गर्व
एकदा दानवांशी झालेल्या युद्धात देवांचा विजय झाला. खरं तर ब्रह्मदेवांनी केलेल्या मदतीचा तो परिणाम होता. परंतु अजाणता त्यांनी त्याचे श्रेय स्वतःकडे घेतले आणि त्याचा त्यांना गर्व झाला. त्यांनी विचार केला, “नक्कीच, हा विजय आपला आहे आणि गौरवसुद्धा.”
ब्रह्माला हे सर्व लक्षात आले. त्यांना त्यांच्या मर्यादा कळाव्या या उद्देशाने ब्रह्माने त्यांना धडा शिकवायचे ठरवले. जेव्हा ते देव आनंदोत्सव साजरा करीत होते, तेव्हा ब्रह्मा मधेच तेथे प्रगट झाले. तथापि देवांच्या डोळ्यांवर अहंकाराची आणि पोकळ बढायांची झापडे असल्याने त्यांनी ब्रह्माला ओळखलेच नाही. कोणीतरी चमत्कारिक व्यक्ती आपल्यामध्ये आली आहे, पण ती कोण हे ते ओळखू शकले नाहीत. ती व्यक्ती कोण हे जाणून घेण्याचा त्यांनी विचार केला. त्यासाठी अग्निदेवांवर ती कामगिरी सोपवली.
अग्निदेव त्या चमत्कारिक व्यक्तीजवळ गेले. ब्रह्माने विचारले, “तू कोण आहेस?”
“कोण? मी विख्यात अग्नी! सर्वत्र माझी ख्याती आहे.”
“जर तुझे नांव आणि ख्याती इतकी आहे तर तुझी शक्ती काय हे मला कळेल का?”
“ठीक. या पृथ्वीवरील, आकाशातील तसेच सप्तलोकांतील कोणतीही गोष्ट मी जाळू शकतो.”
ब्रह्माने त्याच्यासमोर एक सुकलेले गवताचे पाते ठेवले, आणि म्हणाले, “शूर वीरा, मला हे जाळून दाखव बरं.”
अग्निने त्यांच्या सर्व शक्तीने ते जाळायचा प्रयत्न केला. परंतु ते यत्किंचितही जळले नाही. तो शरमिंदा होऊन देवांजवळ परत गेला आणि ती चमत्कारिक व्यक्ती कोण हे समजून घेण्यास आपण असमर्थ आहोत हे कबूल केले.
अग्नीचे प्रयत्न असफल करणारी ती व्यक्ती कोण आहे, हे पाहण्यासाठी वायुदेवांना विनंती करण्यात आली. वायुदेवांना आत्मविश्वास होता की आपण यशस्वी होऊ.
ब्रह्माजवळ गेल्यावर, ब्रह्मानी त्यांना प्रश्न केला, “तू कोण आहेस?”
“मी प्रख्यात वायुदेव. सगळे आकाश झाडले जाते असा देव म्हणून मला ओळखले जाते.”
ब्रह्माने नंतर विचारणा केली, “तुझ्या शक्ती कोणत्या बरे?”
वायू म्हणाला, “पृथ्वीवर असलेले सर्व एका क्षणात मी हलवू शकतो.”
ठीक आहे, असे म्हणून ब्रह्माने त्याच्यासमोर एक नळी ठेवून ती उडवण्यास सांगितले.
वायूने खूप प्रयत्न करुनही ती तसूभरही हलली नाही.
वायूनेही त्याच्या मित्रांना त्याची असमर्थता कबूल केली.
त्यानंतर त्यांनी त्यांचा राजा इंद्रदेवांना विनंती केली.
“महाराज, आपल्या दोन मित्रांना अयशस्वी करणारी विक्षिप्त व्यक्ती कोण हे तुम्ही जाणून घेता का?”
देवांचे सर्वशक्तिमान राजे, इंद्रदेव कबूल झाले. ते त्याच्याजवळ गेले. परंतु इंद्र पोहोचेपर्यंत ब्रह्मा अदृश्य होऊन तिथे एक अतिशय सुंदर स्त्री उभी राहिली. ती आध्यात्मिक ज्ञानाची देवता उमा होती. ती सुवर्ण अलंकारांनी सजली होती.
इंद्राने धिटाईने तिला विचारले, “तू इथे उभी आहेस, तिथे ती मजेशीर व्यक्ती कोण होती?”
उमा म्हणाली, “हे मूढमती, ते ब्रह्मा होते. त्यांनी तुम्हाला विजय प्राप्त करून दिला. दानवांवर विजय मिळवून दिला. तुम्हाला ज्यांनी विजय मिळवून दिला, त्यांचा अभिमान बाळगा.”
इंद्राला जेव्हा ब्रह्माविषयी कळले, तेव्हा त्याने त्याच्या सर्व मित्रांना सत्य सांगितले. त्यांना त्यांची चूक कळली. त्यांनी सर्वोच्च परमात्म्याचे गुणगान गायले.
प्रश्न-
- देवांना का गर्व झाला होता?
- अग्नीची कशी फजिती झाली?
- वायूला गवताचे पाते का हलवता आले नाही?
- उमाने इंद्राला काय शिकवण दिली?
- या गोष्टीतून काय मूल्य शिकलात?