चांगला शेजारी
तुम्हाला असे कोणी माहीत आहे का ज्यांचा रंग तुमच्यापेक्षा वेगळा आहे? काही ठिकाणी बहुतेक लोक काळे किंवा सावळे असतात. काही देश असे आहेत जिथे बहुतेक सर्व गोरे असतात. त्यांचा जन्म तशाप्रकारे होतो.
इतरांपेक्षा रंगाने वेगळे असल्यास तुम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ होता का? गोऱ्या रंगाच्या माणसाने असे समजावे का की तो काळ्या रंगाच्या व्यक्तींपेक्षा श्रेष्ठ आहे? तुम्हाला काय वाटते?
आपण थोर (शिक्षक), येशु ख्रिसतास अनुसरले, तर आपण सर्वांवर दया करू. ती व्यक्ती कोणत्या देशाची आहे अथवा तिचा वर्ण काय आहे, याने काही फरक पडत नाही. सर्व प्रकारच्या लोकांवर प्रेम करावे, हेच येशूने शिकवले.
एक दिवस येशूकडे एक ज्यू मोठा कठीण प्रश्न घेऊन आला. त्याला वाटले, येशूला उत्तर देता येणार नाही. तो म्हणाला, “मी अनंत काल जगण्यासाठी काय करायला हवे?”
त्या थोर शिक्षकासाठी हा अगदी सोपा प्रश्न होता. परंतु येशूने स्वतःच त्याचे उत्तर देण्याऐवजी त्यालाच प्रश्न विचारला, “परमेश्वराचा कायदा, आपण काय करावे असे सांगतो?” तो माणूस म्हणाला, “प्रभूचा कायदा सांगतो की तुमचा प्रभू जिनोवावर तुम्ही हृदयापासून प्रेम करावे आणि तुमच्या शेजाऱ्यावर तुम्ही स्वतः आहात असे मानून प्रेम करावे.”
येशू म्हणाला, “अगदी बरोबर! हेच करत रहा आणि तुम्हाला शाश्वत जीवनप्राप्ती होईल.”
परंतु त्या माणसाला सर्वांवर प्रेम करणे मान्य नव्हते. म्हणून तो पळवाट काढत होता. त्याने येशूला विचारले, “नक्की माझा शेजारी कोण ? काय बरे सांगणार तुम्ही?”
कोण बरे तुमचा खरा शेजारी?
त्याला असे वाटत होते की येशूने म्हणावे, “तुमचे शेजारी तुमचे मित्र.”
तर मग इतर लोक कोण आहेत? ते सुद्धा आपले शेजारी का?
या प्रश्नाचे उत्तर म्हणून येशूने एक गोष्ट सांगितली. गोष्ट एक ज्यू आणि एक सुमेरियन (भला माणूस) यांची होती. गोष्ट अशी:
एक माणूस जेरुसलेम शहराहून जेरिकोला चालत जात होता. हा माणूस धर्माने ज्यू होता. रस्त्याने चालत असता लुटारूंनी त्याला अडवले. त्यांनी त्याला मारहाण करुन, त्याचे कपडे आणि पैसे घेतले. त्याला अर्धमेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला टाकून ते पसार झाले.
एक धर्मगुरु तिथून जात होते, त्यांनी रस्ता बदलला, ते थांबलेही नाहीत. त्या माणसाला वाचवण्याचे त्यांनी जराही कष्ट घेतले नाहीत.
त्यानंतर त्या दिशेने एक अतिशय धार्मिक माणूस जात होता. जेरुसलेमच्या मंदिरात सेवा करणारा तो एक लेवीट होता. तो थांबतो का मदत करायला? त्या धर्मगुरुप्रमाणेच तोही तिथून निघून गेला. त्याने जराही मदतीचा हात पुढे केला नाही. हे असे वागणे योग्य आहे का?
शेवटी एक सुमेरियन (भला माणूस) तिथून चालला होता. त्याने पाहिले एक ज्यू अतिशय जख्मी अवस्थेत
रस्त्यात पडला आहे. खरे तर सुमेरियन आणि ज्यू एकमेकांचे वैरी होते. परंतु ह्या सुमेरियनने त्याला मदत केली नाही का? तो मनाशी म्हणाला असेल का, “मी ह्या ज्यूला का मदत करावी? मी जख्मी झालो तर तो काही मला मदत करणार नाही.”
तथापि, हा सुमेरियन त्याच्या जवळ गेला. त्याला त्याची दया आली. त्याला तेथेच जख्मी अवस्थेत सोडून तो काही पुढे जाऊ शकला नाही. तो घोड्यावरुन (सवारी) उतरला. त्याने त्याच्या जखमांना मलमपट्टी करण्यास सुरुवात केली. प्रथम तेल आणि वाइन जखमांवर ओतले. यामुळे जखम भरुन निघण्यास मदत होते. त्यानंतर त्याने जखमा फडक्याने बांधल्या.
त्यानंतर त्याने त्या जखमी माणसाला अलगदपणे आपल्या सवारीवर बसवले. त्याला सांभाळत तो एका हॉटेलपाशी आला. हॉटेलात त्याने एक खोली घेऊन जखमी माणसाची सेवा केली.
आता, येशू ज्या माणसाला गोष्ट सांगत होता, त्याला येशूने प्रश्न विचारला, या तिघांपैकी कोण चांगला शेजारी आहे, असे तुला वाटते? काय बरे उत्तर देशील? धर्मगुरु, लेवीट की सुमेरियन?
तो माणूस उत्तरला, “सुमेरियन एक चांगला शेजारी होता.” त्याने थांबून जखमी माणसाची सेवा केली.
येशू म्हणाला, “अगदी बरोबर! तर मग आता यापुढे असेच वागायचा प्रयत्न कर.”- [Luke 10: 25-37]
छान होती नं गोष्ट? यावरुन आपले शेजारी कोण ही गोष्ट स्पष्ट होते. केवळ जवळचे मित्रच काही आपले शेजारी नव्हेत. आपले शेजारी म्हणजे केवळ आपले देशवासी किंवा आपल्या वर्णाचे लोक नव्हेत. सर्व प्रकारचे लोक आपले शेजारी आहेत.
म्हणूनच, एखादा जखमी माणूस पाहिला तर तुम्ही काय कराल? ती व्यक्ती दुसऱ्या देशाची अथवा त्याचा वर्ण वेगळा असला तर काय कराल?
तरीही तो तुमचा शेजारी आहे म्हणून तुम्ही त्याला मदत करायला हवी. तुमची मदत खूप कमी वाटत असेल, तर तुम्ही मला मदतीसाठी बोलवू शकता. अथवा पोलीस किंवा शाळेच्या शिक्षकाला बोलवू शकता. हे सुमेरियन माणसासारखे होईल.
थोर शिक्षकाला आपण दयाळू असावे असे वाटते. त्याला वाटते आपण इतरांना मदत करावी, मग तो समोरचा कोणीही असो. म्हणूनच त्याने एका चांगल्या शेजाऱ्याची गोष्ट सांगितली.
प्रश्न:
- ज्यूने काय प्रश्न विचारला?
- देवाचा कायदा काय आहे?
- ज्यूला काय झाले?
- धर्मगुरु वागले ते बरोबर आहे का? लेविटने योग्य केले का? तुम्हाला काय वाटते?
- चांगला शेजारी कोण असतो?
- चांगला शेजारी का म्हटले आहे?
[स्त्रोत- मुलांसाठी गोष्टी – II
प्रकाशक- श्री सत्यसाईं बुक्स अँड पब्लिकेशन ट्रस्ट, प्रशांती निलयम]