परमेश्वर कर्मामागील भाव पाहतो
अब्दुल्ला मक्केच्या मशीदीमधील एका कोपऱ्यात झोपला होता. तो दोन देवदूतांच्या संभाषणाने जागा झाला. ते दोघे आशीर्वादित लोकांची यादी बनवत होते. एक देवदूत दुसऱ्याला सांगत होता की सिकंदर शहरातील, मेहबूब नावाचा एक मनुष्य ह्या पवित्र तीर्थक्षेत्री आला नसून सुद्धा तो यादीमध्ये अग्रस्थानी आहे. ते ऐकून अब्दुल्ला सिकंदर शहरात गेला व त्याने मेहबूबला शोधून काढले. तो एक चांभार होता. त्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. लोकांच्या पादत्राणांची दुरुस्ती करुन मिळणाऱ्या पैशातून दोन वेळच्या अन्नाचीही मारामार होती. त्याची उपासमार होत होती. अशा परिस्थितीतही त्याने खूप मोठा त्याग करुन तांब्याची काही नाणी जमा केली होती. आपल्या तरुण पत्नीला आश्चर्यचकित करणारी भेट देण्यासाठी, त्याने एक दिवस जमा केलेली सगळी पूंजी मिष्टान्नाची एक विशिष्ट थाळी घेण्यासाठी खर्च केली. ती भेट तो घरी घेऊन जात असताना, एका उपाशीपोटी भिकाऱ्याचे रुदन त्याच्या कानावर पडले. तो अत्यंत दुःखी असल्याचे त्याला जाणवले. त्यामुळे मेहबूब पुढे जाऊ शकला नाही.
त्याने त्याच्याजवळील महाग स्वादिष्ट पदार्थ त्याला दिले व त्याच्या बाजूला बसून त्याच्या क्लांत चेहऱ्यावर उमलेल्या समाधानाचा तो आनंद घेत होता. मेहबूबच्या ह्या कर्मामुळे त्याला आशीर्वदितांच्या यादीत अग्रस्थानी राहण्याचा मान प्राप्त झाला. ज्यांनी मक्केची तीर्थयात्रा केली होती, लक्षावधी दिनार दानधर्मासाठी खर्च केले होते त्यांनासुध्दा हे स्थान प्राप्त होऊ शकले नाही. परमेश्वर कर्मामागील भाव पाहतो, डामडौल वा दिखावा नाही.
प्रश्न-
- मशीदीमध्ये झोपलेल्या अब्दुल्लाने एक दिवशी काय ऐकले?
- त्याला सिकंदर शहरातील मेहबूबविषयी काय माहित झाले?
- मेहबूबच्या कोणत्या कर्मामुळे त्याला आशीर्वदितांच्या यादीत अग्रक्रमाचा मान मिळाला?
स्त्रोत – Stories for children-II
प्रकाशक- SSSBPT Prashanti Nilayam