सुप्रभातम – प्रस्तावना

Print Friendly, PDF & Email

सुप्रभातम – प्रस्तावना

गोष्ट

एकदा धीरज नावाचा राजा विनाशपुरला राज्य करीत होता, त्याला मानसराणी नावाची सुंदर पत्नी होती परंतु तिच्यात एक कमतरता होती. ती चंचल होती आणि ती स्वत: कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हती. ती नेहमी तिचे मंत्री रजोदत्त आणि तमोदत्त या दोघांवर अवलंबून असायची. ते कपटी होते आणि नेहमी राणीला चुकीच्या मार्गाने न्यायचे. राजाचे राणीवर फार प्रेम होते. त्यामुळे तो ती म्हणेल तसे करायचा आणि ती त्याच्यासाठी निर्णय घ्यायची.

त्या राज्याचे नागरिक खूप चतुर होते आणि ते आपल्या कामात निपुण होते. ते पूर्णपणे राजा व राणीच्या कृपेवर अवलंबून होते. वाईट कार्ये करण्यासाठी त्यांना रजोदत्त आणि तमोदत्त मार्गदर्शन करायचे. यामुळे राज्याला त्यांनी मोठ्या संकटाकडे नेले. केवळ नागरिकच दु:खी नव्हते तर त्यांचा परिसर खिन्न आणि दुःखी होता. संपूर्ण राज्य दुःखात बुडाले होते.

आणि एक दिवस – खरोखरी तो किती भाग्याचा दिवस होता! त्या राज्यात एक गुरुसेन नावाचा शहाणा माणूस आला. त्याने लोकांची दशा पाहिली आणि एकदम त्याला या दुर्दशेचे मूळ कारण कळले. जरी राजाकडे मोठी संपत्ती होती तरी पण त्याला नेहमी वाटे की आपण दिवाळखोर आहोत. त्याच्या मंत्र्यांनी त्याला चुकीचा मार्ग दाखवला. तो नेहमी प्रजेवर कर लादत गेला आणि त्यांचे ओझे वाढवत गेला. राजाचे पैसे चुकते करण्यासाठी लोक वाईट मार्गाला लागले. गुरुसेनने काय केले? त्याने राजापाशी असणार् या गुप्त धनाची त्याला (राजाला) कल्पना दिली. त्याने रजोदत्त व तमोदत्त मंत्र्यांनी तेथे घातलेला आच्छादन बाजूला केले. एकदम राजाला सर्व परिस्थितीची कल्पना आली. त्याने गुरुसेनचा सल्ला घेतला आणि दोन्ही मंत्र्यांची तुरुंगात रवानगी केली. त्यांच्या सर्व क्रिया एकदम थांबल्या. त्यानंतर राजाने राणीला पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली ठेवले. त्याने तिला आपल्या आज्ञा पाळावयास लावले. नागरिक एकदम सुधारले. त्यांच्यामध्ये कला कौशल्य, गुण आणि अनेक क्षमता होत्या. जेव्हा त्यांना मार्गदर्शन लाभले तेव्हा ते चांगले वागू लागले. लगेच विनाशपूर नगरी अविनाशपूर झाली. आता कोणताही बाहेरचा शत्रू त्यांचे वाईट करु शकणार नव्हता. आता नागरिक सुखी आणि आनंदी झाले. त्यांनी आपला परिसर सुखी आणि आनंदी बनविला.

आता आपण या गोष्टीतील पात्रांना योग्य प्रतीकात बदलू.

  • विनाशपुर शहर म्हणजे आपले शरीर, राजा म्हणजे बुद्धी, राणी मनाचे प्रतीक-जे अस्थिर, चंचल, निर्णय न घेऊ शकणारे आणि कधी शक्तिशाली असते.
  • आपल्यात असणारे रजोगुण आणि तमोगुण म्हणजे दुष्ट मंत्री आहेत, प्रजा म्हणजे पाच कर्मेंद्रियेआणि पाच ज्ञानेंद्रिये. शहाणा माणूस म्हणजे सद्गुरु किंवा प्रत्येकाचा शहाणपणा, गुप्त संपत्ती म्हणजे सत्य आणि आपल्यात असणारा परमेश्वर.

ज्यावेळी सद्गुरू आपल्या जीवनात प्रवेश करतो त्यावेळी रात्र आणि अज्ञान संपते. मांगल्याची पहाट सुरू होते. तो आपल्याला वेगवेगळ्या साधनामार्गांनी पुढे नेतो व आपल्यातील दिव्य सुप्त चैतन्याला जागृत करतो.

प्रत्येक दिवशी आपली नित्य कर्तव्ये पार पाडण्यापूर्वी सुप्रभातम् म्हणणे ही एक साधनाच आहे. प्रत्येक कडव्यातील शब्दांचे चिंतन करून त्यात अंतर्भूत उद्देश जाणण्याने त्याची चांगली फळे मिळतील. आपले शरीर देवाचे मंदिर आहे. शरीरात निवास करणारी देवता म्हणजे आत्मा. स्थूल शरीर ‘अन्नमय कोशा’ पासून बनते. याची तुलना आपण इमारतींच्या विटांशी करू शकू. सूक्ष्म शरीर ‘प्राणमय कोश’, ‘मनोमय कोश’ आणि ‘विज्ञानमय कोश’ यांनी बनले आहे. याची तुलना आपण प्रार्थना मंदिराबरोबर करू शकतो. कारणशरीर ‘आनंदमय कोशा’ ने बनले आहे. याची तुलना पवित्र मंदिराशी होऊ शकते. २० ओंकारांनी आपण शरीररूपी मंदिराच्या २० अंगांना स्वच्छ करतो. आणि २१ व्या ओंकाराने आपण आपल्या आत्म्याला बोलावतो. यानंतर आपण सुप्रभातम्च्या प्रत्येक कडव्याचा गर्भितार्थ जाणून मनन करीत ते म्हणतो.

ज्या क्षणी परमेश्वराच्या आपल्यातील सत्य अस्तित्वाचा साक्षात्कार होतो तेव्हा आपणाला अतिशय समाधान मिळते आणि आपण समृद्ध होतो. नंतर आपणाला ज्ञान होते की आपण सत्य, चांगुलपणा आणि सौंदर्य स्वरूप आहोत. आपण तृप्त होतो. बुद्धी मनावर राज्य करते आणि दहा कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रियांना ती ताब्यात ठेवते. मग आपले सर्व विचार, उच्चार आणि कृती, शक्ती आणि सद्गुणांनी भरून जातात. जेव्हा मन बुद्धीचे नियंत्रण करते तेव्हा मात्र गोंधळ उडतो आणि दु:ख वाट्याला येते. कारण मन अस्थिर असते आणि गुणांनी व पूर्व प्रवृत्तींनी ते प्रभावित असते. आपल्यातील मूल्यवान आणि शांत सत्य अस्तित्वावर जणू त्यामुळे पडदा किंवा आवरण येते.

म्हणून ज्यावेळी आपण सुप्रभातम् म्हणतो त्यावेळी आपण हे जरूर लक्षात ठेवले पाहिजे की आपल्यापैकी प्रत्येकात परमेश्वराचा निवास आहे. परमेश्वर कृपा आणि सुखाचे शक्तिकेंद्र आहे. आपल्याला त्याला जागृत करावयाचे आहे. म्हणजे साधना वा स्वप्रयत्नांनी आपल्याच स्वत:च्या दिव्यत्वाला ओळखायचे आहे. परमेश्वरच (खातो, झोपतो, आनंद मिळवतो इ). आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत काम करतो. अशाप्रकारे आपण जाणले पाहिजे, की सर्व क्रियांचा तोच कर्ता आहे. जोपर्यंत आपण हे जाणत नाही तोपर्यंत आपण आपल्याला विचारले पाहिजे, की जर मी अशी गोष्ट केली वा या दिशेने विचार केला तर माझ्या प्रभुसाईला आवडेल का? माझ्या शरीराद्वारे प्रभुसाई कसे काम करेल? तो त्याप्रमाणे विचार करेल का, किंवा या प्रकारे वागेल का?

अशा प्रकारे मुलांना योग्य आचरणाबाबत मार्गदर्शन करता येईल.

म्हणन प्रत्येक दिवस नव्या शपथेने सुरू होतो. ‘त्याच्या’ कडील प्रवासाचे पढचे पाऊल, ‘मी’ कडून ‘त्याच्या’ कडे टाकले जाते. अशाप्रकारे आपण आपल्यात सुप्त असलेले दिव्यत्व जागे करतो आणि मग नंतर सर्वांच्या मध्ये असणाऱ्या दिव्यत्वाचे आपण दर्शन घेऊ शकतो.

अशा प्रकारे क्रमाक्रमाने तीर्थयात्रीप्रमाणे आपण आतील मंदिराकडे, गाभाऱ्याकडे जातो. ‘त्याच्या’ निकट अस्तित्वाचा अनुभव घेत राहातो.

(सुप्रभातम् ची ध्वनिफित वर्गात वाजवावी. त्यामुळे नाद, लय आणि ताल सौंदर्याचा विद्यार्थ्यांना परिचय होईल).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *