विष जाहले अमृत कथा
परमेश्वराचे नाम विषाचेही अमृतात रूपांतर करू शकते. मीरा अखंड कृष्णनामाचे चिंतन करत असे. मीराबाईची अवस्था व जीवन जगण्याची तऱ्हा पाहून तिचे पती राजा महाराणा ह्यांनी, तिच्या डोक्यातून कृष्णाचे वेड जावे यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले. तिच्या दृष्टीने इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व नव्हते.
ती कृष्णनाम गात गात कोठेही जात असे, कधी राजा महाराजांमध्ये, की रस्त्यावरील संतांमध्ये वा कधी सामान्य लोकांमध्ये, हे सर्व पाहून महाराणांनी विचार केला, “मी एक राजा आहे. माझी पत्नी सामान्य लोकांमध्ये, संतांमध्ये वा अन्य राज्यातील राजांमध्ये जाऊन एखाद्या भिकाऱ्या प्रमाणे तंबोरा वाजवत कृष्णनाम गाते,” हे त्यांना खूप लज्जास्पद वाटले. मीरेने त्यांना अनेकदा सांगितले, “परमेश्वराचे नाम घेणे ही अपमानास्पद गोष्ट नाही, त्याचा महिमा गाणे ही एक सन्माननीय गोष्ट आहे. जर तुम्ही परमेश्वराचे नाम गायले नाहीं तर तो अपमान आहे. जर तुम्ही इतरांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष दिलेत तर तुम्ही आत्मभान गमावून बसाल. तुम्ही अत्यंत प्रेमाने, रुचीने व धैर्याने परमेश्वराच्या नामाचे उच्चारण केले पाहिजे. त्याला तुम्ही तुमचे कर्तव्य व आवड मानले पाहिजे.” अशा त-हेने मीरा तिच्या मार्गावर निश्चल राहिली. तिने तिचा पवित्रा अजिबात बदलला नाही. महाराणांनी हर तऱ्हेने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. ते तिला म्हणाले, “मीरा, जर तू अशी भजनं गात राहिलीस तर जग तुझ्याकडे एक वेडी स्त्री म्हणून पाहिल.
तुझ्या आजूबाजूचे लोक तुझ्याविषयी आवई उठवतील.” त्यावर मीरा उत्तरली, “महाराणा, कावळ्याच्या काव काव करण्याने कोकिळा गायन थांबवत नाही. आपल्या भोवतालचे लोक कावळ्यासारखे आहेत. प्रभुनाम गाणे म्हणजे कोकिळेच्या गायनासारखे आहे. आकाशातील ताऱ्यांवर कुत्री भुंकली म्हणून ते भूतलावर पडत नाहीत. ओठांवर प्रभुचे नाम असलेल्या एखाद्याने हीन कार्यामध्ये आनंद घेणाऱ्या मनुष्यास का शरण जावे?” मीरेने केलेल्या या विवादाने महाराणा क्रोधित झाले. ते राजसिक स्वभावाचे होते. भक्त सात्त्विक स्वभावाचा असतो. या दोन प्रवृत्तीमध्ये कधीही सहमती वा ताळमेळ असू शकत नाही, अग्नी आणि जल कधीही एकत्र येऊ शकत नाही. मीरेची वृत्ती खजुराप्रमाणे मधुर होती तर महाराणाची वृत्ती चिंचे सारखी होती. ज्याने खजुराची चव चाखली आहे त्याला चिंचेची चव घ्यावीशी वाटत नाही.
याउलट ज्याला चिंचेची चव आवडते त्याला खजुराची चव नकोशी वाटते. ज्यांना अपचनाचा त्रास होतो, त्यांना भुक लागत नाही. ज्यांना चांगली भूक लागते त्यांना अपचन ठाऊकच नसते. (ज्याला भगवंत आवडतो तो) (कधीही भूक न शमणाऱ्या एखाद्या मनुष्याप्रमाणे) (भगवंतासाठी कितीही मोठे दुःख सहन करतो). दोघांमध्ये सुसंगतता असू शकत नाही. मीरा आणि महाराणा यांच्यातही असेच होते. मीराच्या वर्तनात बदल करणे शक्य नाही आणि जोपर्यंत मीरा जिवंत आहे तोपर्यंत त्यांना अपमानित व्हावे लागणार हे महाराणांना कळून चुकले. म्हणून त्यांनी मीराच्या जीवनाचा अंत करण्याचे ठरवले. त्यांनी व त्यांच्या बहिणीने दुधामध्ये विष मिसळून मीराकडे पाठविले. अन्न ग्रहण करण्यापूर्वी ते अन्न ती परमेश्वराला अर्पण करत असे. त्यानुसार तिने ते विषमिश्रित दुध कृष्णाला अर्पण केले आणि नंतर पिऊन टाकले. ते दूध कृष्णाला अर्पण केल्यानंतर कृष्णाची मूर्ती निळी झाली व विषरहित पांढरे शुभ्र दृध मीरेच्या वाट्याला आले, त्याचवेळी महाराणा आत आले व गरजले, “तू येथे राहू शकत नाहीस. मी राजा आहे आणि तू माझी बदनामी करत आहेस हा महाल मी बांधून घेतला आहे आणि मी बांधलेल्या हया महालात तू राहू शकत नाहीस.”
परंतु, मीरा अत्यंत दुःखी होती कृष्णाच्या मूर्तीचा रंग कशामुळे बदलला हया विषयी ती विचार करत होती. तिचे धैर्य एकवटून तिने महाराणांना म्हटले, “हे खरे आहे की महाल तुम्ही बांधलात व त्यामध्ये या मूर्तीची स्थापनाही तुम्ही केलीत. परंतु, माझ्या हृदयातील कृष्णमंदिर तुम्ही बांधले नाहीत, ते माझ्या कृष्णाने बांधले आहे. तो माझ्या अंतर्यामी आहे, माझ्या हृदयातील कृष्णाला, त्याने माझ्याबरोबर राहू नये असे कोणीही सांगू शकत नाही.” ती स्वतःशीच म्हणाली, “हे मना! तुला एवढी आसक्ती का बरं आहे? त्या आसक्तीतूनच तुला दुःख सोसावे लागते.” त्यानंतर ती एक गीत गाऊ लागली. ज्यामध्ये म्हटले होते, “हे मना, तू प्रयागला गंगा-यमुनेच्या संगमावर जा.” ती भौगोलिक स्थानाबद्दल बोलत नव्हती. तिच्या म्हणण्याचा गर्भितार्थ होता, तिच्या भ्रूमध्यावर जेथे दोन्ही नद्यांचा संगम होतो ते स्थान, इडा ही नाडी गंगेचे व पिंगला नाडी यमुनेचे प्रतीक आहे व त्या दोन्हीच्या मधे असणारी ‘सुषुम्ना’ म्हणजे प्रयाग होय. तिने तिच्या भ्रूमध्यावर तिचे मन केंद्रित केले. त्या स्थानावर तिचे मन निश्चल झाले आणि त्याच क्षणी ती कृष्णामध्ये विलीन झाली, मीरेला केवळ अढळ श्रद्धा व नामस्मरण ह्यांच्यामुळे शुद्ध अवस्था प्राप्त झाली.
[Source: परमेश्वराच्या नामाचे उच्चारण करा, संदेश १७, My Dear Students भाग–४]