला, मुलांना कोणी निर्माण केले? तुम्हाला ठाऊक नाही का की तो अल्लाच आहे?”
“तू अगदी मूर्खासारखे प्रश्न विचारतोस आहेस!”
“कोकराला आणि इतर जनावरांना कोणी निर्माण केले?”
“का बरे? अल्लानेच”
“तर मग तुम्ही त्याला का मारत आहात?” कबीराने विचारले. त्या मुसलमानांपैकी एक जण म्हणाला,
“परमेश्वराने हे सुंदर जग आणि त्यातील सर्व गोष्टी निर्माण केल्या. त्याने मानवाची निर्मिती करून त्याला जगात पाठवले. त्याला असे वाटले की मानवाने या जगाचा चांगला उपयोग करावा.”
“अगदी बरोबर आहे तुमचे. आपण त्यांचा चांगला उपयोग करू शकतो.” कबीर म्हणाला, “परंतु, आपण त्यांचा विध्वंस का करीत आहोत? कृपा करून कुराण आणि ईश्वराच्या प्रेषिताच्या वचनांचा लक्षपूर्वक
अभ्यास करा. गरीब कोकराला मारून तुम्हाला काय मिळणार आहे? त्याने तुम्हाला काही त्रास दिला आहे का? त्याला कृपा करून सोडून द्या.”
काही मुस्लिमांना कबीराचे चुकीचे वाटले.
एका मुस्लिमास वाद-विवाद घालायला आवडत होते. त्याने प्रश्न केला, “आपल्याला गाईपासून दूध मिळते, मग दूध पिणे योग्य आहे का?”
कबीराने उत्तर दिले. “आपली मुले जशी आईचे दूध पितात, त्याप्रमाणे, आपण प्राण्यांना माता मानून त्यांचे दूध पितो, म्हणून, आपण त्यांना मारू नये.”
जमलेले सर्वजण गप्प बसले. एकमेकांकडे बघून ते कबीराच्या हुशारीचे कौतुक करू लागले. ते सर्व चांगले लोक होते. तथापि, आत्तापर्यंत त्यांनी विचार केला नव्हता, की आपली भूक भागवण्यासाठी एखाद्या जनावराला मारणे चूक आहे. कबीराने त्यांना ‘अहिंसे’ विषयी सांगितले तेव्हा शेवटी त्यांनी कोकराला न मारण्याचा निर्णय घेतला. काहीजण चांगली मेजवानी हुकल्यामुळे निघून गेले. बिचार्या कबीराला सगळा रोष घ्यावा लागला. कबीराने विद्वान पंडितावर विजय मिळवला हे ऐकून त्याचे पालक खूप खुश झाले.
प्रश्न
- काकांच्या घरी गेल्यावर कबीराने काय पाहिले याचे वर्णन करा.
- धार्मिक पंडितांना उद्देशून त्याचे प्रथम उद्गार काय होते?
- त्यांचे काय प्रत्युत्तर होते?
- त्या मुसलमान लोकांना अहिंसेची शिकवण देण्यात कबीर यशस्वी झाला, याचे थोडक्यात वर्णन करा.