योगक्षेमं वहाम्यहम्
आदरणीय महाराजांच्या उपस्थितीत एक विद्वान् पंडितभगवद्गीतेवर प्रवचन करीत होते. एक दिवस वरील श्लोकाचे विवरण सुरु झाले.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥
ते विद्वान या श्लोकाचे विवरण अनेक प्रकारांनी मोठ्या उत्साहाने करीत होते. पण महाराज मान हलवीत म्हणाले “हा अर्थ बरोबर नाही.” पंडिताने दिलेल्या प्रत्येक अर्थाच्या दुरुस्तीसाठी ते वादविवाद करु लागले. अनेक राजांच्या दरबारात त्या बिचाऱ्या पंडिताने अनेक मानसन्मान मिळवले होते आणि अनेक सन्मानाच्या पदव्या मिळवल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावर हा जणू आघातच होता, तेव्हा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या श्लोकाचे स्पष्टीकरण चुकीचे आहे असे सांगितले तेव्हा त्याला तो मोठा अपमान वाटला. पण तरीही धीर धरुन आपले सर्व ‘पांडित्य पणाला लावून त्या शब्दाचे- योग व क्षेम- विविध अर्थ सांगण्यास सुरुवात केली. पण महाराजांना तेही पटले नाही. त्यांनी आज्ञा दिली “या श्लोकाचा अर्थ नीट शोधून आणि नीट समजावून घेऊन मगच उद्या या.” असे बोलून महाराज सिंहासनावरून उठले आणि अंतःपुरात निघून गेले.
पंडिताचा उरलासुरला धीरही संपला होता. त्याच्यामध्ये खळबळ माजली होती. तो अपमानाने थरथरत होता. तो घरी आला, गीतेचे पुस्तक फेकून दिले आणि तो पलंगावर पडला.
आर्श्वचकित होऊन पंडिताची पत्नी म्हणाली “मला सांगा, की आज राजवाड्यातून दुःखी होऊन तुम्ही का परतला आहात? तिथे काही झाले का? एकामागून एक प्रश्न ती विचारु लागली त्यामुळे काय घडले ते त्याला सांगावेच लागले. त्याचा झालेला अपमान, महाराजांनी त्यास घरी जाण्याची केलेली आज्ञा इत्यादी सर्व त्याने सांगितले. घडलेला वृत्तांत बायको शांतपणे ऐकत होती. त्यावर बराच विचार करुन ती म्हणाली- “बरोबर आहे! महाराज जे काही म्हणाले ते खरं आहे. श्लोकाचे तुम्ही दिलेले स्पष्टीकरण बरोबर नाही. त्यामुळे महाराजांना ते कसे पटेल? दोष तुमचाच आहे!” यावर रागाने पंडित पलंगावरुन उठला, शेपटीवर पाय दिलेल्या नागाप्रमाणे तो चिडला होता. तो म्हणाला- “मूर्ख बाई, तुला काय कळतय्? माझ्यापेक्षा तुझी अक्कल जास्त आहे काय?” घरात बसून
दिवसभर स्वयंपाकपाणी आणि शिवणटिपण करत बसणाऱ्या तुला माझ्यापेक्षा जास्त समजतय का? तोंड बंद कर आणि माझ्यासमोरून चालती हो! पण ती स्त्री शांतपणे म्हणाली- “स्वामी जे सत्य आहे ते विधान न मानता तुम्ही उगीचच का रागावता आहेत? तो श्लोक पुन्हा एकदा म्हणा आणि त्यावर पुन्हा विचार करा. तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच त्याचे खरे उत्तर मिळेल.” तिच्या त्या मृदू शब्दांनी तिचा नवरा थोडा शांत झाला.
पंडिताने त्या श्लोकातील प्रत्येक शब्दाच्या अर्थाच्या पृथक्करण करून बघितले. ‘अनन्याश्चिन्तयन्तो माम्’ त्याने अगदी सावकाशपणे पुन्हापुन्हा मोठ्याने ते शब्द उच्चरून अर्थ लावला. पत्नी मध्येच त्याला थांबवित म्हणाली- शब्दांचा नुसता अर्थ लावण्यात काय फायदा आहे? तुम्ही महाराजांकडे गेलात तेव्हा तुमच्या मनात काय हेतू होता? कोणत्या उद्देशाने तुम्ही गेलात?” त्यावर पंडित रागाने उसळला- “कमला है घर, कुटुंब चालवायचे आहे ना? अन्न, पाणी, वस्त्र आणखी इतर गोष्टी तुझ्यासाठी आणि इतरांसाठी कोठून आणू? त्यासाठीच तर मी त्यांच्याकडे गेलो होतो ना? नाहीतर मला तेथे जाऊन काय करायचे होते?
पत्नीने उत्तर दिले- “या श्लोकात श्रीकृष्णाने काय सांगितले आहे हे जर तुम्ही लक्षात घेतले असते तर महाराजांकडे जायची जरुरीच पहली नसती. जर दुसरा कोणताही विचार मनात न आणता ईश्वराची भक्ती केली, त्याला समर्पित झाले, सतत त्याच्यावरच मन केंद्रित केले तर ईश्वर भक्तासाठी सर्व काही पुरवतो असे भगवंताने या श्लोकात सांगितले आहे. या तिन्हीपैकी तुम्ही काहीच न करता महाराजच सर्व काही पुरवतील या विचाराने तुम्ही महाराजांकडे गेलात! म्हणजेच या श्लोकाचा बरोबर विरुद्ध अर्थ तुम्ही लावलात. म्हणूनच महाराजांनी तुमचा अर्थ स्वीकारला नाही.
हे ऐकल्यावर तो मान्यवर विद्वान् बसून विचार करु लागला. त्याला त्याची चूक समजली. दुसऱ्या दिवशी तो दरबारात गेलाच नाही. त्याऐवजी घरीच कृष्णाच्या पूजेत तल्लीन झाला. जेव्हा महाराजांनी तो पंडित का आला नाही अशी विचारणा केली तेव्हा दरबारातल्या लोकांनी सांगितले की तो घरीच असून तो येणार नाही. महाराजांनी दूत पाठवला. पंडिताने येण्यास नकार दिला. तो म्हणाला- “मला दुसरीकडे कुठेही जायची जरुरी नाही. माझा कृष्ण मला सर्व काही पुरवीला. तो स्वतःच माझा योगक्षेम चालवील, हे मला समजले नाही म्हणून मला अपमान सहन करावा लागला. अनेक अर्थ सांगण्याच्या नादात मी जणू आंधळा झालो होतो. त्या ईश्वराला समर्पणभावनेने त्याच्या पूजेत मी मग्न झालो तर माझ्या गरजेच्या वस्तू तो स्वतः मला पुरवीला.
जेव्हा दूताने तो निरोप राजवाड्यात महाराजांना पोहोचवला तेव्हा महाराज स्वतः चालत पंडिताच्या घरी आले. ते पंडिताच्या पाया पडून म्हणाले- “काल विवरण केलेल्या श्लोकाचा अर्थ तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगितला त्याबद्दल मी तुमचा अतिशय आभारी आहे.” अशा रीतीने महाराजांनी पंडिताला शिकवण दिली की आध्यात्मिक गोष्टींचा विचार हा जर अनुभवातून आलेला नसेल तर तो केवळ देखावा ठरतो.
प्रश्न :
- कुठल्या पुस्तकात हा श्लोक आहे?
- या श्लोकाचा अर्थ काय आहे?
- पंडिताच्या स्पष्टीकरणावर राजाचे समाधान का झाले नाही?
- अखेरीस राजाचे समाधान कसे झाले?
[Source- Stories for Children-II
Published by- Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]