मनुष्याने संकटग्रस्त असलेल्या दुसऱ्या मनुष्यास कशी मदत करायला हवी!
एकदा एका संध्याकाळी एक अंध, वृद्ध मनुष्य, हातातील वीणा वाजवत गायन करत रस्त्याच्या कडेने चालत होता. एकेकाळी तो उत्तम गायक आणि वीणा वादक होता. परंतु आता वयोवृद्ध आणि अंध झाला होता. त्याला उदरनिर्वाहासाठी मिळणाऱ्या पैशातून त्याचे एक वेळचे कसेबसे भागत असे. अचानक रस्त्यात चालताना तो घसरून पडला. बाजूने जाणाऱ्या तीन मुलांनी धावत जाऊन त्याला उचलले व त्याची वीणाही उचलली. त्यांच्यातील एक मुलगा म्हणाला, “चला आपण ह्या आजोबांना त्यांच्या घरी घेऊन जाऊ.” दुसरा मुलगा म्हणाला, “हा जरी सर्वात सोपा मार्ग असला तरी ह्याने समस्या सुटणार नाही.”
तिसरा मुलगा म्हणाला, “आपण काहीतरी त्याग करून त्यांच्यासाठी काहीतरी खरी सेवा करूया” पहिला मुलगा म्हणाला, “आजोबा कृपया धीराने घ्या. आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू.” दुसऱ्या मुलाने वीणा घेतली आणि सूर लावून दिले. तिसरा मुलगा वीणेच्या सुरांवर सुरेल गीत गाऊ लागला. लवकरच त्यांच्याभोवती लोकं जमा झाले. मुलांचे गायन अत्यंत मधुर आणि मनाला हेलावून टाकणारे होते. जमा झालेल्या लोकांनी पहिल्या मुलाच्या कटोऱ्यात नाणी टाकली. तासाभराने जमा झालेले लोक निघून गेले. मुलांनी पैसे मोजून ते एका पाकिटात घालून त्या वयोवृद्ध मनुष्यास दिले. त्या वयोवृद्ध मनुष्यास खूप आनंद झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो त्या मुलांना म्हणाला, “माझ्या प्रिय बाळांनो, मी तुमचे आभार कसे मानू? तुम्ही तुमची नांव नाही सांगणार?”
“माझे नाव श्रद्धा आहे.”
“माझे नाव आशा आहे.”
“माझे नाव प्रेम आहे”
“आजोबा आता आम्ही तुमची रजा घेऊ का?” मुलांनी विचारलं.
त्या वयोवृद्ध मनुष्यास परिस्थितीचे आकलन झाले. त्याला त्याची चूक उमगली. त्याने त्यांच्यामधील व इतरांमधील प्रेम, श्रद्धा आणि आशा गमावली नव्हती का? ह्या मदतीने त्याला अत्यंत सुंदर धडा शिकवला!
प्रश्न
- त्या मुलांनी त्या वृद्ध मनुष्यास घरी का नेले नाही व एकदम पैशांची मदत का केली नाही?
- त्यांच्या ह्या योजनेमागील नेमका उद्देश काय होता?
- असे कोणते तीन गुण आहेत, जे प्रत्येकामध्ये असायला हवेत?
- स्रोत: मुलां साठी गोष्ट भाग २
[प्रकाशक: श्री सत्य साई बुक्स अँड पब्लिकेशन्स ट्रस्ट
प्रशांति निलयम]