हरिर्दाता श्लोकाचा अर्थ
हरिर्दाता श्लोकाचा अर्थ हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नं प्रजापतिः हरिर्विप्रशरीरस्तु भुङ्क्ते भोजयते हरिः
अन्न ग्रहण करणाऱ्याचा देह हरि आहे.
अन्न खाणाराही हरि आहे व अन्न देणाराही हरी आहे.
अन्न ग्रहण करण्यापूर्वी ते परमेश्वराला अर्पण केले की त्या अन्नाचा प्रसाद होतो. त्यातील सर्व दोष नष्ट होऊन ते पवित्र बनते. अन्न ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. आपण प्रार्थनापूर्वक व कृतज्ञ भावाने अन्न ग्रहण केले पाहिजे. अन्न म्हणजे जीवनज्योत प्रज्ज्वलित करणारे – आहे, आपण अन्नाचा आदर केला पाहिजे. अन्नाचा अपव्यय आपण टाळला पाहिजे. जेवढे आवश्यक आहे तेवढेच अन्न आपण घेतले पाहिजे. उरलेले अन्न पशु -पक्षांना खाऊ घालावे.
आपल्या देहामध्ये वास करणारा परमेश्वर अन्नाचा स्वीकार करतो म्हणून आपण अन्नाच्या संदर्भातील तीन प्रकारची शुद्धी पाळणे जरूरीचे आहे.
पदार्थ शुद्धी: भोजन बनविण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व पदार्थ शुद्ध असावेत.
पाक शुद्धी: अन्न शिजवणारी व्यक्ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या शुद्ध असावी.
पात्र शुद्धी: अन्न ज्यामध्ये बनवले जाते व ज्यामध्ये वाढले जाते तो सर्व भांडी शुद्ध असावी.
आपल्या भोजनगृहाच्या भोवतालचा परिसर शुद्ध असावा. हिंदुंची अशी श्रद्धा आहे की अन्न देवाला अर्पण करून, त्याने स्वीकारलेले पवित्र अन्न ग्रहण केले तर त्यामध्ये दिव्य ऊर्जा क्रियाशील होते व अन्नावर पडलेल्या सर्व अमंगल प्रभावापासून मुक्त होते.
भारतीय ऋषीमुनींच्या म्हणण्यानुसार, आपण ग्रहण करत असलेल्या अन्नाचा सर्व प्राणिमात्रांच्या आहारशक्तीचा आणि सृष्टीतील सर्व वस्तूंचा मूलाधाराचा स्रोत परमेश्वर आहे. ह्या मूलभूत सत्याचे विस्मरण झाल्याने जग दुष्काळ, कलह, युद्ध आणि अराजकता यांनी गांजले आहे.
ज्या भूमीवर अन्नधान्याची उपज होते ती भूमी मनुष्य निर्माण करू शकतो का? तो पाणी निर्माण करू शकतो का? ज्यामध्ये अग्नी सुप्तावस्थेत असतो ते लाकूड मनुष्य निर्माण करू शकतो का? ह्या सर्व गोष्टी फक्त परमेश्वर निर्माण करू शकतो. या सर्व गोष्टी मनुष्याच्या शक्तीपलीकडच्या आहेत.
जर अन्न परमेश्वराला अर्पण केले तर त्याच्यावर पडलेले सर्व अमंगल प्रभाव नष्ट होतात व त्या अन्नाचे प्रसाद बनतो जो आपले शारीरिक, नैतिक व आध्यात्मिक पोषण करतो.