लोभ
लोभीपणा हा कोणालाही सुख मिळू देत नाही. कंजुष मनुष्य आपल्या संपत्तीचा स्वतःहि उपभोग घेत नाही आणि दुसऱ्यालाहि तिचा उपयोग करु देत नाही. आपले वैभव कमी होईल किंवा आपल्या संपत्तीचा नाश होईल या भयाने तो सतत मागे पाऊल घेत असतो.
याबाबतीतील एक गोष्ट आहे. कंजुष आणि महाकंजुष या नावाचे दोघे भाऊ होते. त्यांच्या नावाप्रमाणेच ते इतके चिक्कू होते की ते पोटभर जेवतही नसत. आपली ऐहिक भरभराट व्हावी म्हणून ते देवाची प्रार्थना करायचे. पण देवाला नैवेद्य मात्र दाखवायचे नाहीत. केवळ देवाकडे एक वरवरचा ओझरता दृष्टीक्षेप टाकून एका क्षणात स्वतःच ते खाऊन टाकायचे. जर खडीसाखर नैवेद्यासाठी देवापुढे बराच वेळ ठेवली तर त्यांची मौल्यवान् खडीसाखर मुंग्या खाऊन टाकतील अशी त्यांना भीती वाटायची.
एक दिवस त्यांचा जवळचा नातेवाईक मृत्यु पावल्याचे त्यांना समजले. त्या दुःखी कुटुंबाचे सान्त्वन करण्यासाठी तेथे प्रत्यक्ष जाण्याचे महाकंजुषाने ठरवले. म्हणून तो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला आणि पायी निघाला. बस किंवा ओझे नको म्हणून रात्री लगेचच काही तो गेला नाही. महाकंजूष निघून गेल्यावर कंजुषाने दिवा उचलून तो खिडकीच्या चौकटीच्या अकडीला अडकवून ठेवला. एवढ्या वेळापर्यंत महाकंजूष २ मैल चालून गेला होता. पण तो पुनः माघारी आला. कंजुषाने त्याला परत येण्याचे कारण विचारता तो म्हणाला- “अरे भाऊ! मी गेल्यावर तू दिवा विझवलास की नाही याची मला चिंता वाटत होती म्हणून तुला आठवण करण्यासाठी मी परत आलो.” त्याचे येण्याचे कष्ट लक्षात न घेताच कंजुष दुःखाने म्हणाला “अरेरे दादा! तेल वाया जाऊ नये म्हणून तू घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत. पण त्या परत येण्यापाई तु तुझ्या पायातल्या जोड्यांची किती अनावश्यक झीज केलीस!”
महाकंजुष म्हणाला– “माझ्या प्रिय बंधो! काळजी करूनकोस. मी जोडे हातात घेऊन अनवाणी पायाने गेलो होतो.”
प्रश्न
- ते भाऊ परमेश्वराप्रती देखील कंजुष कसे काय होते?
- ते भाऊ घरामध्ये कसा कंजुषपणा करत असत त्याचे वर्णन करा.
- महा कंजुष व्यक्तीने काय केले? महा कंजुष व्यक्तीची योजना काय होती?