हरवला आणि सापडला
फादर लेव्ही आनंदीगृहस्थ होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आता एक मोठे शेत शेत खरेदी केले होते. ते धनवान असून त्यांना दोन मुले होती. ते मुलांच्या लग्नाच्या खटपटीत होते. मुलांनी आता स्थिर व्हावे असे त्यांना वाटत होते.
पण त्यांचा आनंद जास्त टिकायचा नव्हता. मोठा मुलगा अगदी समाधानी होता. तो शेतात खूप कष्ट करीत असे. पण धाकटा मुलगा मात्र चंचल आणि आळशी होता. त्याला त्या नीरस शेतकामाचा फार कंटाळा यायचा. कारण तिथे कधी थरारक घटना घडायच्याच नाहीत. त्याला मोठ्या शहरांच्या झगझगाटात जायला आवडायचे. तिथे सर्व गोष्टी उत्कंठा वाढविणाऱ्या असायच्या. त्याच्या मते तो तिथे सुखी झाला असता. एक दिवस त्याने निश्चयच केला कारण त्या भयाण शेतात आता तो थांबूच शकत नव्हता. तो त्याच्या वडिलांकडे गेला- “बाबा” तो म्हणाला. “तुमच्या इस्टेटीतला माझा वाटा द्या. मला तो आताच हवा आहे. मी घर सोडून दूर निघून जात आहे.”
हे ऐकून फादर लेव्हींना खूप वाईट वाटले. पैशाने त्या तरूण सायमनला सुख मिळणार नाही हे त्यांना माहिती होते पण त्यांचे आपल्या मुलावर इतके प्रेम होते की, ते त्याला घरी राहण्याची जबरदस्ती करू शकले नाहीत. शिवाय सायमननेही त्याच्या आयुष्यात स्वतःच जगायला शिकले पाहिजे. अतिशय प्रेमळ आणि हुशार अशा फादर लेव्हींनी त्याला आडवले नाही.
फादर लेव्हींनी आपल्या मेंढ्या, गुरे आणि जमीन यापैंकी काही भाग विकला. कायद्याप्रमाणे आपल्या मेंढ्या, गुरे आणि जमीन यापैंकी काही भाग विकला. कायद्याप्रमाणे सायमनच्या वाट्याला जेवढे काय येऊ शकेल त्यानुसार त्यांनी आपल्या मालमत्तेपैकी एक तृतियांश भाग विकला. नंतर त्यांनी पैशाची थैली सायमनला दिली.
आपला मुलगा लांबवर दिसेनासा होईपर्यंत फादर लेव्ही बघत होते. मुलगा दूर गेल्याने त्यांना वाईटही वाटत होते. पण तो परत येईपर्यंत वाट पाहणेच त्यांच्या हातात होते.
शेतातून सुटका झाल्यामुळे सायमनला खूप आनंद झाला होता. आता त्याच्याकडे खचयला खूप पैसे होते. आता मेजवान्या, गाणी- बजावणी, उपभोग यात आयुष्य घालवता येणार होते. त्याप्रमाणेच त्याने वडिलांनी कष्टाने मिळवलेला पैसा घालवला पण त्याला काळजी वाटत नव्हती. आतापर्यंत त्याने मित्रांसाठी पैसा खर्च केला होता. आता ते मित्रच त्याच्यासाठी करतील असे त्याला वाटत होते. त्याने मदतीसाठी त्यांच्याकडे विनवणी केली तेव्हा त्यांनी पाठ फिरवली. त्याच्यासाठी काही करायची त्यांची इच्छा नव्हती. हे पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. त्याचे सर्व पैसे तो गमावून बसला होता. त्याबरोबर मित्रही! त्याने आपले चांगले कपडेही विकून टाकले. आता त्याच्याजवळ काहीही शिल्लक नव्हते, सायमनला खूप दुःख झाले. जिथे कोणीही त्याची माणसे नव्हती तिथे तो रस्त्यातून भटकत होता. त्याला मदतीसाठी ज्याच्याकडे जाता येईल असे तिथे कोणीही नव्हते.
त्याने ते शहर सोडले आणि तो एका खेड्यात गेला. कदाचित एखाद्या शेतकऱ्याने त्याला काम दिले असते. त्याला शेतीची माहिती होती तो थोडेफार काही काम करू शकला असता. पण कोणीही त्याला काम दिले नाही. त्याचे कपडे फाटले होते. तो उपाशी होता. शेवटी एका शेतकऱ्याला दया आली. त्याने त्याच्या डुकरांचे रक्षण करण्यासाठी त्याला ठेवले. गुराखी होणे हा सर्वांत कमी प्रतीचा उद्योग होता. पण तो इतका भुकेलेला होता की ताठा ठेवून उपयोग नव्हता. त्या डुकरांना हलक्या प्रकारच्या शेंगा दिल्या जात असत. त्या आपल्याकडील चवळीच्या शेंगा प्रमाणे होत्या व चवीला गोड होत्या. सायमन इतका भुकेला होता की ते डुकरांचे अन्नच ते डुकरांचे अन्नचत्याला खावेसे वाटले.
गुरे राखील असताना सायमनला विचार करायला खूप वेळ मिळत होता. “मी किती मूर्ख आहे!” तो स्वत:शीच विचार करत होता- “माझ्याकडे पहा माझ्या वडिलांच्या नोकरांची स्थिती माझ्यापेक्षा चांगली आहे. तेव्हा मी आता परत जाईन. माझ्या वडिलांकडे जाऊन मी म्हणेन की मी देवाचा अपराध केला आहे. मी सांगेन की मी खूप वाईट मुलगा आहे, माझ्या वडिलांचा मी आदर ठेवला नाही, त्यांची आज्ञा मानली नाही. त्यांनी त्यांच्या इस्टेटीचा वाटा सुद्धा मला दिला. आता त्यांनी मुलगा म्हणून मला जवळ करावे अशी अपेक्षा तरी मी कशी धरावी? त्यांच्या शेतात नोकर म्हणून मला ठेवायला मी त्यांना सांगत.”
घरी परतण्याचा प्रकल्प खूपच मोठा होता. धुळीच्या रस्त्यातून सायमन मैलोन् मैल लंगडत चालत होता. मिळेल ते खात होता आणि रस्त्याच्या कडेला झोपत होता. घाणेरड्या फाटक्या कपड्यांतील तो भिकारी फादर लेव्हींचा तो गर्विष्ठ मुलगा आहे असे कोणालाही ओळखू येत नव्हते.
परंतु एका माणसाने मात्र त्याला बरोबर ओळखले. ते म्हणजे लेव्ही! त्यांचा तो मुलगा घरातून गेल्यापासून फादर लेव्ही फार दु:खी होते. दररोज ते आपल्या घराच्या छपरावर जाऊन बसायचे आणि आपला मुलगा परत येईल या आशेने लांबवर बघायचे. रस्त्यावरून लंगडत येणाऱ्या चिंध्या झालेल्या कपड्यांतील आपल्या मुलाला फादर लेव्हींनी ओळखले. ते घाईघाईने पायऱ्या उतरून गेले आणि आपल्या प्रतिष्ठेची पर्वा न करता सायमनला घट्ट मिठ्ठी मारली. आनंदाने ते रडू लागले. वडील त्याला थोपटत असताना आणि त्याचे चुंबन घेत असताना सायमन बोलूच शकत नव्हता. आपल्या मूर्खपणाबद्दल आणि जे काय बोलायचे ठरवले होते ते नंतर तो बोलला. पण फादर लेव्ही काहीच ऐकतच नव्हते. त्यांनी त्याचे हात धरले होते आणि आपल्या नोकरांना म्हणत होते- “माझा मुलगा परत आला आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी चांगले कपडे आणा. त्याचा अधिकार विसरू नका. नोकरासारखे त्याला अनवाणी पायांनी चालायला सांगू नका. एक चांगले वासरू कापून मेजवानी करा. आपण आता खाणेपिणे करू. माझा मुलगा मला अंतरला होता तो आता जिवंत परत आला आहे. तो हरवला होता. पण तो आता सापडला आहे.”
आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी नोकरांची तारांबळ उडाली. त्या घरात जणू कामाचे मोहोळच उठले. प्रत्येकजण फादर लेव्हींचा आनंदात सहभागी झाला होता. अपूर्व मेजवानी झाली. खाणेपिणे यांचा अगदी जल्लोश उडाला.
घरी परतत असताना ज्यूडने- मोठ्या भावाने ही सर्व गडबड ऐकली. दिवसभर तो शेतात खूप कष्ट करत होता. त्यामुळे अगदी थकूनभागून तो घराकडे परतत होता. जेव्हा ज्यूडला कळले की त्यांचा भाऊ परत आला आहे आणि त्याच्या सन्मानासाठी मेजवानी दिली जात आहे आणि त्या आनंदात त्याने सुद्धा सहभागी होणे आवश्यक आहे तेव्हा त्याला खूप राग आला. आणि तो ओरडला- “ते काय समजतात? मी पण आनंदात सहभागी झाले पाहिजे? तो वाईट मुलगा घरी आला म्हणून? त्या आळश्याच्या सन्मानासाठी मीही आनंद मानला पाहिजे असे ते समजूज कसे शकतात?”
नोकरांनी फादर लेव्हींच्या हे कानावर घातले. फादर लेव्ही स्वतः मुलाजवळ आले आणि प्रेमाने बोलू लागले पण ज्यूड इतका संतापला होता तो काही ऐकायलाच तयार नव्हता. उद्धटपणे तो वडिलांशी हुज्जत घालायला लागला- “इतके दिवस शेतात राबत होतो. मी नेहमीच तुमची आज्ञा पाळली आणि तुमची सेवा केली. तुम्ही कधी मला मेजवानी दिलीत का? माझ्या मित्रांबरोबर मला मौजमजा करू दिली नाहीत! आणि आता तो तुमचा तो उधळ्या मुलगा आल्याबरोबर मला काय दिसतय? त्याने एक तरी चांगली गोष्ट केली आहे का? मोठ्या शहरात जाऊन मजा करून त्याने तुमचा सगळा पैसा उधळून टाकला पण त्याच्यासाठी मात्र मांसाची मोठ्ठी मेजवानी !”
फादर लेव्हींचे सायमनवर जेवढे प्रेम होते तेवढेच ज्यूडवरही होते. त्यांना ज्यूडची भावना कळत होती, त्याचा रागही समजू शकत होते. ते त्याला रागाने बोलले नाहीत त्यांनी काही तक्रारही केली नाही. फक्त त्यांनी आपला हात ज्यूडच्या खांद्यावर ठेवला. “ज्यूड, माझा प्रिय बाळा” ते म्हणाले-“तू इथे माझ्याजवळत होतास. मी तुझ्यावर विश्वास टाकू शकत होतो. माझ्या जवळ जे काही होते ते तुझेच होते. सायमनला त्याचा वाटा दिलेलाच होता. तुझ्याप्रमाणे तोही माझा मुलगा आहे. माझे दोघांवरही प्रेम आहे. तो घरी परत आला असताना त्याचे स्वागत करणे आपले कामच होते. तू माझ्याजवळ असल्याने मला जितका आनंद वाटतो तितका आनंद तो जवळ राहिल्याने होतो. तो जणू मृत्यूकडूनच परत आला आहे. जेव्हा तो गेला होता तेव्हा मला वाटले होते की तो परत कधीच दिसणार नाही. तो जणू मृतच झाला होता. आता पुन्हा जिवंत झाला आहे; तो हरवला होता आता तो सापडला आहे. ज्यूड, ये माझ्याबरोबर ये आणि माझ्या आनंदात सहभागी हो!”
प्रश्न
- फादर लेव्ही यांच्या दुसऱ्या मुलाच्या वर्तणूकीचे वर्णन करा.
- धाकट्या मुलाने मालमत्तेतील वाटा मागितल्यावर फादर लेव्हीनी काय केले?
- फादर लेव्हीना त्यांचा हरवलेला मुलगा केव्हा सापडला? त्यांनी काय केले?
- फादर लेव्हींचा पहिला मुलगा त्यांच्यावर का रागावला आणि त्यावर फादर लेव्हींनी काय उत्तर दिले?
[Source- Stories for Children-II
Published by – Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]