राजा कोण आहे?
अलेक्झांडर द ग्रेट हा एकदा अतिशय उष्ण हवामानाच्या आफ्रिका खंडात गेला होता. तो आणि त्याचे सैनिक रहायला एखाद्या चांगल्या जागेच्या, कमीत कमी एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीच्या शोधात होते. एक रेडइंडियन सैनिक त्यांना त्यांच्याकडे धावत येताना दिसला. त्याने त्या सैनिकाना त्याच्या मागे येण्यास सांगितले. तो त्यांना घेऊन त्यांच्या प्रमुखाकडे गेला. तो टोळीचा नायक अतिशय काळा आणि कुरूप होता. त्याने सगळ्यांचे स्वागत केले आणि तो म्हणाला-“जवळच एक केळीचे बन आहे. तुम्ही सर्वजण तेथे जाऊन आराम करा. माझे लोक तुमची सर्व व्यवस्था करतील.”
दुसऱ्या दिवशी टोळीच्या प्रमुखाने अलेक्झांडरच्या सन्मानासाठी मेजवानी दिली. त्याने सम्राटासमोर एका सोन्याच्या थाळीत सोन्याची फळे ठेवली आणि तो म्हणाला “राजा ती खाऊन बघावीत.” अलेक्झांडर मोठ्या आश्रयाने म्हणाला “तुम्ही इथे सोन्याची फळे खाता का?”
“नाही, आम्ही तर झाडांची ताजी फळे, दूध, मध, फुले आणि धान्य खातो. पण तू मोठा विजेता असल्याने तुला केवळ सोने मिळ्वण्यातच गोडी आहे त्यामुळे आम्ही तुला ती दिली आहेत. आम्हाला वाटले की तू फक्त सोनेच खात असणार!”
त्या टोळीप्रमुखाचे बोलणे किती अर्थपूर्ण होते ते अलेक्झांडरला समजले. तो म्हणाला- “महाशय, मी येथे सोने गोळा करायला आली नाही तर माणसे निसर्ग व कर्मे यांच्याबद्दल काही शिकायला आलो आहे.”
“असे असेल तर ठीकच आहे. आपण शांतपणे येथे राहू शकता. आपल्या वास्तव्याने आम्हाला आनंदच होईल.” टोळी प्रमुख म्हणाला, थोड्याच वेळात दोन माणसांना त्या प्रमुखासमोर आणण्यात आले. त्यांचा गंभीरपणे वादविवाद चालला होता. प्रमुख म्हणाला- “काय चाललं आहे?”
“महाराज, या माणसाला मी नुकतीच जमीन विकली. काल तो शेतात नांगरत असतांना त्याला खजिना सापडला. तो त्याने माझ्याकडे आणला आणि म्हणाला मी केवळ जमीन विकत घेतली आहे, खजिना नाही. मी त्या म्हणालो की जी जमिन मी विकली त्याचाच हा खजिना म्हणजे एक भाग आहे. कृपा करून मला न्याय द्या.” त्यातील एक माणूस म्हणाला, दुसरा मनुष्य म्हणाला- “अजिबात नाही! जे माझ्या मालकीचे नाही ते मी कसे घेऊ त्याचा खजिना त्यालाच मिळेल असे पहा!”
तो प्रमुख काय न्याय देतो हे बघायला अलेक्झांडर उत्सुक होता. तो प्रमुख म्हणाला- “मित्रांनो इकडे लक्ष द्या, तुमच्यापैकी एकाला मुलगी आणि एकाला मुलगा आहे. तुझ्या मुलीचे त्याच्या मुलाशी लग्न का लावून देत नाही? मग तो खजिना तू तिला लग्नाचा हुंडा म्हणून देऊ शकशील.”
त्या दोन माणसांना अतिशय आनंद झाला. प्रमुखाच्या इच्छेनुसार वागण्याचे त्यांनी शपथ घेतली आणि ते तेथून निघून गेले.
काही वेळानंतर प्रमुखाने अलेक्झांडरला विचारले की, अशा वेळी राज म्हणून त्याने काय केले असते? अलेक्झांडर म्हणाला- “आमच्या देशात राजा धनाचा ताबा घेतो आणि फिर्यादीलाच तुंरुगात टाकून गप्प बसवतो.”
किती क्रूरपणा हा! किती दुष्टपणा! आपल्या प्रजेच्या संपत्तीवर हक्क सांगण्याचा राजाला काय अधिकार? तो राजा नसून लुटारुच आहे. राजाने त्याच्या प्रजेला सुखी ठेवले पाहिजे. प्रजेला त्रास देता कामा नये.
प्रश्न
- आफ्रिकन प्रमुखाने सोन्याची फळे का अर्पण केली?
- प्रमुखासमोर आणलेला खटला कशासंबंधी होता?
- खटल्याचा निर्णय काय दिला गेला?
- अलेक्झांडर काय म्हणाला?
- खरा राजा कोण असतो?
[Source- Stories for Children – II
Published by- Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]