संतुष्टः सततं – पुढील वाचन
संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः
(अध्याय- १२, श्लोक – १४ )
जो योगी नेहमी संतुष्ट असतो, माझी निरंतर भक्ती करतो, जो आत्मसंयमी आहे, ज्याने दृढ निश्चयाने, त्याचे मन आणि बुध्दी माझ्यावर स्थिर ठेवली आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. जो आनंदाने जीवन जगतो, ज्याची परमेश्वरच्या सर्वसाक्षीत्वावर व प्रेमावर दृढ श्रध्दा आहे. स्थिर मनाने आणि दृष्टीने अखिल सृष्टीमधील सृष्टीकर्त्यास तो जाणतो. परमेश्वर कृपेने जे जे समोर येते त्यात तो समाधानी असतो. तो कोणाचाही द्वेष करत नाही तो कोणालाही हीन लेखत नाही. कोणालाही’ दुखावत नाही. इतरांची त्यांच्याशी कशीही वागणूक असो, तो सदैव सर्वांप्रती करुणामय असतो. काहीही झाले तरी धर्ममार्ग अनुसरण्याच्या त्याच्या संकल्पाविषयी तो दृढ निश्चयी असतो. त्याचे त्याच्या विचार, उच्चार आणि आचार ह्यावर नियंत्रण असते. अत्यंत उत्तेजक परिस्थितीतही तो आत्मसंयम ढळू देत नाही. खालील कथेमधून हे दर्शविले आहे.
एक संत त्यांच्या शिष्यांबरोबर जात होते. वाटेत त्यांना एक मनुष्य भेटला. त्याने त्यांच्या शिष्यावर चुकीचे आरोप करून त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिष्याने थोडावेळ शांतपणे ते ऐकून घेतले पण नंतर त्याचा संयम सुटला व त्यानेही त्या मनुष्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोघं एकमेकांचा अपमान करत असल्याचे पाहून संत तेथून निघून पुढे चालू लागले. थोड्या वेळाने शिष्याने त्यांना गाठले आणि विचारले, “त्या दुष्ट मनुष्याबरोबर मला एकट्याला सोडून तुम्ही का गेलात? “संत म्हणाले, “तू एकटा कोठे होतास? तू अपशब्दांच्या संगतीत होतास ना? तू जोपर्यंत एकटा होतास तोपर्यंत मी तुझ्याबरोबर होतो. तुझ्याबरोबर देवदेवता असल्याचेही मी पाहिले. परंतु तूही जेव्हा अपशब्द उच्चारु लागलास तेव्हा त्यांनी तुझी साथ सोडली आणि मी ही सोडली.”