सारासर विवेकाची गरज
अयोध्येचा राजपुत्र दशरथाचा नावलौकिक दूरदेशी पसरला होता.
तो शब्दभेदी असून अंधारात आवाजाच्या दिशेने अचूक नेम धरुन लक्षवेध करत असे. ह्या त्याच्या कौशल्याचा त्याला अभिमान होता. आणि लोकांनी केलेल्या स्तुती ने तो आनंदित होत असे. तिन्हीसांजे तो आपल्या रथातून एकटाच अरण्यात दूरवर जात असे आणि वाट पहात पडून रहात असे. त्याला नदीवर पाणी प्यायला आलेल्या म्हशीचा किंवा हत्तीचा आवाज ऐकू येत असे. आत्तां हलक्या पावलांनी आलेले हरिण किंवा चोर पावलांनी आलेला वाघ तो ओळखत असे.
असंच एका रात्री तो झुडपांमध्ये पहुडला होता. पानांची सळसळ किंवा पाण्याचा आवाज त्याला ऐकू येत होता. अचानक तळ्याकाठी कांहीतरी हलल्याचा आवाज त्याला ऐकू आला. अंधारात त्याला काहीच दिसत नव्हते. पण दशरथ शब्दभेदी होता ना! तेवढा आवाज पुरेसा होता, तो नक्कीच हत्ती आहे. व त्याने बाण मारला. लगेचच रडण्याचा आवाज ऐकू आल्याने तो पट्कन उठला.
“मदत करा, मदत करा! कोणीतरी मला बाण मारला आहे!”
दशरथाच्या हातातून धनुष्य गळून पडले. अचानक धडकी भरल्याने त्याला चक्कर आली. आपण काय केलं? जंगली श्वापद समजून एका माणसाला जखमी केलंय? त्या जंगलातून तळ्याच्या दिशेने तो झपाट्याने गेला. तिथे काठांवर एक युवक रक्तबंबाळ, हताश होऊन पड़ला होता. ज्या घड्यात तो पाणी भरत होता, तो घडा आत्ताही त्याच्या हातात होता.
त्याने कण्हत विचारले, “ज्यांनी आत्ता मला प्राणघातक बाण मारल ते आपणच नां? मी सन्याशाचा पुत्र असून. माझे मातापिता अंध आहेत. मीच त्यांना सांभाळतो व त्यांच्या गरजा भागवतो. मी त्यांच्यासाठी पाणी भरायला येथे आलो. पण आतां मी त्यांची सेवा करू शकत नाही. आपण या वाटेने त्यांच्या झोपडीकडे जा आणि ही हकीकत त्यांना सांगा. पण त्याआधी माझ्या छातीत रुतलेला हा बाण बाहेर काढा. कारण त्यामुळे मला खूप यातना होत आहेत.”
दशरथाने जखमेतून बाण बाहेर काढला. त्या युवकाने शेवटचा उसासा टाकला आणि तो मरण पावला.
नंतर राजपुत्राने त्या घड्यात पाणी भरले, आणि त्या मरणासन्न युवकाने दाखवलेल्या वाटेने तो गेला. तो जवळ गेल्यावर वडील म्हणाले, “बाळा तुला यायला एवढा का उशीर झाला? तू तळ्यात पोहलास कां? आम्हांला भीती वाटली की तुला कांही इजां तर झाली नाही नां? पण तू उत्तर का देत नाहीस?”
दशरथ चाचंरत म्हणाला, “पुण्यवान तपस्वी, मी क्षत्रिय आहे, आणि आजपर्यंत मला माझ्या धनुर्विद्येतील कौशल्याचा खूप अभिमान होता. आज रात्री मी दबा धरून पडलो असतां, पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी हत्ती आलां, असे आवाजावरून मला वाटले. मी बाण मारला; अरेरे! तो बाण तुमच्या पुत्राला लागला. महोदय, मी माझ्या अपराधाची भरपाई कशी करु? कृपया आपण मला सांगावे.”
त्यानंतर त्या वृद्ध जोडप्याला रडू कोसळले आणि त्यांना शोक अनावर झाला. जेथे त्यांचा एकुलता एक मुलगा पडला होता, त्या ठिकाणी त्यांना नेण्याची आज्ञा त्यांनी त्या राजपुत्राला केली त्याच्याजवळ जाऊन त्यांनी पवित्र मंत्र म्हटले आणि त्याच्या मृत देहावर पाणी शिंपडून अंत्यसंस्कार केले.
आता ते तपस्वी म्हणाले, “दशरथा ऐक, तुझ्या चुकीमुळे आम्ही आमच्या एकुलत्या एक प्रिय पुत्रासाठी अश्रू ढाळले. एक दिवस तूही तुझ्या प्रिय पुत्रासाठी शोक करशील. त्यापूर्वी अनेक वर्षे लोटतील, पण तुला नक्कीच शिक्षा भोगावी लागेल.”
पुत्राच्या मृतदेहाला अग्नि देण्यासाठी, त्यांनी चिता रचली आणि स्वतःलाही त्या ज्वाळांमध्ये झोकून देत ते मरण पावले. काही वर्षे लोटली. दशरथ अयोध्येचा राजा झाला. आणि कौसल्येशी त्याचा विवाह झाला व रामाच्या रुपात तेजस्वी पुत्र लाभला. राम अयोध्या नागरातील सर्वांनाच प्रिय होता. पण कैकयी व तिची दासी मंथरा यांच्यामुळे श्रीरामाला पायडतार व्हावे लागले. आणि त्यांच्यामुळेच श्रीरामाला चौदा वर्षांचा वनवास घडला. ज्याप्रमाणे मध्यरात्री तळ्याकाठी त्या वृद्ध जोडप्याला आपल्या बालकाच्या मृत्यूमुळे शोक अनावर झाला, तसेच दुःख दशरथालाही पुत्राच्या वियोगाने झाले. एकेकाळी दशरथाला स्वतःच्या कौशल्याचा एवढा गर्व झाला, की तो सारासार विवेक करू शकला नाही आणि रात्रीच्या अंधारात एखाद्या व्यक्तीला इजा होण्याचा खप मोठा धोका असल्याचे भान त्याला राहिले नाही. शब्दभेदी असण्याच्या आपल्या कौशल्यावर पूर्ण विश्वास न ठेवता, त्याने दिवसां, पूर्ण उजेड असतांना बाण चालवायला पाहिजे होता. कोणालाही इजा करण्याची त्याची इच्छा नव्हती, पण त्याच्याकडे दूरदर्शित्व नव्हते.
प्रश्न :
- शब्दभेदी कोणाला म्हणतात?
- वृद्ध तपस्व्याच्या पुत्राला दशरथाने कां बाण मारला?
- त्याने ही चूक कां केलि?
- याचे प्रायश्चित्त त्याने कसे घेतले?
- तपस्वी व त्याच्या पत्नीने अग्नीत प्रवेश करून कां मरण पत्करले?
- तपस्व्याने दशरथाला कोणता शाप दिला?
- तुम्ही दाखवलेल्या सारासार विवेकाचा किंवा अविवेकाचा एखादा प्रसंग सांगा आणि त्याच्या परिणामाचे वर्णन करा.