गणेश आणि सिंदुरसुराची कथा
ब्रह्माने प्रथम उत्पन्न केलेल्या सत्ययुगामध्ये सिंदुरासुर नावाचा राक्षस राहात होता. तो महाशक्तिशाली होता. तो सतत तपःकमें करण्यात गढलेला असे. परंतु तपश्चर्येमुळे मिळालेल्या सामर्थ्याचा वापर तो दुराचरणाची जोपासना आणि सर्वनाश यासाठी करीत असे. काही काळाने तो इतका बलवान झाला की देवांनाही त्याचा पराभव करणे अशक्य आहे असे दिसून आले. सिंदुरासुर नेहमी साधुसंतांना त्रास देत असे, त्यांना कैद करून त्यांचा छळ करीत असे. साऱ्या जगात त्याच्या शक्ती अतुलनीय आहेत असे त्याला वाटत असे.
अखेरीस सारे साधुसंत भगवान नारायणाला शरण गेले आणि त्यांनी सिंधुरासुराच्या तावडीतून सुटका करावी म्हणून प्रार्थना केली, साधुसंतांना भगवान् नारायणाचे आशीर्वाद मिळाले. भगवान नारायणांनी सांगितलेच आहे की, “परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।” त्याचा अर्थ असा की साधूंचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा विनाश करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी युगायुगात मी अवतार घेत असतो. भगवान नारायण यांनी साधूंना आश्वासन दिले की, त्यांनी घाबरण्यासारखे काही नाही. ते स्वत: शिवपार्वतीचा पुत्र म्हणून अवतार घेतील आणि सिंधुरासुराचा नाश करतील.
काही कालानंतर पार्वतीदेवी गर्भवती झाली. सिंधुरासुराला कळले की, भगवान शंकरांना होणारा पुत्र हा चांगुलपणाचा आविष्कार असल्याने तो आपला नाश करील. त्याच्या हातून आपल्याला मरण येईल. म्हणून त्याने सूक्ष्म रूप धारण करून पार्वतीच्या गर्भाशयात प्रवेश केला. त्या बालकाचा शिरच्छेद केला आणि तो अंतर्धान पावला.
नऊ महिने झाल्यानंतर पार्वतीदेवीने मुलाला जन्म दिला, जरी त्या बालकाला मस्तक नव्हते तरी तो भगवान नारायणाचा अवतार असल्याने, त्याचा अंशभाग असल्याने सचेतन होता. पण देवी पार्वतीने जेव्हा मुलाला पाहिले तेव्हा ती निराशेने उद्गारली, “अहो, हे पाहा काय झालंय ते! मस्तकच नसलेल्या मुलाचा काय उपयोग?” पण भगवान शिवांनी तिचे सांत्वन केले व चिंता करू नकोस असे सांगितले. त्यांनी आपल्या वीरभद्र नावाच्या गणाला हाक मारली आणि त्याला आज्ञा केली की, “सगळ्या पृथ्वीवर शोध घे व जो प्राणी दक्षिणेकडे पाय करून झोपला असेल त्याचे मस्तक तोडून घेऊन ये.” त्याप्रमाणे वीरभद्र सगळ्या जगात फिरला परंतु या अवस्थेत निजलेला कोणीही त्याला सापडले नाही, कारण शास्त्रे आपल्याला सांगतात की दक्षिण दिशेला मृत्युदेव यमाचे घर आहे; म्हणून दक्षिण दिशेला पाय करून निजू नये. कारण त्याचा अर्थ असा होतो की प्राणी यमराजाकडे निघाला आहे. त्याकाळी लोकांचा शास्त्रावर मोठाच विश्वास होता. त्याचा परिणाम म्हणून शास्त्रांमधील आदेशानुसार आपले दैनंदिन जीवन ते जाणीवपूर्वक व्यतीत करीत असत. म्हणून वीरभद्रला त्या अवस्थेत निजलेला कोणताही प्राणी किंवा व्यक्ती आढळला नाही. तो भगवान् शिवांकडे परत आला आणि म्हणाला, “हे प्रभो, अगदी कसून शोध घेतला तथापि दक्षिणेकडे पाय करून झोपलेला एकही मानवप्राणी मला आढळला नाही; परंतु एक हत्ती मात्र तसा निजलेला आहे. आपली इच्छा असेल तर मी जाऊन त्याचे मस्तक तोडून आणतो.” भगवान् शिवांनी संमती दर्शविली व वीरभद्र हत्तीचे शीर घेऊन आला. ते बालकाच्या धडावर बसवून भगवान शिवांनी त्याला जीवदान दिले.
पण तरीही देवी पार्वती अजूनहीं खिन्न व निराश होती. कारण तिला असे वाटले होते की सगळे जग मानवी शरीर आणि हत्तीचे मस्तक असलेला तिच्या मुलाची टवाळी करील. पण भगवान शिवांनी तिला सांगितले की तशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही आणि पुढे म्हणाले, “मी या बालकाला असा आशीर्वाद देतो की हा विद्यापती होईल आणि जगातील सर्व विद्वान् त्याला मान देतील व त्याची आराधना करतील. तो विघ्नहर्ता म्हणूनही ख्यातनाम होईल आणि कोणत्याही कार्यारंभी लोक त्याची नेहमी पूजा करतील. पूजेमध्ये त्याला अग्रस्थान प्राप्त होईल आणि तो उदंड प्रसिद्धी पावेल.” त्यामुळे देवी पार्वती पूर्ण संतुष्ट झाली.
भगवान गणेश मोठा होऊ लागला आणि तो अगदी तरुण असतानाच ज्या कार्यासाठी त्याने अवतार घेतला होता ते कार्य करण्याची वेळ आली. म्हणून सिंदुरासुराशी युद्ध करण्यासाठी तो नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर गेला. कित्येक दिवस तुंबळ युद्ध झाले आणि परशूच्या साहाय्याने सिंदुरासुराचा वध करून शेवटी भगवान् गणेश विजयी झाले. जेव्हा त्यांनी सिंदुरासुराचे मस्तक तोडले तेव्हा एकाएकी त्याच्या शरीरातील सर्व रक्त वर उसळले व भगवान गणेशाच्या अंगावर उडाले; त्यामुळे भगवान गणेशाचे शरीर नेहमी तांबड्या रंगाचे दाखविले जाते. त्यामुळे चांगुलपणा किंवा सत्य यांच्यापुढे दुष्टपणाचा पोकळपणा निदर्शित होतो. याच कारणाने नर्मदेच्याकाठी सापडणाऱ्या तांबड्या दगडांची भगवान गणेश म्हणून पूजा केली जाते.
युद्ध संपल्यानंतर भगवान गणेशाने विश्रांतीसाठी नदीच्या काठावर थंड छायेचा भूभाग आहे का याचा शोध घेतला. हरिततृणांनी युक्त अशा जागी त्याने काही काळ विश्रांती घेतली. ते ताजेतवाने झाले. तेथून उठताना त्यांनी त्या गवताला वरदान दिले की, “जो कोणी या तृणांनी माझी पूजा करील त्याच्यावर मी प्रसन्न होईन.” म्हणूनच आजसुद्धा भगवान् गणेशाची दुर्वांकुरांनी पूजा केली जाते. (दुर्वा अन्य कोणत्याही देवाला वाहात नाहीत. केवळ गणेशालाच वाहिल्या जातात.) अशा त-हेने सिंदुरासुराचा नाश करून भगवान गणेश परत आले आणि शांती व स्वास्थ्याची पुन्हा स्थापना झाली. सगळ्या हिंदू कुटुंबामध्ये वाढदिवस, विवाह, सत्यनारायणाची पूजा अथवा नव्या घराची वास्तुशांती असे कोणतेही कार्य असो, त्यामध्ये प्रारंभी गणेशाची पूजा करावी लागते. कारण तो विघ्नहर्ता आहे.
[Source: श्री सत्यसाई बालविकास गुरू हॅन्डवुक, गट १ वर्ष पहिले, द्वारा: श्री सत्यसाई बुक्स एंड पब्लिकेशन्स ट्रस्ट धर्मक्षेत्र, महाकाली केव्हज् रोड, अंधेरी ईस्ट, मुंबई.]