विश्वामित्र
विश्वामित्र हे एक महान साधू होते. त्यांच्याविषयी आपण महाकाव्ये, पुराणांमधून वाचले आहे. परंतु त्यांच्या मत्सर आणि रागिट स्वभावामुळे त्यांनी खडतर तपाने मिळवलेल्या शक्ती ते गमावत असत. जेव्हा ते राजा होते, तेव्हा त्याना वसिष्ठ मुनींचा मत्सर वाटत असे कारण त्यांच्याजवळ एक दिव्य गाय होती, जी इच्छापूर्ती करत असे. त्यानंतर जेव्हा ते ऋषि झाले, तेव्हा पुन्हा एकदा त्यांना वसिष्ठ ऋषींचा राग आला. याचे कारण असे, की देव आणि मानव वसिष्ठ मुनींना ब्रह्मर्षि असे संबोधत आणि जन्मभराच्या तपश्चर्येनंतरही विश्वामित्रांना राजर्षि असे संबोधत.
एका पौर्णिमेच्या रात्री ते वसिष्ठ मुनींच्या आश्रमात गेले. परंतु ते आश्रमात दिसले नाहीत. विश्वामित्रांनी त्यांना खूप शोधले, शेवटी त्यांना वसिष्ठ मुनी त्यांच्या पत्नी अरुंधतीसोबत बसलेले दिसले. विश्वामित्र एका झाडामागे हातात सुरा घेऊन लपले. त्यांना त्या दोघांचा संवाद व्यवस्थित ऐकू येत होता. अरुंधती म्हणाल्या, “पूज्य पतिदेव, आजची रात्र थंड, प्रसन्न आणि किती शांत वाटते आहे!” वसिष्ठ मुनी म्हणाले, “होय, खरे आहे. ही प्रसन्नता प्रिय विश्वामित्रांच्या साधनेचा परिणाम आहे.”
विश्वामित्र तिथे उभे राहू शकले नाहीत. त्यांनी धावत जाऊन वसिष्ठ मुनींचे पाय धरले. ते वसिष्ठ मुनींना मारण्यासाठी आले होते. आणि ते काय ऐकत होते? त्यांना अतिशय पश्चाताप झाला. वसिष्ठ मुनींनी त्यांना प्रेमाने खांदे धरुन जवळ घेतले.”उठा ब्रह्मर्षि!” अशाप्रकारे विश्वामित्रांची इच्छा पूर्ण झाली. त्यांनी राग आणि मत्सर दूर सारल्यावरच त्यांना ब्रह्मर्षिची पदवी मिळाली.
प्रश्न:
- विश्वामित्र राजा असताना वसिष्ठांचा मत्सर का वाटत असे?
- ते तपःशक्ती कशी गमावत असत?
- त्यांच्यात परिवर्तन कसे झाले?
- त्यांना ब्रह्मर्षि पद कधी प्राप्त झाले?